Sunday , May 28 2023
Breaking News
Home / महाराष्ट्र / त्यांना पक्षानं खरंच मुख्यमंत्री घोषित केलं, पण सर्व म्हणायचे चुकीनं नाव घोषित झालं असेल!

त्यांना पक्षानं खरंच मुख्यमंत्री घोषित केलं, पण सर्व म्हणायचे चुकीनं नाव घोषित झालं असेल!

महाराष्ट्राला एक असा मुख्यमंत्री लाभला होता जो पदावर कमी दिवस राहिला पण पर्मनंट माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. हा असा मुख्यमंत्री होता ज्याची पेपरला न्यूज छापायची म्हणलं तरी पत्रकारांपुढे प्रश्न पडायचा कि आता त्यांचा फोटो आणायचा तरी कुठून. यावरूनच लक्षात येतं कि हे मुख्यमंत्री प्रसिद्धीपासून किती दूर होत. आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे ते पत्रकारांचे आवडते नेते देखील बनले होते. या मुख्यमंत्र्यांचा प्रवास जितका संघर्षमय आहे तितकाच तो रंजकही आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले बाबासाहेब भोसले यांचं खटाव तालुक्यातील कलेढोण हे गाव. वडील अनंतराव एक प्राथमिक शिक्षक. कलेढोण मधेच बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं. तर सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पुढचं शिक्षण झाले. पुढे ते कॉलेजला कोल्हापूरला गेले. तिथं कॉलेज झाल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबीच शिक्षण घेतलं. येवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी इंग्लंडमध्ये देखील शिक्षण घेतलं.

विद्यार्थी संघटनांमध्ये त्यांनी काम सुरु ठेवलं. एक दोन दैनिकात देखील काम केलं. पुढे त्यांनी सोलापूरचे देशभक्त तुळशीदास जाधव यांच्या मुलीशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा किस्सा देखील रंजक आहे. तो पुढे बघूया. पुढे भारत छोडो आंदोलनात देखील सहभागी झाले. वकिली चालू केली. त्यात यशही मिळाले. वकिलीसोबत राजकारणाशी जोडून राहिले. काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष देखील ते त्याच दरम्यान बनले. काँग्रेसमध्ये त्यांचं कार्य वाढत गेलं. १९७८ मध्ये प्रदेश काँग्रेसचे ते सचिव झाले.

१९८० च्या मध्यावधी निवडणुकीत बाबासाहेब मुंबईतील कुर्ला उपनगरातील नेहरूनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार आले. ए आर अंतुले राज्याचे मुख्यमंत्री बनले. बाबासाहेबांना कायदा मंत्री हे पद मिळालं. पण त्यांच्या नशिबात मुख्यमंत्री पद होतं. झालं असं कि २ वर्षातच ए आर अंतुले यांचं नाव कथित सिमेंट घोटाळ्यात आले. त्यामुळे अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला. आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरु होती. उत्सुकता ताणली गेली.

वसंतदादा पाटील हे त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण हायकमांडकडून इंदिरा गांधींचा आदेश वेगळाच आला. बाबासाहेब भोसले यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित झालं. सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणात जास्त वजन नसलेले बाबासाहेब मुख्यमंत्री म्हणून घोषित झाले यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. हा एक चमत्कार मानला जात होता.

असं पण बोललं जात होतं कि इंदिरा याना दुसरे मुख्यमंत्री घोषित करायचे होते पण बाबासाहेबांचे नाव चुकून आले होते. त्यांना साताऱ्याचे अभयसिंह राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण चुकून बाबासाहेब भोसले यांचं नाव त्यांनी घोषित केलं अशी चर्चा होऊ लागली. पण इंदिराजींची इच्छा होती कि एक मराठा मुख्यमंत्री असावा. अन बाबासाहेबानी कधीच हे पद मागितलं नव्हतं. त्यासाठी लॉबिंग केलं नव्हतं. म्हणून त्यांचं नाव घोषित झालं होतं.

बाबासाहेब भोसले एकच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. दहावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच काळात झाला. चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना, हे निर्णय त्यांच्याच काळात झाले. ते चांगले नेते होते पण त्यांना आमदारांवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं त्यामुळे त्याचं पद गेलं. त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले.

तुरुंगात झाला होता त्यांचा साखरपुडा-

१५ जानेवारी १९२१ रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांच १९४५ मध्ये लग्न झालं. १९४२ साली गांधींजींनी ‘भारत छोडो’चा नारा दिल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांची धरपकड झाली होती. त्यात बाबासाहेब भोसलेंना दीड वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळी तुरुंगातच त्यांचा कलावती यांच्याशी साखरपुडा झाला. सासरे तुळशीदास जाधव हे येरवडा तुरुंगात होते. आपल्या डोळ्यांसमोर हा साखरपुडा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे हा साखरपुडा तुरुंगात झाला.

About Mamun

Check Also

…जेव्हा नितीन गडकरींनी दिल्लीत भारत सरकारचा बोर्ड उखडून लावला होता महाराष्ट्राचा बोर्ड!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे असंख्य किस्से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *