“उत्तम शेती माध्यम नोकरी आणि कनिष्ठ व्यवसाय” हे खूळ मराठी माणसांमध्ये कुणी पेरलंय हे माहित नाही, पण या खुळापायीच आज मराठी माणसाची सर्व क्षेत्रात पीछेहाट होताना पाहायला मिळत आहे. पारंपरिक शेती हा आता तोट्याचा व्यवसाय झालाय हे आपण कधीतरी मान्य करायला शिकलं पाहिजे.
दुसरं नोकरीमध्येही प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून बेरोजगारीचेही प्रमाण वाढत चालले आहे. परंतु इतकी वर्षे ज्या व्यवसायाला आपण कनिष्ठ म्हणून हिनवले आज तेच क्षेत्र आपल्याला तारु शकते याची अनुभूती फारच कमी लोकांना आली आहे. त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे पुण्याचा प्रदीप जाधव !
पुण्यात राहणारा २९ वर्षांचा प्रदीप २०१८ पासून आपला ‘Gigantiques’ हा फर्निचर आणि होम डेकॉरचा व्यवसाय चालवत आहे. आज त्याच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. प्रदीप त्याच्या व्यवसायासाठी चक्क जुने टायर, रिकामी झालेली टिपाडे आणि कर किंवा मोटारसायकलींचे जुने पार्ट वापरतो. या टाकाऊ वस्तूंपासून प्रदीप फर्निचर आणि होम डेकॉरचे सामान बनवतो. या माध्यमातून प्रदीप आपल्या ग्राहकांना केवळ चांगले आणि टिकाऊ फर्निचरच देत नाही; तर पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनेही चांगले काम करत आहे.
युट्युबवरील व्हिडीओ पाहून प्रदीपला सुचला हा व्यवसाय
प्रदीप हा मूळचा धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील. त्याने ITI केला. त्यानंतर Diploma करुन तो एका कंपनीत नोकरीला लागला. त्यातून जमा झालेल्या पैशातून त्याने इंजिनीयरिंगही पूर्ण केले. त्यानंतर एका मल्टिनॅशनल कंपनीत त्याला नोकरी लागली. दरम्यान युट्युबवर एक व्हिडीओ त्याच्या पाहण्यात आला.
त्यात एक अफ्रिकन व्यक्ती जुन्या टायरपासून खुर्ची बनवत होता. त्यानंतर प्रदीपने याबाबत अधिक संशोधन केले. एक छोटीशी जागा भाड्याने घेऊन त्याठिकाणी काम सुरु केले. नोकरीवरुन सुटल्यावर प्रदीप रात्री याठिकाणी येऊन तो डिझाईनची कामे करु लागला. पुढेपुढे नोकरी सोडून त्याने पूर्णवेळ याच व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.
आता प्रदीपच्या व्यवसायाने चांगलाच जोर धरला आहे. जुन्या टाकाऊ वस्तूंपासून तो टेबल, खुर्च्या, सोफा, वॉश बेसिन, फळांची टोकेरी, हँगिंग दिवे इत्यादि आकर्षक गोष्टी बनवतो. एक मराठी व्यक्ती आपल्या जिद्दीच्या आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर नवा व्यवसाय उभा करतो आणि सुरळीतपणे तो चालवतो ई खरोखरच आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.