घरात गरिबी असली कि आई वडिलांना आपल्या पोटाला येणाऱ्या अपत्याकडून खूप मोठ्या आशा असतात. आपल्या पोटाला आलेल्या मुलाने किंवा मुलीने शिकून खूप मोठं व्हावं आणि आई वडिलांचं नाव कमावण्यासोबत घरची आर्थिक आणि सर्वच परिस्थिती बदलून टाकावी अशी अपेक्षा असते. आई वडिलांनी सहन केलेली हाल अपेष्टा मुलांच्या वाट्याला येऊ नाही असे त्यांना वाटते. परिस्थितीचे चटके त्यांनी सहन केलेले असतात. अशाच गरीब परिस्थितीचा सामना केलेल्या एका मुलाने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी हे गाव. गावातील बळवंतराव औटी यांचं अत्यंत गरीब शेतकरी कुटुंब. बळवंतराव हे मोलमजुरी शेती करून आपली उपजीविका करत असत. उसाच्या पाचटाचे घर. घर म्हणजे झोपडीच. शाळेचा आणि त्यांचा कधी संबंध देखील आलेला नव्हता. शेतात काबाडकष्ट करून ते उपजीविका करत असत. बळवंतरावांना एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या स्वप्नांचा जन्म झाला. मुलाला शिकून मोठं करायचं ठरवलं. पण त्याच वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचा एक मोठा अपघात झाला ज्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना काही आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हते. ते सावरू लागले तोच त्यांना देवीचा आजार झाला ज्यामध्ये त्यांचे डोळे देखील गेले.
डोळ्याने अंधत्व आणि पायाने अपंगत्व आलेले बळवंतराव तुटून गेले होते. पण त्यांच्या पत्नीने हार मानली नाही. त्यांनी लोकांच्या शेतात राबायला सुरुवात केली. अनवाणी पायाने लोकांच्या शेतात मजुरी त्यांनी केली. प्रचंड वेदना सहन करत कष्ट केले. घरात लहान मुलगा आणि अंथरुणाला खिळलेला पती. दोघांचा सांभाळ त्या एकट्या माउलीला करायचा होता. तिने खूप काबाडकष्ट करून मुलाचे शिक्षण आणि पतीचे उपचार केले.
मुलाला घराजवळच असलेल्या शाळेत टाकले. मुलगा अनवाणी पायाने शाळेत जायचा. डब्बा काय असतो हे देखील त्याला बराच काळ कळलं नाही. कारण शाळेत जेवण न्यायला वडिलांच्या धोतराचं फाडलेलं कापड असायचं. त्यात चटणी भाकर घेऊन शाळेत जायचं. ढिगळं लावलेली कपडे घालून मुलगा शाळा शिकायला लागला. कधीतरी सणासुदीला चपाती घरी खायला मिळायची. त्यामुळे मुलाने शाळेत स्वप्न देखील चपाती खाण्याचे पाहिले.
जुनी पुस्तक घेऊन मुलाने शाळेत अभ्यास केला. आहे त्या परिस्थितीत सर्व अडचणींचा सामना करत मुलाने शिक्षण घेतलं. सुरुवातीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे विद्या विकास हायस्कुल मध्ये प्रवेश घेतला. १० वी पास केली. पुढे गावापासून कॉलेज ६-७ किमी दूर असल्याने कॉलेजला जायचा प्रश्न निर्माण झाला. परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कठीण होते पण गावातील व्यक्तींनी आईवडिलांना समजावून सांगून म्हैस घ्यायला लावली. मुलाने म्हशीचं दूध गावात वाटून सायकलवर कॉलेजला जायला सुरुवात केली.
बारावी सायन्समध्ये यश मिळवलं. पुढील शिक्षणाला ओतूरला जावं लागणार होतं. घरापासून अंतर २० किमी होतं. घरी कर्ज वाढलं होतं. वडील खूप शिव्या द्यायचे. त्यांचा स्वभाव खूप रागीट होता. आई देखील खूप रडायची. हे बघून मुलाने गाव आणि घर सोडण्याचं ठरवलं. म्हैस विकून आईला अर्धे पैसे दिले आणि अर्धे पैसे घेऊन पुणे गाठलं. तिथं गेल्यावर रूम केली. दुधाच्या पिशव्या टाकायला सुरुवात केली. अनेक अडचणी येत होत्या पण हार मानायची नाही ठरवलं. धनकावडीमध्ये एक छोटी रूम ट्युशन घेण्यासाठी मोफत मिळाली. त्यातून लहान मुलांचे ट्युशन घ्यायला सुरुवात केली. १०००-१५०० रुपये भेटायचे.
एक ४५०० महिन्याची नोकरी जॉईन केली. आईला थोडेफार पैसे बचत करून द्यायचे. ट्युशन मोठे करण्याचा प्रयत्न केला. तिथे राजकारणाचा सामना करावा लागला. पुस्तक विक्री करण्याचा बिजनेस सुरु केला. दारोदारी जाऊन पुस्तक विकली. लोक हाकलवून लावायची पण हार मानली नाही. तिथे प्रमोशन झालं. अनेक शहरांचा प्रवास झाला. दरम्यान पैसे देखील चांगले कमावले. गावाकडे जाऊन आधी लोकांचे कर्ज फेडले. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
मुंबईत प्रमोशन झाल्यावर मालक बंगळुरूला परतला. त्यानंतर स्वतःच व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. नाशिकला मोर्चा वळवला. तिथून काम चालू असतानाच कळलं कि वडिलांना कँसर झाला. आता पैसा होता, स्वतःची ४-५ ऑफिसेस उघडली होती. गावातील लोक म्हणत कशाला आता दवाखान्यात पैसे घालवतो. वडिलांचं वय झालय. पण मुलाने हार मानली नाही आणि जिद्दीने नाशिकमध्ये उपचार केले.
स्वतःचा व्यवसाय वाढवला. फूड कंपनीची फ्रॅन्चायजी घेतली. त्यात खूप पैसा लावला. व्यसन लागले. गाडी विकावी लागली. कर्जबाजारी झाला. वडील कँसर मधून नीट होऊन घरी आले पण काही काळात त्यांचं निधन झालं. लग्न झालं. पत्नी आधार बनली. बाहेर देशात स्थायिक झालेल्या भावाने मोठा आधार दिला. आईने अश्रू नयनांनी सांगितलं कि हे असे दिवस पाहायला तुला एवढ्या कष्टानी नाही वाढवलं. त्याच दिवशी व्यसनं सोडली. बायकोचे दागिने गहाण ठेवून पुन्हा शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
नंतर छोटे छोटे प्रोग्रॅम घ्यायला सुरुवात केली. लोकांचा मोटिव्हेशनचे धडे द्यायला सुरुवात केली. ते लोकांना खूप आवडलं. भावाच्या मदतीने बाहेर देशात देखील जाता आलं काम करता आलं. इंडियन इंटेलिजन्स डिपार्टमेंट मध्ये कोचिंगचे धडे द्यायला मिळालं. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची साथ मिळाली. मोठ्या संस्थांमध्ये धडे दिले. प्रगतीचा आलेख वाढत गेला. सर्वे कंपनी सुरु केली. स्वतःचं पब्लिकेशन हाऊस सुरु केलं. ज्या आईने कष्ट करून शिकवलं तिला महागडी गाडी दिली. आईच्या कष्टांचे चीज करणारा हा मुलगा म्हणजे दिलीप औटी. त्यांच्या या संघर्षाला सलाम.