IPL च्या चौदाव्या सिजनला काल रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात मुंबईचे पारडे सुरुवातीला जड दिसत होते. पण RCB ने मुंबई इंडियन्सचा पराभव करत नव्या सिजनचा पहिला सामना आपल्या नावावर केला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा लवकर रनआऊट झाल्यानंतर ख्रिस लिन आणि सूर्यकुमार यादव यांनी जोरदार फटकेबाजी करत मुंबईची धावगती वाढवली. मुंबई मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे असे वाटत असताना मुंबईच्या इनिंगला ब्रेक लागला.
३ बाद १३५ अशा मजबूत स्थितीत असलेल्या मुंबई संघाला ब्रेक लावला तो नवोदीत गोलंदाज हर्षल पटेल याने. आपल्या पहिल्याच षटकात १५ धावा देणाऱ्या हर्षल पटेलने भेदक मारा केला. त्याने ४ ओव्हरमध्ये २७ रन देऊन ५ विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात मुंबईविरुद्ध आतापर्यंत कोणीच ५ विकेट घेऊ शकलं नव्हतं. अशी कामगिरी करणारा हर्षल पटेल पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुंबईविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम रोहित शर्माच्याच नावावर होता. रोहितने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्स कडून खेळताना २ ओव्हरमध्ये ६ रन देऊन ४ विकेट घेतल्या होत्या.
हर्षल पटेलने या सामन्याच्या २० व्या षटकात तर कमालच केली. त्याने शेवटच्या षटकात अवघी १ धाव दिली आणि ४ विकेट घेतल्या. त्यात एका रनआऊट चा समावेश होता. हर्षलने हार्दिक पांड्या, ईशान किशन, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या आणि मार्को जेनेसन यांच्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या. मागच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या हर्षलला RCB ने ट्रेड करून घेतलं होतं.
तो निर्णय बदलला नसता तर आज अमेरिकेत काम करत बसला असता हर्षल पटेल-
हर्षल पटेल हा मूळचा गुजरातचा आहे. २३ नोव्हेंबर १९९० रोजी गुजरातमधील सानंद शहरात त्याचा जन्म झाला. ३० वर्षीय हर्षलने आपले शिक्षण एच.ए. कॉलेज ऑफ कॉमर्स अहमदाबाद येथे पूर्ण केले आहे. हर्षलचे वडील विक्रम पटेल हे एका विमान कंपनीत नोकरी करतात. तर आई दर्शना पटेल या डंकिन डोनट्स मध्ये काम करतात.
हर्षल पटेल हा अमेरिकेचा नागरिक देखील आहे. हर्षलचे कुटुंब २००५ मध्ये अमेरिकेला कामानिमित्त गेले आणि तिकडेच स्थायिक झाले. पण हर्षलला मात्र लहानपणीपासूनच क्रिकेटची आवड होती. त्यामुळे त्याने भारतातच राहायचा निर्णय घेतला. तो देखील अमेरिकेला जाणार होता पण त्याचे कोच तारक त्रिवेदी यांच्यामुळे त्याचा निर्णय बदलला. हर्षलचं कुटुंब आज लिंडन न्यू जर्सी अमेरिका येथे राहते.
हर्षल हा ८ वर्षाचा होता तेव्हापासून तारक त्रिवेदी यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेऊ लागला. २००८ मध्ये तो अग्रेसिव्ह क्रिकेट क्लबकडून न्यू जर्सीच्या क्रिकेट लीगमध्ये देखील खेळला होता. २००८-०९ मध्ये त्याची निवड अंडर १९ संघात झाली. विनू मंकड ट्रॉफीमध्ये त्याने चांगली कामगिरी करत २३ विकेट घेतल्या होत्या. त्याचं बक्षीस म्हणून त्याची गुजरात संघात निवड झाली. २०१० सालच्या अंडर १९ वर्ल्डकप संघाचा देखील तो सदस्य होता. पण संधी नाही मिळाली. मुंबईच्या पराभवास कारण ठरलेल्या हर्षलला आयपीएलमध्ये पहिली संधी मुंबई इंडियन्सनेच २०१० मध्ये दिली होती. त्याला ८ लाख रुपयात खरेदी केलं होतं. पण सामना काही खेळण्यास मिळाला नाही.
गुजरात संघात पुढे त्याला जास्त संधी मिळत नव्हत्या. त्यामुळे गुजरात मध्ये क्रिकेटचे भविष्य न दिसल्याने तो हरियाना मध्ये गेला आणि तिथे डोमेस्टिक क्रिकेट खेळला. २०११-१२ च्या आयपीएल सिजनमध्ये तो बंगळुरू संघात होता. तेव्हा पण संधी नाही मिळाली. २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने घेतले. तेव्हा पण कमी संधी मिळाल्या. पण १३ व्या सिजनमध्ये मात्र दिल्लीकडून संधी मिळाल्या. दिल्ली संघाकडून बंगरुळु ने त्याला ट्रेड करून घेतले. अन पहिल्याच सामन्यात त्याने संधीचं सोनं केलं.