सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे-फलशीयेवाडी हे गाव. गावातील सामान्य कुटुंबातील तातू सीताराम राणे आणि लक्ष्मीबाई तातू राणे यांना २० एप्रिल, १९५२ रोजी एक मुलगा झाला. हे कुटुंब कामासाठी मुंबईला गेलेले होते. मुंबईतच मुलाचा जन्म झाला. राणे कुटुंब हे मध्यमवर्गीय कुटुंब. गावाकडे थोडी शेती होती. तातू मुंबईत नोकरी करायचे. मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण तसा हुशार होता.
कमी वयातच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नारायणने चिकन शॉप उघडला. चिकन विक्रेता असलेला नारायण पुढे राजकारणात जाऊन मोठं यश मिळवेल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. सुरुवातीच्या काळात कमी वयातच ते उत्तर पूर्व चेंबूरच्या भागात सक्रिय असलेल्या हऱ्या नाऱ्या गँ गसोबत देखील जोडले गेले होते. राजकीय हाथ डोक्यावर असावा याच भावनेतून नारायण शिवसेनेच्या संपर्कात आले होते असे म्हंटले जाते.
१९६६-६७ चा तो काळ होता. मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यावेळी नुकतीच आलेली शिवसेना हि संघटना चर्चेत होती. नारायणने वयाच्या चौदाव्या वर्षीच १९६६ ला शिवसेनेसोबत जाण्याचं ठरवलं. तेव्हा चेंबूरमध्ये मराठी माणसं नावालाच असायचे. खूप कमी प्रमाण होतं. नारायणला वय १४ असल्याने शिवसेनेचं अधिकृत सभासद होता येत नव्हतं कारण वय १८ लागायचं. त्याने एक युक्ती केली. एका मित्राला २ रुपये दिले आणि क्लास मध्ये जाऊन नारायण राणे म्हणून नोंदणी करून ये म्हणाले. तो मित्र नाव नोंदवून आला आणि नारायण राणे शिवसेनेचे सभासद बनले.
बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन केलेल्या पक्षामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. शिवसेना कमी काळातच लोकांना आपली वाटायला लागली. नारायण राणे शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे शिवसैनिक. सुरुवातीलाच ते चांगले कामाला लागले. तो २ रुपये घेऊन जाऊन नावनोंदणी करून आलेला हनुमंत परब हा त्यांचा जिवलग मित्र होता. दोघेही बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले.
बाळासाहेबांची कुठेही सभा असली तर ते सभेला हजेरी लावत. कुठून तरी पैशाची जमवाजमव करून ते सभेला जायचे आणि बाळासाहेबांच्या एंट्रीला दोघे हार घेऊन हजर असायचे. या दोघांची जोडी त्यामुळे लवकरच सर्वांच्या नजरेत यायला लागली आणि खुप लोकप्रिय झाली. या दोघांना यामुळेच लोक हऱ्या नाऱ्या म्हणायला लागले.
नारायण राणे यांनी आपल्या कामाच्या बळावर शाखाप्रमुख, नगरसेवक, बीएसटी चे चेअरमन या पदापर्यंत झेप घेतली. साहेबांशी त्यांची जवळीक खूप वाढली. राणेंना मराठवाडा, विदर्भ आणि अनेक ठिकाणच्या जबाबदाऱ्या निवडणुकीवेळी मिळायला लागल्या. गडचिरोलीत त्यांनी २ जागा निवडून आणून देत यश मिळवून दिले होते. शिवसेनेच्या त्या दिवसात बाळ ठाकरेंनीही राणेंच्या क्षमतेचा वापर शिवसेनेसाठी करून घेतला. राणेंनीही कोकणात, मुंबईत शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले.
१९९१ साली भुजबळांनी शिवसेना सोडल्यामुळे विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. शिवसेनेत वजन अधिकच वाढत गेलं. युती सरकारच्या शेवटच्या काळात मनोहर जोशींना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. पुढे बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली. यामुळे राज ठाकरे आणि नारायण राणे दुखावले गेले.
२००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर काँग्रेसमध्ये जायचं का राष्ट्रवादीत हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यावेळी नारायण यांनी २ चिट्ठ्या बनवल्या होत्या. यामध्ये एक काँग्रेसची आणि दुसरी राष्ट्रवादीची. त्यातली उचललेली चिट्ठी काँग्रेसची निघाली आणि काँग्रेसमध्ये जाण्याचा राणेंनी मोठा निर्णय घेतला. तो निर्णय चूक होता कि घोडचूक असं विधान शरद पवार यांनी राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी केलं होतं.
शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राणे कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि त्यांना महाराष्ट्राचे महसूलमंत्री पद देण्यात आले. पुढे ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री झाले. २००८ मध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केल्यामुळे नाराज झालेल्या नारायण राणेंनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे सहा वर्ष त्यांना निलंबीत करण्यात आले होते.
पुढे ते पुन्हा पक्षात सक्रिय झाले. २०१४ साली त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पराभव झाला. पुढे २०१७ मध्ये राणेंनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले. आज नारायण राणे हे राज्यसभेवर खासदार आहेत.