आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे या जोडगोळीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी खूप कष्ट घेतले. हे दोन शिलेदार नसते तर संयुक्त महाराष्ट्राची लढाई जिंकणे दुरापास्त होते. त्या दोघांमध्ये घनिष्ट अशी मैत्र होती. ज्यावेळी लोकवर्गणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी तोफा डागणारे अत्र्यांचे “मराठा” दैनिक सुरु झाले, त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एवढेच नाही तर ठाकरेंच्या मुलांनी म्हणजेच बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी मराठीभाषिक महाराष्ट्राच्या विरोधकांची खिल्ली उडवणारी अनेक व्यंगचित्रे अत्रेंच्या “मराठा”साठी काढून दिली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही काय स्वतंत्र संघटना नव्हती, तिच्यात असणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे होते. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राबाबत केलेला पक्षपात पाहता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारी एखादी स्वयंसेवी संघटना असावी असे अत्रेंना नेहमी वाटायचे.
त्यामुळेच १९ जुलै १९५९ च्या “मराठा”मध्ये अत्रेंनी “आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हांक, शिवसेना उभारा !” असे पोटतिडकीने आव्हान केले होते. शिवसेना या नावाचा पहिला उल्लेख अत्रेंनी केला होता. त्यांनी आपल्या घरालाही “शिवशक्ती” हे नाव दिले होते.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, अत्रेंच्या लेखातील विचार प्रबोधनकार ठाकरेंच्या मनात घोळत राहिले. पुढच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत फूट पडली. त्यानंतर अत्रेंची लेखणी थंडावली, मात्र प्रबोधनकारांनी मुंबईत मराठी माणसांच्या होणाऱ्या पीछेहाट पाहून “मार्मिक” मधून प्रहार करायला सुरुवात केली. १९६३ मध्ये मराठामधून लेख लिहून अत्रेंनी शिवसेना कशी असेल याचे विचारही मांडले होते. प्रबोधनकारांना ते पटले नाहीत.
…..तर आचार्य अत्रे बनले असते पहिले शिवसेनाप्रमुख !
प्रबोधनकार आणि अत्रेंमध्ये दुरावा निर्माण झाला होता. दोघांमधील वाद खूप विकोपाला गेले. मराठा आणि मार्मिकच्या तोफा रोज एकमेकांविरुद्ध धडाडू लागल्या. दोघांमध्ये मिटवामिटवी करण्याचेही प्रयत्न झाले. १९६६ मध्ये शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्या मेळाव्यात शिवसेनेने अत्रेंना संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी आवाहनही केले गेले. पण वैयक्तिक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अत्रे शिवसेनेपासून दूरच राहिले.
ज्या अत्रेंनी शिवसेनेच्या स्थापनेची संकल्पना मंडळी तेच अत्रे शेवटच्या काळात शिवसेनेचे सर्वात मोठे विरोधक बनले. पण ठाकरे आणि अत्रे यांच्या मनात एकमेकांविषयी भावनिक ओलावा कायम राहिला. १३ जून १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. अत्रेंच्या निधनानंतर मार्मिकने “असा पुरुष होणे नाही” हा लेख लिहला. कदाचित १९६६ साली शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ते गेले असते, तर आचार्य अत्रे पहिले शिवसेनाप्रमुख बनले असते.