स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आजकाल लाखो जण मेहनत करत असतात. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं म्हणजे शहर गाठून क्लासेस करणेच गरजेचे असते असा प्रत्येकाचा समज आहे. पण कुठलेही महागडे क्लास न लावता स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेल्या तेजस्विनीने हे सर्व खोटं ठरवलं आहे. तिने दाखवून दिलं आहे कि क्लासच लावणे गरजेचे नाहीये. तुमच्यामध्ये असणारी जिद्दच तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते असा कानमंत्र तेजस्विनी देते. जाणून घेऊया तेजस्विनीचा जीवनप्रवास..
सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील गलमेवाडी येथील भरत चोरगे हे एक सर्वसामान्य घरची परिस्थिती बेताची असलेले गृहस्थ. चोरगे यांचे कुटुंब तळमवाले या गावात स्थायिक झाले. भरत चोरगे हे टेलरिंगचं काम करायला लागले. १९९१ साली त्यांनी घर चालवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी टेलरिंगला सुरुवात केली. पती पत्नी दोघांनी काबाडकष्ट करायला सुरुवात केली. मुलगी तेजस्विनी अभ्यासात हुशार होती. तेजस्विनीचे सुरुवातीचे शिक्षण जि.प.शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्री वाल्मिक विद्यामंदीर तळमावले येथे झाले.
पुढे तेजस्विनीने काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने गव्हर्मेंट कॉलेज कराड येथे मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेतला. डिप्लोमा झाल्यावर तिने ३ वर्ष पुण्यात इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. इंजिनिअरिंग झाल्यावर तेजस्विनीने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिने त्यादृष्टीने तयारी सुरु केली.
तेजस्विनीने कुठलेही क्लासेस न लावता स्वतःच अभ्यासाला सुरुवात केली. घरची परस्थिती बेताची असताना प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत अहोरात्र अभ्यास ती करू लागली. तिची जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती अभ्यासातील सातत्य व परिश्रम यातून ती यश मिळवणारच असा विश्वास सर्वाना होता. तिने घेतलेल्या मेहनतीचं फळ तिला मिळालं २०१७-१८ मध्ये.
तेजस्विनी MPSC परीक्षेत पास झाली. टेलर वडिलांनी आणि आईने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले. मुलीला त्यांनी ज्या परिस्थितीतून शिकवले होते त्याचे फळ तेजस्विनीने त्यांना दिले आणि कुटुंबाचे नाव मोठे केले. तेजस्विनीची मोटर वाहन निरीक्षक पदी निवड झाली. नुकतीच तिची पिंपरी-चिंचवडच्या सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना तेजस्विनी सांगते कि ‘‘स्पर्धा परीक्षेत उतरून तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे ना, मग मोठा खर्च, शहरातील क्लासेस, किचकट अभ्यास हा सगळा बागुलबुवा तुमच्या डोक्यातून प्रथम काढून टाका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून अभ्यासात सातत्य ठेवा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.”
ध्येयाचा पाठलाग करताना यश लगेच मिळतं असं नाही. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. सोबतच तुमच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असायला हवी. तेजस्विनी यशस्वी झाली असली तरी ती अजून फर्स्ट क्लास पद मिळवण्यासाठी तयारी करत आहे. तेजस्विनीच्या या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.