ज्या अर्थी आपणाला ट्रॅक्टरची पुढची आणि मागची चाके लहानमोठी का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे, त्या अर्थी आपण नक्कीच ट्रॅक्टर किंवा शेतीशी निगडित कुठल्यातरी व्यवसायात कार्यरत असला पाहिजेत. बरोबर ना ? तर मंडळी आपल्याला असणारे हे कुतूहल दूर करण्यासाठीच आम्ही आज हा लेखन प्रपंच मांडला आहे. परंतु त्यापूर्वी ट्रॅक्टर म्हणजे नेमकं काय हे देखील आम्ही आपणास सांगणार आहोत.
ट्रॅक्टर म्हणजे काय ? ट्रॅक्टरचे इंजिन खरंच खूप शक्तिशाली असते का ?
मित्रांनो ट्रॅक्टर म्हणजे काय आणि तो इतर वाहनांपेक्षा वेगळा कसा आहे हे आपण पाहूया. ट्रॅक्टर (Tractor) हा शब्द ट्रॅक्शन (Traction) या शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे खेचणे किंवा ओढणे. त्यामुळेच ट्रॅक्टरचा उपयोग आतापण जड वस्तू खेचण्यासाठी किंवा ओढून नेण्यासाठी करतो. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये एक गैरसमज मोठ्या प्रमाणावर आढळतो तो म्हणजे लोकांना वाटते की ट्रॅक्टरचे इंजिन खूप शक्तिशाली असते. परंतु हे खरं नाही.
कारच्या तुलनेत ट्रॅक्टरच्या इंजिनची क्षमता कमी असतानाही ट्रॅक्टर अधिक भर कसा खेचतो ?
ट्रॅक्टर अवजड वस्तू खेचून नेण्यामध्ये सक्षम असतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ट्रॅक्टरचे इंजिन जास्त शक्तिशाली असेल. प्रत्यक्षात आपण पाहिले असेल की कारच्या तुलनेत ट्रॅक्टर आपल्या क्षमतेपेक्षा अधिक भार सहजरित्या खेचून नेऊ शकतो. सर्वसाधारणपणे ट्रॅक्टरच्या इंजिनची क्षमता ही कारच्या इंजिनच्या दोन तृतीयांश (२/३) असते.
परंतु ट्रॅक्टरमध्ये टॉर्क (Torque) म्हणजेच चाक फिरवण्याची किंवा खेचण्याची क्षमता ही कारपेक्षा दीडपट अधिक असते. गियरच्या मदतीने ट्रॅक्टरची गती कमी करुन कारच्या तुलनेत अधिक ट्रॅक्शन किंवा टॉर्क निर्माण करता येते. हाच टॉर्क ट्रॅक्टरमध्ये भार ओढण्याच्या कामी येतो आणि या खेचण्याचा क्षमतेलाच ट्रॅक्शन म्हणतात.
ट्रॅक्टरची पुढची आणि मागची चाके लहानमोठी का असतात ?
वास्तविकरीत्या बाईक किंवा कारच्या तुलनेत ट्रॅक्टर चिखलात किंवा मातीत सहजरित्या काम करु शकतो. बाईक किंवा कारच्या टायरमध्ये ग्रीप किंवा ट्रॅक्शन कमी असल्याने त्याचे टायर चिखल किंवा मातीत अडकतात. परंतु ट्रॅक्टरच्या बाबतीत असे होऊ नये तसेच ट्रॅक्टरचे इंजिन पुढे असल्याने संतुलन साधण्यासाठी ट्रॅक्टरचे पाठीमागचे टायर मोठे असतात आणि त्याला चांगली ग्रीप मिळण्यासाठी त्याला रबराचे उंचवटे केले जातात. ट्रॅक्टरला वळण्यासाठी सोपं जावं आणि समोरचं व्यवस्थितरीत्या दिसावं म्हणून पाठीमागच्या टायरच्या तुलनेत ट्रॅक्टरचे पुढचं टायर लहान असतात.