महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. यामध्ये दिल्लीतील मंडळींनी देखील उडी घेतल्याने अधिकच भर पडली. मागील २-३ दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांचे नाव देखील खूप चर्चेत आले आहे. सेना खासदार अरविंद सावंत आणि त्यांच्यात बिनसल्याचं बोललं गेलं. नवनीत कौर या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. पण त्या सध्या राष्ट्रवादीविरोधात उतरल्याचे चित्र आहे.
एक तेलगू अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर महाराष्ट्रात येऊन अमरावतीच्या खासदार कशा बनल्या हे तुम्हाला कदाचित माहितीही असेल. नवनीत राणा यांचा एक अभिनेत्री ते अमरावतीच्या खासदार हा प्रवास तसा साधा सरळ आहे. नवनीत राणा या सध्या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत. त्यांचे वयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. आज जाणून घ्या कशा त्या रामदेव बाबांच्या आश्रमातील त्या एका भेटीमुळे राजकारणात आल्या.
नवनीत कौर यांनी अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदार संघातील आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले आहे. नवनीत कौर यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला. खरंतर नवनीत यांचं कुटुंब पंजाबचं. पण वडील सैन्यात मोठे अधिकारी होते. त्यामुळे हे कुटुंब मुंबईत स्थायिक झालं होतं. नवनीतला सुरुवातीपासून मॉडेलिंग ची आवड होती.
नवनीत यांनी आपली १० वी झाल्यावरच मॉडेलिंग करण्याचं मनावर घेतलं. आणि मॉडेलिंग सुरु देखील केली. सुरुवातीला एक म्युझिक अल्बम मध्ये काम देखील मिळालं. तसं दिसायला सुंदर असल्याने त्यांना काम मिळायला अडचण आली नाही. अनेक म्युझिक अल्बम त्यांना मिळत गेले. पण मोठी संधी काही त्यांना मिळत नव्हती.
शेवटी त्यांनी साऊथकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे दर्शन या सिनेमात त्यांना पहिली संधी मिळाली. हा सिनेमा बऱ्यापैकी चालला. त्यांना हळू हळू कन्नड, तेलगू, तामिळ सिनेमात देखील ओळख मिळाली. सीनू, वसंथी, लक्ष्मी, चेतना, जग्पतथी, गुड बॉय आणि भूमा या सिनेमात भूमिका केली. त्यांचे नाव हळू हळू साऊथच्या टॉपच्या अभिनेत्रींनमध्ये पोहचु लागलं.
पण त्यांच्या नशिबात अभिनय नाही तर राजकारण होतं. त्या योग शिकण्यासाठी रामदेव बाबांच्या आश्रमात जात असत. एका योगाच्या शिबिरात त्या आश्रमात आल्या होत्या. या शिबिरास रवी राणा हे देखील आले होते. तिथे दोघांची चांगली ओळख आणि मैत्री झाली. पुढे त्या रवी रानाच्या सामाजिक कार्यक्रमांना अमरावतीत येऊ लागल्या. हळू हळू दोघे एमकेकांचे चांगले मित्र बनले आणि प्रेमात पडले. रवी रानांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवताच नवनीतने तात्काळ होकार दिला.
दोघांनी कुटुंबीयांची परवानगी घेत हे लग्न करण्याचं ठरवलं. ज्यांच्यामुळे ओळख झाली त्या रामदेव बाबांचे आशीर्वाद घेतले. आता एवढी मोठी अभिनेत्री आणि एक नेता म्हणल्यावर धुमधडाक्यात लग्न होणार असेच सर्वाना वाटले. पण या दोघांनी मात्र सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचं ठरवलं. त्यांनी ३००० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. ३,००० जोडप्यांपैकी ३५० जोडपे अंध तर ४७० जोडपी दिंव्यांग होती. या सोहळ्यात त्यांनी लगीन गाठ बांधली.
रवी राणा यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हळू हळू त्या देखील सुरुवातीला सामाजिक कार्यात आणि पुढे राजकारणात सक्रिय झाल्या. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावती लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यात शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी हार मानली नाही. २०१९ ला पुन्हा तयारी केली आणि अपक्ष उभा राहिल्या. राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांना मिळाला. त्या निवडून आल्या आणि खासदार बनल्या.