तसं तर प्रश्न विचारायचे म्हणलं तर आपल्याकडे एक से बढकर एक प्रश्न असतात. आता हेच बघा ना, आम्हाला एकएकजणाने असा प्रश्न विचारला की आम्हालाही त्यावर उत्तर शोधणे भाग पडले. प्रश्न असा होता की, जर एखाद्या बाळाचा जन्म आकाशात उड्डाण करत असणाऱ्या विमानात झाला, तर अशा प्रकरणात त्या बाळाच्या जन्माच्या दाखल्यावर जन्मस्थान आणि नागरिकत्व काय असेल ? पडला ना तुम्हीही कोड्यात ? पण काळजी करु नका, याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सगळ्यात आधी आपल्या वाचकांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगण्याची आवश्यकता आहे, ती म्हणजे भारतात ७ महिने किंवा त्याहून अधिक महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेला विमान प्रवास करण्याची परवानगी नाही. परंतु काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना परवानगी असते. समजा अशा अपवादात्मक परिस्थितीत जर एखाद्या महिलेने विमान आकाशात असतानाच बाळाला जन्म दिला; तर त्या बाळाच्या जन्माच्या दाखल्यावर जन्मस्थान आणि नागरिकत्व काय लिहायचे ? ज्या देशातून विमान निघाले त्या देशाचे की ज्या देशात विमान जाणार आहे त्या देशाचे ?
या प्रश्नाचे उत्तर जितक्या खोलवर जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, तितका तो अवघड बनत जाईल. कारण अशा प्रकारे जन्म घेणाऱ्या बाळांसाठी जगातील बहुतांश देशात नागरिकतेसंबंधी कुठल्याही कायदेशीर व्याख्या अस्तित्वात नाहीत.
अशा स्थितीमध्ये, ज्या क्षणाला बाळाचा जन्म झाला असेल त्याक्षणी ते विमान कोणत्या देशाच्या सीमेवर उडत आहे, हे सर्वप्रथम बघावे लागेल. मुलाच्या जन्माच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्र विमानाच्या लँडिंगनंतर त्या देशाच्या विमानतळ प्राधिकरणाकडून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे त्याच देशाचे नाव मुलाच्या जन्माच्या प्रमाणपत्रात लिहिले जाईल, ज्या देशामध्ये मुलाचा जन्म झाला आहे. तथापि मुलास देखील त्याच्या पालकांच्या देशाचे नागरिकत्व मिळविण्याचा अधिकार आहे.
अमेरिकेत यावर कायदा करण्यात आला आहे. जर एखाद्या बाळाचा जन्म अमेरिकेच्या हद्दीतील जमीन, आकाश किंवा समुद्र क्षेत्रात झाला तर त्याला अमेरिकन नागरिक मानले जाते. इतकंच नाही, तर विमानात जन्म झालेल्या बाळांचेही प्रमाणपत्र बनवले जाते, त्यावर स्पष्ट लिहण्यात येते की या बाळाचा जन्म विमानात झाला आहे.
व्यावहारिकदृष्ट्या जर कुठल्या बाळाचा जन्म विमानात झाला, तर त्या बाळाचे वडील ज्या देशाचे रहिवासी आहेत त्या देशात गेल्यानंतर कुठल्याही दवाखान्यात जाऊन बाळाचे जन्म प्रमाणपत्र बनवतात. या पद्धतीने विमानात जन्म घेणाऱ्या बाळांच्या जन्म प्रमाणपत्र आणि नागरिकतेची अडचण सोडवली जाते. पण हा प्रॉब्लेम सुटला तरी, त्या बाळाची जम कुंडली कशी बनवायची हा प्रॉब्लेम उरतोच…