Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / ज्या महानगरपालिकेसमोर भीक मागून खाल्लं तिथंच बनली पारधी समाजाची पहिली नगरसेविका!

ज्या महानगरपालिकेसमोर भीक मागून खाल्लं तिथंच बनली पारधी समाजाची पहिली नगरसेविका!

पारधी समाज हा आपल्याकडे एक गु न्हेगारी पार्श्वभूमी असलेला समाज म्हणून ओळखला जातो. या समाजात स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जातं. पण या समाजातून आलेली एक महिला मोठा संघर्ष करून आज पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. या महिलेने एकेकाळी पुणे महानगरपालिकेसमोर भीक मागून खाल्लं. तिथंच ती आज मानाने नगरसेविका म्हणून कार्य कार्य करत आहे. तिच्यावर अनेक संकटं आली पण तिने हार न मानता खंबीरपणे लढत पारधी समाजातील पहिली नगरसेविका बनण्याचा मान मिळवला आहे. तिचा जीवनप्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

पुण्याच्या राजश्री ज्ञानेश्वर काळे. पारधी समाजातील एक कर्तृत्ववान महिला. अंधश्रद्धेत गुंतलेल्या पारधी समाजात शिक्षणाला जास्त महत्व दिलं जात नाही. लहान वयातच लग्न लावून दिलं जातं. राजश्री सोबतही तेच झालं. १० वर्षाची असतानाच राजश्रीचं देखील लग्न झालं. सासरी दारूच्या भट्टीचा व्यवसाय होता. राजश्रीहि हळू हळू भट्टी काढायला लागली. परिस्थिती खूप बिकट होती. राजश्रीला हे सर्व नको होतं.

राजश्री वेगळ्या विचारांची होती. पारधी समाज देखील कुठे तरी पुढे गेला पाहिजे असं तिला वाटायचं. पण तिच्या आयुष्यात अनेक संकटं येत गेली. तिच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली. २ महिने तो जेलमध्ये होता. राजश्री तेव्हा १५-१६ वर्षांची होती. तिला तेव्हा दिवस गेलेले होते. नवरा २-३ महिन्यांनी जेव्हा परतला तेव्हा त्याने राजश्रीवर आरोप केला कि हे मुल माझं नाही म्हणून. नंतर जात पंचायत भरली. राजश्रीची सत्वपरीक्षा घेतली गेली. तिला विस्तवातून ५ पावलं चालायला लावलं गेलं. सोबतच तिच्या हातावर खूप गरम झालेली कुर्हाड ठेवली गेली.

राजश्री आणि तिचं कुटुंब तेव्हा वेगळं झालं होतं. राजश्रीने हि सत्वपरीक्षा दिली होती. पण पुढे तिचं कुटुंब एका प्रकरणात जेलमध्ये गेलं. तेव्हा ती पुन्हा नवर्याकडे परतली. केस मिटवून घेतली. तेव्हा राजश्री पारधी समाजासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या संपर्कात आली. प्रभुणे यांनी राजश्रीला पाबळला प्रशिक्षण द्यायला पाठवलं. पुढे जात पंचायत ने परीक्षा घेऊनही राजश्रीला नांदवायला आणलं म्हणून त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं.

पाबळला शिलाई मशीन काम ती शिकली.तर नवऱ्याने बांधकामाचं प्रशिक्षण त्यावेळी घेतलं. तिला पुढे शिलाई काम करण्यास खेड्यात राहणे कठीण झाले. पारधी समाजाची असल्याने कोण शिवायला येणार हा प्रश्न निर्माण झाला. पुढे मग ती एका ठिकाणी मुलींना प्रशिक्षण द्यायला लागली. मानधन चालू झालं. राजश्रीने स्वतःही शिक्षण त्यावेळी सुरु ठेवलं.

पुढे राजश्री आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये जॉबला लागली. तेव्हा ती पिंपरी चिंचवड मधून गरवारे कॉलेजला अपडाऊन करायची. अंतर जास्त असल्याने तिचा खूप वेळ यात जायचा. कॉलेजला जॉब करून ती रात्रशाळेत देखील जायची. तिने बचत गटाचीही तेव्हा सुरुवात केली होती. झोपडपट्टीत राहणारे महिलांसाठी काम तिने सुरु केलं होतं. पण नवऱ्याने पुन्हा तिच्यावर संशय घ्यायला सुरु केलं. लोक नवऱ्याला सांगायची तुझी बायको रात्री १० वाजता येते. एवढा उशिरा कुठली नोकरी असते. बायकोला नोकरी सोडायला लाव.

नवऱ्याने देखील राजश्रीवर संशय घेऊन तिला घराबाहेर काढलं. तेव्हा राजश्री २ दिवस फुटपाथवर राहिली. महानगरपालिकेसमोर ती लेकरांसोबत राहिली. तिथंच भीक मागून तिने आणि लेकरांनी पोट भरलं. पण ती काम करत असलेल्या झोपडपट्टीतील एका बाईने तिला पाहिलं. तेव्हा तिने त्या बाईला सर्व सांगितलं. त्या महिलेने घरी राहायला नेलं. तिथं राजश्री एक महिना राहिली. ती बाई कचरा उचलून जगायची. तिने राजश्रीला सांभाळलं.

त्या महिलेच्या आधारामुळे राजश्री आज उभी आहे. नंतर तिने १० बाय १० ची खोली किरायाने घेऊन पुन्हा संसाराला सुरुवात केली. राजश्री आज नगरसेविका आहे. तरी देखील ती भाड्याच्या घरात राहते. तिने जातीच्या लोकांसाठी अनेक काम चालू ठेवली. गरिबांना मदत करत राहिली. लोकांना जातीचे दाखले काढून दिले. रेशन कार्ड काढून दिले. गरवारे कॉलेजला शिपाई काम करणारी राजश्री शिवाजीनगर मतदारसंघात २०१७ महापालिका निवडणुकीत एसटीचं आरक्षण पडल्याने उभी राहिली. भाजपच्या तिकिटावर राजश्री १५ हजार मतांच्या फरकाने निवडणूही आली.

राजश्रीकडे एकही रुपया निवडणूक लढण्यासाठी नव्हता. पण आरक्षण पडल्याने तिने हि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पारधी समाजात तत्पूर्वी एकही नगरसेविका झालेली नव्हती. राजश्रीने प्रयत्न केला आणि ती राज्यातील पहिली पारधी समाजाची नगरसेविका बनली. ज्या महापालिकेसमोर २ दिवस भीक मागून खाल्लं तिथंच नगरसेविका म्हणून मान मिळवणारी राजश्री अनेकांना आयुष्यात प्रेरणा देणारी कर्तृत्ववान स्त्री आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *