उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्यांना कुठल्या वेगळ्या अशा परिचयाची गरज नाही, कारण अत्यंत कमी वयातच त्यांनी जे यश प्राप्त केले आहे ते अतुलनीय आहे. ५ जून १९७२ रोजी उत्तराखंड (तेव्हाचे उत्तरप्रदेश) मधील पौडी जिल्ह्यात असणाऱ्या यमकेश्वर तालुक्यातील पंचुर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. ग्रॅजुएशनचे शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडले गेले. तिथून ते गोरक्षनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ त्यांच्या संपर्कात आले आणि तिथेच त्यांनी दीक्षा घेतली.
योगी आदित्यनाथ यांचे मूळ नाव घेतल्यास उत्तरप्रदेशात गुन्हा दाखल होतो
आज आपण ज्यांना योगी आदित्यनाथ म्हणून ओळखतो, त्यांचे मूळ नाव अजय सिंह बिष्ट असे आहे. १९९४ साली अवैद्यनाथ महाराज यांच्याकडे दीक्षा घेतल्यानंतर योगी आदित्यनाथांनी आपले मूळ नाव सोडले. इतकेच नाही तर निवडणूक लढवताना शपथपत्रातील वडिलांच्या नावासमोरही कॉलममध्येही अवैद्यनाथ यांचेच नाव लिहतात.
आजमितीला उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांना त्यांचं मूळ नावाने संबोधल्यास गुन्हा दाखल केला जातो. त्याचे कारण म्हणजे योगी आदित्यनाथ हे संत परंपरेनुसार आपले जीवन जगत आहेत. ते गोरक्षपीठाचे पिठाधिपती आहेत. हे पीठ सनातन धर्माच्या कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे त्यांचे मूळ नाव घेणे हा त्या परंपरेचा आणि सनातन धर्माचा अवमान मानला जातो. असे करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. समाजवादी पार्टीच्या प्रवक्ता आय.पी.सिंह यांच्यावर असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
…त्या एका भांडणामुळे योगी आदित्यनाथ यांची राजकारणात एंट्री झाली
योगी आदित्यनाथ कॉलेजला असताना एकदा ते एका दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी गेले असताना दुकानदारासोबत त्यांचे भांडण झाले. ते भांडण इतके वाढले की दुकानदाराने थेट रिव्हॉल्वर काढून त्यांच्यावर रोखला. दोन दिवसांनंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली त्या दुकानदारावर कारवाई होण्याची मागणी करत एक उग्र आंदोलन केले.
हा तोच काळ होता जेव्हा त्यांचे गुरु अवैद्यनाथ राजकारणातून निवृत्त होण्याच्या काठावर होते. त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे ते आंदोलन आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण जवळून पाहिले आणि त्यांना आपला राजकीय उत्तराधिकारी घोषित केले. इथेच आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशच्या राजकारणात एंट्री झाली. त्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी आदित्यनाथ लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.