पत्नी आणि पत्नी दोघेही राजकारणात अनेकदा सोबत पदावर असलेले आपण अनेक उदाहरण पाहिले आहेत. पण एक असा योगायोग घडला आहे ज्यात पत्नी हि महापालिकेची महापौर आहे तर पती हा विरोधी पक्षनेता. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असेल असं बोललं जात आहे.
नुकतंच काही दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपची सत्ता शिवसेनेकडे गेली. शिवसेनेचे कमी संख्याबळ असताना भाजपच्या सदस्यांच्या मदतीने शिवसेनेने सत्ता खेचुन आणली आणि शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन महापौर बनल्या. शिवसेनेची पुरेशी सदस्य संख्या नसताना भाजपचे फुटलेले ३१ आणि एमआयएमचे तीन नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेवर भगवा फडकविला.
२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेनेला फक्त १५ जागा मिळाल्या होत्या तर एमआयएमच्या ३ जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला विरोधीपक्षनेते पद मिळाले होते. जयश्री महाजन यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते बनले होते.
भाजपचे अडीच वर्षाची सत्ता बाकी असताना आता भाजपचा ३१ सदस्यांचा गट बाहेर पडला आणि त्यांनी शिवसेनेला साथ दिली. जयश्री महाजन महापौर बनल्या. पण आता महाजन पती पत्नीच्या नावे एक विक्रम झाला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता बनला आहे.
भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना अद्याप स्वतंत्र गट स्थापन करता आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे सुनील महाजन यांच्याकडेच राहिले. कदाचीत महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इतिहासात असा राजकीय योगायोग पहिल्यांदा झाला असेल असे बोलले जात आहे.
जळगाव महापालिकेत जयश्री महाजन या महापौर तर कुलभूषण पाटील हे उपमहापौर बनले आहेत. शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसेंनी हि सत्ता खेचुन आणण्याचं मोठी भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे.