काल पुण्यात भारत विरुद्ध इंग्लड सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. रोमहर्षक सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला. या विजयात भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या काही षटकांमधे केलेला चांगला मारा निर्णायक ठरला. इंग्लंडच्या ८ विकेट लवकर गेल्या होत्या. पण सॅम करणने शेवटपर्यंत आक्रमक फलंदाजी केली. भारताकडून ४८ वे षटक भुवनेश्वरने टाकले त्याने ४ धावा दिल्या. ४९ वे षटक हार्दिक पंड्याने टाकले. त्याने ५ धावा दिल्या. ५० वे षटक कोण टाकणार हा प्रश्न होता. तेव्हा समोर आला भारताचा नवा यॉर्कर किंग टी नटराजन. त्याने १४ धावा लागत असताना अवघ्या ६ धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताचा यॉर्कर किंग अशी ओळख बनवत असलेल्या टी नटराजनचा क्रिकेटमधील प्रवास सोपा राहिला नाहीये. एकेकाळी टेनिस बॉल घेण्याची ऐपत नसलेल्या टी नटराजनने आईसोबत रस्त्यावर चिकन विकले आहे. आज टी नटराजन भारतीय संघाकडून टेस्ट, वनडे, टी २० तिन्ही प्रकारात क्रिकेट खेळतोय. त्याने आपली छाप सोडली आहे. बघूया त्याचा क्रिकेटर बनण्याचा संघर्ष..
२०२० चं आयपीएल संपल्यानंतर भारताच्या या उभरत्या स्टारची देशातच नाही तर जगभरात चर्चा सुरु झाली. जो टेनिस बॉल घ्यायला महाग होता तो लेदर बॉलने मैदान गाजवत होता. या भारतीय यॉर्कर किंगचे नाव आहे थंगरासु नटराजन.
टी नटराजन चा जन्म २७ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील सालेमच्या चिन्नप्पमपट्टी या छोट्याशा खेडेगावात झाला. टी नटराजन चे पूर्ण नाव थंगरासू नटराजन आहे. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यामुळे वडील नोकरी करत होते. तर आई हि रस्त्याच्या कडेला चिकन विकायचे काम करायची. टी नटराजनच वय आज २९ वर्ष आहे. परिस्थितीमुळे त्याचे लग्न देखील लवकरच झाले.
संघर्षाच्या काळात टी नटराजनच्या कुटुंबाला कधी कधी एक वेळचं जेवण देखील मिळायचं नाही. उपाशी पोटी त्यांना झोपावं लागायचं. जे कुटुंब एकवेळच्या जेवणासाठी महाग होते त्या कुटुंबातून येऊन क्रिकेटमध्ये एवढं मोठं बनणं हे अशक्यप्राय गोष्ट शक्य झाल्यासारखं आहे.लहानपणीपासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या नटराजनकडे क्रिकेट खेळायला लहानपणी बूट नसायचे तर कधी टेनिस बॉल नसायचा. पण त्याने कधी हार मानली नाही.
जेव्हा तो टेनिस बॉलने खेळायचा तेव्हा त्याच्या ऍक्शनवर प्रश्न निर्माण झाले होते. काही दिवस खेळणं बंद झालं पण हार नाही मानली. मैदानावर परतायला वेळ लागला पण आल्यावर सर्वाना थक्क केलं. त्याने एकाच ओव्हरमध्ये ६ यॉर्कर टाकून सर्वाना स्तब्ध केले होते. क्रिकेट खेळताना अनेकदा परिस्थितीमुळे अडचणी येत होत्या.
त्याचे गुरु ए. जयप्रकाश यांची नजर त्याच्यावर पडल्यापासून आयुष्य बदलत गेलं. त्यांनी त्याला चेन्नईला पाठवले. सर्व संकटं जयप्रकाश दूर करत गेले. त्याला सर्वप्रथम तामिळनाडू कडून २०११ मध्ये संधी मिळाली. चांगलं प्रदर्शन केलं. त्याच्या प्रदर्शनामुळे रणजी संघात स्थान मिळालं. ५ जानेवारी २०१५ ला तामिळ्नाडूकडून पहिला रणजी सामना खेळला. पुढे त्याला २०१७ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने ३ कोटीला खरेदी केले. पण सहा सामन्यात फक्त २ विकेट मिळाल्या. पुढे जखमीही झाला आणि सामने खेळायला मिळाले नाही.
खराब प्रदर्शनामुळे पुढे ३ कोटीची किंमत आयपीएलमध्ये ४० लाख झाली. पण या किमतीत त्याला सनरायजर्स हैद्राबादने खरेदी केले अन त्याचे आयुष्यच बदलले. आज त्याची आयपीएलमध्ये देखील वेगळी ओळख बनली आहे. राहायला घर नव्हतं. पैसे आल्यावर आधी घर बांधलं. गावात मुलांसाठी क्रिकेट अकॅडमी सुरु केली.
टी नटराजनने २०२० आयपीएलमध्ये एबी डिव्हिलिअर्स सारख्या दिग्गज फलंदाजांची त्रिफळे उडवले. त्याने या सिजनमध्ये ६० यॉर्कर टाकले होते. आयपीएलनंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका विजयात महत्वाची कामगिरी बजावली. त्याला वरून चक्रवर्ती जखमी झाल्याने संघात स्थान मिळाले आणि त्याने या संधीचे सोने करत सर्वच फॉरमॅट मध्ये एकाच दौऱ्यात पदार्पण केले.