गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी फक्त प्रचंड इच्छाशक्ती हवी. इच्छाशक्तीच्या बळावर गावचा चेहरा मोहरा बदलला जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी. पेरे पाटलांमुळे आज पाटोड्याचे गाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे.
या गावाने स्वच्छता अभियानात अनेक पुरस्कार पटकावले. मग तो स्वच्छता अभियानात दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला पहिला राज्यस्तरीय पुरस्कार असो कि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार असो. गावाने फक्त पुरस्कारच मिळवले नाही तर गावाचा विकास देखील तेवढाच झाला.
पाटोदा हे गाव मराठवाड्यातील महत्वाचे शहर असलेल्या औरंगाबाद पासून अवघ्या २० किलोमीटर वर. गावची लोकसंख्या देखील जास्त नाही. अवघ्या साडे तीन हजाराच्या आसपास गावची लोकसंख्या. पण हे गाव आज मात्र देशभर प्रसिद्ध आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे पेरे पाटील यांचा पाटोदा पॅटर्न. याच पाटोदा पॅटर्नने ग्रामपंचायतला वर्षाला ३० लाख रुपये उत्पन्न मिळवून दिले.
खेडेगाव म्हंटलं कि कर भरण्याचा विषयच नसतो. पण पेरेंनी मात्र आधी कर भरण्यासाठी लोकांना तयार केले. हळू हळू १०० टक्के कर भरणा गावात सुरु झाला. कराची रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारली जाऊ लागली. याच कराच्या पैशातून त्यांनी गावकऱ्यांना अनेक सुविधा मोफत द्यायला सुरुवात केली. गावात एवढे उपक्रम सुरु झाले कि ते लक्षात ठेवणं देखील कठीण होत गेले.
पाटोदा ग्रामपंचायतीची स्थापना १९९५ ची. त्यावेळी लोकसंख्या होती २८५० जी कि आज आहे ३५०० च्या आसपास. पेरे हे ग्रामपंचायतची स्थापना झाल्यापासून सलग २५ वर्ष सदस्य होते. तसेच सरपंच देखील राहिले. यावर्षी झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांच्या मुलीने राजकारणात प्रवेश करत ग्रामपंचायत लढवली खरी पण त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला.
पाटोद्यात पाण्याची समस्या खूप होती. शिवाय स्मशानभूमी नव्हती, चांगले रस्ते नव्हते. त्यावेळी करामधून फक्त १ लाख उत्पन्न मिळायचे. लोक ते देखील भरायला टाळायचे. पण पेरेंनी असा पॅटर्न तयार केला कि हे उत्पन्न ३० लाखावर पोहचले. टॅक्स भरणाऱ्या लोकांना त्यांनी अनेक सुविधा मोफत द्यायला सुरु केल्या.
याच मोफत सुविधांमुळे लोक टॅक्स भरायला तयार होणार हे त्यांनी हेरलं होतं. गावात यासाठी १ लाख खर्चून त्यांनी पिठाची गिरणी सुरु केली. या गिरणीमध्ये जे टॅक्स भरतील त्यांना मोफत दळण द्यायला सुरु केले. दळणाला कसंही नाही म्हंटल तर हजार रुपये जायचेच. त्यामुळे महिलांनी टॅक्स भरणेच त्यापेक्षा परवडेल हे ओळखले. टॅक्स हा सुरुवातीला ४०० रुपये होता जो कि हळू हळू आता ४००० रुपयांपर्यंत पोहचला आहे.
टॅक्स वाढला खरा पण मोफत सुविधा देखील खूप वाढल्या आहेत. गावात २४ तास तुम्हाला शुद्ध पाणी पुरवठा होताना दिसेल. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटर बसवलेले आहेत. याशिवाय गावात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. एवढे सीसीटीव्ही कॅमेरे असणारे पाटोदा हे एकमेव खेडेगाव असेल.
तसेच प्रत्येक घरासमोर झाड, कचराकुंडी आहेत. गावात कुठेही कोणालाही सहज उपलब्ध होतील असे अनेक गल्लीमध्ये हाथ धुण्यासाठी बेसिन आहेत. गावात लोकांचं सोबत उठणं बसणं व्हावं म्हणून भंडारा ठेवण्यात येतो. गावात वेळेवर लाईट बिल भरल्यामुळे लाईट कधीच जात नाही. पाटोद्यात घरोघरी शौचालय आहे. गावच्या स्मशानभूमीत तर जांभळाची असंख्य झाडं लावलेली आहेत. तिथे गेल्यावर ती स्मशानभूमी आहे का गार्डन असा प्रश्न पडतो.
गावचे विकासपर्व व्हिडीओ स्वरूपात-