आयुष्यात जिद्द असणाऱ्या व्यक्तीकडे संधी या येतच असतात. त्या आल्या नाही तरी त्या निर्माण करण्याची धमक हि त्या व्यक्तीमध्ये असायला हवी. असे अनेक उदाहरण आज आपल्यासमोर आहेत ज्यामध्ये अत्यंत साधारण परिस्थितीतून काही जणांनी केलेली वाटचाल प्रेरणा देणारी असते. आज एका अशा मराठी माणसाला भेटणार आहोत जो माणूस लहानपणी बिना चप्पलचं शाळेत जायचा. जो दहावी मध्ये नापास झाला, ज्याने भारतात एक साधं किराणा दुकान चालवलं. तो माणूस आज दुबईत ४ हजार कोटींच्या कंपनीचा मालक आहे.
हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरं करून दाखवणारे ते उद्योजक आहेत धनंजय दातार. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनंजयचे वडील महादेव दातार हे इंडियन एअर फोर्समध्ये सार्जंट होते. त्यांच्या या नोकरीमुळे सारखी कोणत्याही भागात बदली व्हायची. बदलीमुळे मुलांचे हाल व्हायचे म्हणून महादेव यांनी धनंजयला अमरावतीत आईच्या आईकडे पाठवले. तेव्हा धनंजय अवघा ८ वर्षाचा होता. आजीची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे धनंजयचे बालपण देखील हलाखीतच गेले.
धनंजयचे वडील आजींना पैसे देऊ करायचे पण आजी ते घ्यायची नाही. याचा परिणाम धनंजयच्या शाळेवर देखील झाला. त्याला एका छोट्या शाळेत शिक्षण तर घ्यावा लागलेच पण त्याच्याकडे शाळेत जायला चप्पल बूट देखील नसायचे तर फक्त एक गणवेश घालून तो रोज शाळेत जायचा. बिना चपलांचा आणि पावसाळ्यात डोक्यावर दप्तर घेऊन धनंजय शाळेत जायचा. कपड्यासोबत त्यांचे खायप्याचे देखील हालच होते.
धनंजयच्या बालपणी त्याला नास्ता म्हणजे काय माहिती नसायचे. तर २ भाकरी आणि जे मिळेल ती भाजी घेऊन तो शाळेत जायचा. रात्रीही भाकर खाऊन तो राहायचा. वरण तर बिना मसाल्याचेच असायचं. दही भाकर देखील खाऊन तो राहायचा. त्या दह्याला साखर देखील घरात नसायची. ४ वर्ष त्याने आजीकडे काढले. नंतर वडील निवृत्त झाल्याने तो मुंबईत परतला. वडिलांनी निवृत्तीनंतर दुबईला एका दुकानात मॅनेजर म्हणून नोकरी मिळवली. त्यातून कुटुंबाचा गाडा चालायचा.
सात वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी धनंजयला देखील दुबईला बोलवून घेतले आणि एक छोटं किराणा दुकान टाकून दिलं. १९८४ मध्ये धनंजय दुबईत गेला. तेव्हा तो अवघ्या २० वर्षाचा होता. महादेव यांनी सुरु केलेल्या किराणा दुकानात धनंजय मदत करू लागला. दुकानात त्याच मन रमलं. दुकानातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं. १० वर्षात त्यांनी अबूधाबीला एक आणि शारजाहला एक दुकान चालू केलं. याच दुकानातून सुरु झालेला त्यांचा यशाचा प्रवास पुन्हा थांबलाच नाही.
त्यांनी आपल्या डोक्याने तिथं व्यवसाय वाढवला. भारतीयांची संख्या दुबईत खूप होती. त्यामुळे त्यांनी भारतीयांची गरज ओळखून मसाले क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. भारतीयांना लागणारे मसाले तेव्हा दुबईत मिळत नसत. वडिलांना कल्पना बोलून दाखवली आणि त्यांचं पहिलं अल अदिल हे मसाल्याचं दुकान सुरु झालं. आज त्यांच्या या ब्रॅण्डची ९००० पेक्षा अधिक उत्पादने आहेत. त्यांच्याकडे ७०० पेक्षा अधिक लोणचे देखील मिळतात. तिथल्या प्रत्येक गोष्टीत मराठी चव असून ते तुरडाळ खास लातूरहून उडीद डाळ, चणा डाळ जळगावहून तर मसूर डाळ इंदूरहून मागवतात.
दिवसाला १६-१६ तास काम करून या किराणा दुकानदाराने हा कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात दुकान टाकण्यासाठी आईचे मंगळसूत्र देखील विकले. तेच धनंजय दातार आज दुबईचे मसाला किंग म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे आज २ मिलियन्सची रोल्स रॉयस कार आहे. हि गाडी जगात फक्त १७ लोकांकडे आहे.