तुकाराम मुंढे हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर येतो त्यांचा कामातील धडाकेबाजपणा. आपल्या धडाकेबाज स्वभावामुळे तुकाराम मुंढे हे नाव प्रसिद्ध आहे. राजकारण्यांपुढे हांजी हांजी न करण्यासाठी तुकाराम मुंढे सर्वश्रुत आहेत. तुकाराम मुंढे आणि बदली हे तर मागील अनेक वर्षांपासूनचं समीकरणच बनलं आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या मागील १३ वर्षात १६ वेळा बदल्या झाल्या आहेत. मुंढे यांची मागील वर्षी जानेवारीला नागपूर महापालिकेत आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर ७ महिन्यात पुन्हा त्यांची बदली झाली होती. तुकाराम मुंढे यांच्या नावाला एक ध्येयवेडा आयएएस अधिकारी असा शिक्का लागला आहे.
तसं तर तुकाराम मुंढे यांचा जीवनप्रवास अगदी शून्यातून सुरु झाला. जन्म बीड जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातला. ताडसोना हे २-३ हजार लोकवस्तीचं त्यांचं गाव. मुंढेंचा जन्म ३ जून १९७५ रोजी झाला. हलाखीच्या परिस्थितीत असलेले त्यांचे कुटुंब संस्कार आणि शिकवणीच्या बाबतीत मात्र खूप श्रीमंत होते. यामुळे मुंढेंना बालपणीच प्रामाणिकता, सत्य आणि बेडरपणाचे धडे मिळाले.
मुंढेंच्या वडिलांची परिस्थिती मराठवाड्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच होती. सावकारांचे कर्ज त्यांच्यावरही होते. पण मुलांना शिक्षणासाठी मात्र त्यांनी काही कमी पडू दिल नाही. हरिभाऊ मुंढेंनी म्हणजे तुकाराम मुंढेंच्या वडिलांनी मुलाला औरंगाबादला शिक्षणासाठी पाठवले. तुकारामांनी औरंगाबाद मधेच आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं.
इतिहास, सामाजिक शास्त्र विषयात त्यांनी बीएची पदवी घेत राज्यशास्त्र विषयात एमए केले. शिक्षणासोबतच इतरांप्रमाणे त्यांचीही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु होती. याच तयारीच फळ म्हणून त्यांना राज्यसेवा परीक्षेत यश मिळालं देखील. २००१ मध्ये दुसऱ्या दर्जाची वित्त विभागात हि नोकरी मिळाली. पण दुसऱ्या दर्जावर समाधान मानणारे मुंढे नव्हते.
मुंढेंनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. मिळालेल्या नोकरीची निवडप्रक्रिया वेळखाऊ असल्याने २ महिने त्यांनी जळगावात व्याख्याता म्हणून देखील काम केले. पुढे २००५ मध्ये त्यांचं यशदामध्ये प्रशिक्षण सुरु असताना त्यांना यूपीएससीमध्ये यश मिळाल्याची बातमी समजली. फक्त पासच नाही झाले तर ते देशात २० वे आले होते. त्यानंतर सोलापूरमधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.
सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी असताना केलेली वाळू माफियांवरील कारवाई राज्यभर गाजली. पुढे त्यांच्याकडे नागपूर जिल्हा परिषदेवर सीईओ, नवी मुंबईत महापालिका आयुक्तपद, पुण्यात पीएमपीएमएलचे अध्यक्षपद, नांदेडला उपजिल्हाधिकारी, जालन्यात जिल्हाधिकारी, आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी, नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पद असे अनेक पद आली.
तुकाराम मुंढेच्या आयुष्यातील एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. कारण मुंढे सारख्या अधिकाऱ्याला मुलींनी लग्नासाठी नकार दिला होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल कस शक्य आहे? तर या नकार देण्यामागे एक कारण होते, ते म्हणजे तुकाराम मुंढे यांनी घातलेली एक अट. जिल्हाधिकारी असल्याने त्यांना सर्व नावाजलेल्या मोठ्या मोठ्या घरची स्थळं येऊ लागली. त्यावेळी त्यांनी मुलीला वेळप्रसंगी बसने प्रवास आणि भाड्याच्या घरात राहावं लागेल अशी अट घातली. त्यावेळी अनेक श्रीमंतांच्या मुलींनी लग्नास नकार दिला. पण शेवटी एका वारकरी घरातील मुलीने त्यांना होकार देत लग्न केले.