भारतीय चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै २०२१ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पेशावर इथे झाला होता. त्यांचं मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होते. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान वेगवेगळे झाल्यानंतर ते मुंबईला आले. सुरुवातीच्या काळात आर्थिक तंगी दूर करण्यासाठी दिलीप कुमारांनी पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका आर्मीच्या कॅन्टिनमध्येही ३६ रुपये पगारावर काम केले होते. त्यांच्या हातचं सॅन्डविच ब्रिटिश अधिकाऱ्यांना फार आवडायचे. परंतु नंतर मुंबईला परत येऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे ठरवले आणि आपले मूळ नाव बदलून दिलीप कुमार हे नाव धारण केले.
१९५१ साली बॉलिवूडमध्ये दिलीप कुमार आणि आरसपानी सौंदर्याची खाण असणाऱ्या मधुबाला यांचा “तराना” हा चित्रपट आला आणि तिथूनच दोघांमधील प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. शुटिंगदरम्यानच मधुबालाने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलीप कुमारांच्या मेकअप खोलीमध्ये एक चिठ्ठी आणि गुलाबाचे फुल पाठवले. त्या चिठ्ठीत लिहलं होतं, “तुमचंही जर माझ्यावर प्रेम असेल तर या गुलाबाच्या फुलाचा स्वीकार करा.” चेहऱ्यावर स्मितहास्य करत दिलीप कुमारांनी मधुबालाच्या प्रेमाचा स्वीकार केला.
दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाने जोर पकडला असतानाच चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणेच हिरोईनच्या वडिलांची म्हणजे मधुबालाच्या वडील अताउल्लाह खान यांची भिंत उभी राहिली. त्यांना हे प्रेम मान्य नव्हतं. त्यामुळे मधुबालाच्या शुटिंगदरम्यानही ते तिच्यावर करडी नजर ठेऊ लागले. ज्यावेळी नया दौर चित्रपटाचे शूटिंग सुरु होते, त्यावेळी दिलीप कुमार – मधुबाला यांच्यातील रोमान्सच्या भीतीने त्यांनी मधुबालाला आऊटडोर शुटिंगलाच पाठवले नाही. शेवटी निर्मातेही या सगळ्याला वैतागले.
मधुबालाच्या वडिलांचा त्रास टाळण्ययासाठी निर्मात्यांनी मधुबालाच्या जागी वैजयंतीमालाला साइन केले. त्याची वर्तमानपत्रात बातमी दिली. मधुबालाचा कट केलेला फोटो छापून त्याशेजारी वैजयंतीमालाचा फोटो छापला. याला उत्तर म्हणून अताउल्लाह खान यांनी मधुबालाच्या सर्व चित्रपटांची यादी करून त्यात “नाय दौर” चित्रपटाला काट मारलेली बातमी छापून घेतली.
यावरुन कोर्टकचेऱ्या झाल्या. ज्यावेळी कोर्टात दिलीप कुमारांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले, त्यावेळी ते बोलले “होय, माझं मधुबालावर प्रेम आहे आणि मी आयुष्यभर करत राहीन.”
पुढे दोघांच्या नात्यात अनेक चढउतार आले. एक वेळ अशी आली की दोघांमधील नाते संपले. मुगल-ए-आझम चित्रपटाच्या शुटिंगवेळी दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी चित्रपटात तर एकमेकांशी संवाद साधला, पण त्याकाळात स्टेजच्या बाहेर त्यांच्यातील बोलणं बंद होतं. दिलीप कुमारांनी नंतर सायरा बानो यांच्याशी लग्न केले.