दुष्काळग्रस्त तालुका अशी ज्या तालुक्याची ओळख तो सांगली जिल्ह्यतील तासगाव तालुका. पिण्याच्या पाण्यासाठी देखील येथील लोकांना टँकरवर अवलंबून राहावं लागायचं. याच मागासलेल्या तालुक्यापासून २० किमी असलेल्या एका खेडेगावातील एक तरुण राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. फक्त वेगळी ओळखच नाही तर राजकारणात येऊन त्याच्या प्रवास जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री इथपर्यंत होतो.
तासगाव तालुक्यातील अंजनी या छोट्याशा गावात रामराव पाटील यांचं प्रतिष्ठित कुटुंब होतं. शेतात कामाला ३-४ गडी. बागायती शेती होती. छोटंसं पण गावाच्या मानाने मोठं किराणा दुकान होतं. रामरावांच्या शेतात महिनाभर गुऱ्हाळ नियमितपणे चालायचं. रामराव गावचे सरपंच होते. १६ ऑगस्ट १९५७ रोजी रामरावांना मुलगा झाला. कुटुंब खूप आनंदी होतं. त्याचं नाव रावसाहेब ठेवण्यात आलं. रावसाहेबांचे बालपण झाल्यानंतर शाळेत जायला लागले. गावातच शिक्षण सुरु होतं.
रावसाहेब सातवी मध्ये जाईपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. पण खेड्यातली कुटुंब खूप जास्त काळ एकत्र राहणे म्हणजे एक अपवादच असतो. रावसाहेब सातवीत असताना रामरावांच्या घरी देखील कुटुंबात ठिणगी पडली. रामरावांचं मोठं कुटुंब विभक्त झालं. वाटण्या झाल्या, दावे प्रतिदावे सुरु झाले. वाटण्यावरून संघर्ष झाला. वाद वाढतच गेला आणि कोर्टापर्यंत पोहचला. जमिनी पडीक पडल्या. उत्पन्न घटले, जमिनी विकाव्या लागल्या. सर्व प्रतिष्ठा गेली. रामरावांना खुप व्यसन लागलं. गरिबी सोबत अनेक संकट आले. वाटण्यानंतर रावसाहेबांच्या वडिलांच्या वाट्याला फक्त ३ एकर जमीन आली.
रावसाहेबांचे वडील व्यसनाच्या अधीन गेले होते. घरात आई आणि पाच भावंडात थोरले रावसाहेब होते. सुखी असलेल्या या पाटील कुटुंबाला नजर लागली होती आणि त्यांच्या नशिबात संघर्ष आला होता. संघर्षातच त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. ११ वी पास झाल्यानंतर वडिलांची तब्येत आणखीनच बिघडली होती. त्यामुळे रावसाहेब आणि आईच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या होत्या.
रावसाहेबांच्या शिक्षणाचा खर्च आणि रामरावांचा खर्च आईला शेतीतून भागवणे कठीण होऊ लागले. सण तर कसे आले आणि कसे गेले हे देखील कळत नव्हतं. खूपच गरीब परिस्थिती निर्माण झाली होती. दिवाळी देखील फक्त गरम पाण्याच्या अंघोळीवर भागायची अशी परिस्थिती. खूप कष्ठाचे ते दिवस होते. रामरावांना कॉलेजला प्रवेश घ्यावा का नोकरी करावी हा प्रश्न सतावू लागला.
आईचा आग्रह मात्र शिक्षण घेतले पाहिजे असा होता. कारण अशिक्षित आईने शिक्षणाने अनेकांचं आयुष्य बदललेले पाहिले होते. कॉलेजला बीए च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. वडिलांची तब्येत अधिक बिघडली होती. पण आईने अभ्यासात लक्ष लागणार नाही म्हणून कळू पण दिलं नाही. परीक्षा ३ दिवसावर आल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी आली. शांतिनिकतनला त्यावेळी रावसाहेब होते. पण गावाकडे भावकीच्या गडबडीमुळे रावसाहेब येण्याच्या आधीच अंत्यसंस्कार पार पडले. दुसऱ्या भावांनी अग्नी दिला.
वडिलांच्या निधनानंतर ते आईच्या कुशीत डोकं ठेऊन खूप रडले. आई अशिक्षित होती पण तिला ३ दिवसावर आलेल्या परीक्षेची जाणीव होती. गावातील एका मोटरसायकल वर राख सावडून रावसाहेब परीक्षेच्या पहिल्या पेपरला गेले. मनस्थिती नसताना पेपर लिहिला. त्याच पेपरमधे सांगली शहरात ते पहिले आले होते. शाळेत चौथीला, सातवीला तालुक्यात पहिला. दहावीला केंद्रात पहिले आले होते.
प्राचार्य पी बी पाटील यांनी सांगलीत शांतिनिकेतन कॉलेज सुरु केलं होतं. दहावीला चांगले मार्क असताना रावसाहेब सायन्सचा खर्च झेपणार नाही म्हणून आर्ट्सला गेले. ११ वी, १२ वीचा खर्च धकवणे कठीण होते. त्यामुळे त्या परिस्थितीत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न चालू केला. नोकरीच्या शोधात सांगलीच्या कारखान्यात वॉचमन आणि क्लार्कची जागा असल्याचे कळले. दोन्ही पदासाठी अर्ज केला. एमडीने सांगितलं क्लार्कच्या जागा नाहीत. रावसाहेब म्हणाले वॉचमन पण चालेल.
एमडी खालून वरून रावसाहेबांना बघून म्हणाला तुम्ही अन वाचमन. तुम्हालाच चोर उचलून नेतील असं तो म्हणाला. कारण त्यावेळी रावसाहेबांची तब्येत खूप बारीक आणि उंची कमी होती. वॉचमनची नोकरी देखील नाकारली गेली. पण शांतिनिकेतन मध्ये १ रुपया ७५ पैशावर रोज चार तास काम केलं. पी बी पाटील त्यावेळी आमदार होते. अनेकदा कॉलेजमध्ये त्यांचं भाषण ऐकलं. कॉलेजमध्ये ते संघर्ष करू लागले.
हळू हळू राजकारणाकडे कल वाढला. गरिब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरु तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला वसंतदादा पाटलांनी हेरले. मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर रावसाहेब पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरु केली. पहिल्यांदा १९७९ साली सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. १९९० साली पहिल्यांदा विधान सभेवर निवडून आले. १९९० ते २०१४ या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले.
एकेकाळी वॉचमनची नोकरी नाकारलेला रावसाहेब पाटील राज्याच्या राजकारणात आबा बनला. जिल्हा परिषद सदस्य पदापासून सुरु झालेला प्रवास सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहचला. हा रावसाहेब नावात साहेब असूनही कधी साहेब बनला नाही. तो शेवटपर्यंत आर आर आबाच राहिला.