Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / दारुड्या पतीने बेघर करूनही स्वतःच्या हिमतीवर ती आज शून्यातून बनली लखपती!

दारुड्या पतीने बेघर करूनही स्वतःच्या हिमतीवर ती आज शून्यातून बनली लखपती!

आयुष्यात जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढं मोठं यश हे एक दिवस मिळतच. त्यासाठी तुमच्या प्रयत्नांची साथ असायला हवी. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सर्व काही संपलं असं वाटायला लागतं. पण त्या परिस्थितीत जर सकारात्मक मानसिकता ठेवून वाटचाल केली तर संघर्षावर मात करता येते. असंच काहीसं केलं आहे एका खेडेगावातील महिलेने. तिने निवडलेला व्यवसाय बघून लोक सुरुवातीला तिच्यावर हसले होते. पण आज ती त्याच व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमावत आहे. जाणून घेऊया तिची यशोगाथा..

वैशाली बाळासाहेब घुगे. उस्मानाबाद जिल्हातील तुळजापूर तालुक्यातील आंदूर गावची एक सामान्य महिला. पुण्यातील थेऊरमध्ये ९ वी पर्यंत शिक्षण वैशालीने घेतले. नववी झाली कि वडिलांनी शिकलेला मुलगा बघून लग्न लावून दिलं. मुलाला नोकरी नव्हती पण शिक्षणामुळे पुढे नोकरी लागेल आणि मुलीला सुख मिळेल अशी तिच्या वडिलांची आशा. सासरला वैशालीचे २० माणसांचे मोठे कुटुंब होते.

नवऱ्याला नोकरी काही लागली नाही. त्यातच तो व्यसनाच्या आहारी गेला. व्यसनामुळे कुटुंबात वाद होऊ लागले. वैशाली आणि नवऱ्याला वेगळं काढण्यात आलं. मुलांचा सांभाळ आणि पतीची जबाबदारी वैशालीवर आली. दारुड्या पतीसोबत वैशालीचे वाद व्हायला लागले. पती तिला अनेकदा मुलांसोबत घराबाहेर काढत असे. अनेक रात्री तिने घराबाहेर काढल्या आहेत. आईला मात्र फोन आल्यावर ती सुखी आहे हेच सांगायची. कारण लग्नानंतर ६ महिन्यातच वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे आईवर ४ लहान भावांसह आजी आजोबांची जबाबदारी होती. तिला सत्य सांगून वैशाली दुखवू इच्छित नव्हती.

वैशालीने मात्र परिस्थितीचा सामना करायचं ठरवलं. पती कामानिमित्त पुण्याला घेऊन आले. सोबत लहान मुलं होती. हडपसरला ३ वर्ष वैशालीने नर्सरी मध्ये काम केलं. दोघांच्या पगारातूनही घरखर्च जाऊन काही शिल्लक राहत नव्हतं. मुलं लहान असताना मागे काही उरेना मग ती मोठी झाल्यावर कसं व्हायचं या विचाराने वैशाली नवऱ्यासोबत गावाकडे परतली. गावाकडे आल्यावर राहायला घर नव्हतं. पाच पत्रांचं घर तयार केलं. त्याला तुऱ्हाट्यांचा कूड करून ती त्यात राहिली.

सासू सासऱ्यांनी एक म्हैस दिली होती. सोबतच जे काही शेत होतं त्यात वैशालीने भाजीपाला लावायला सुरु केलं. भाजीपाला आल्यावर तो विकायची पंचायत झाली. तिला भाजीपाला विकण्यासाठी गावात ओरडू वाटायचं नाही. मग ती लहान मुलांना ओरडायला सोबत नेत असे. त्याबदल्यात त्यांना एक बिस्कीट पुडा ती द्यायची. एके दिवशी भाजी विकताना पाऊस असल्या कारणाने एका महिलेच्या घरी थांबली. तिने चहा बनवला. ओळख झाली. त्या महिलेने वैशालीला बचत गटात महिन्याला ५० रुपये टाकण्याचा सल्ला दिला. शिक्षकाची पत्नी होती ती.

पुढे ४-५ उलटले. वादळात घरावरील सर्व पत्रे उडून गेली. थोडक्यात वैशालीसह इतर ८ जणांचे प्राण वाचले. आता घर बांधावं लागणार हा विचार तिच्या मनात सारखा येत होता. ती पैसे जमा करत असलेल्या गटाने ५ हजार तिला देऊ केले. ते ५ हजार घेऊन तिले पाया खोदून सिमेंट काँक्रीटच्या २ पत्राच्या खोल्या बांधल्या. वैशाली या संकटांनी खचून गेली होती मात्र तिने हार मानली नाही. ती स्वयम शिक्षण संस्थेबरोबर जोडली गेली. तिथं शेतीशी निगडित व्यवसायांचे प्रशिक्षण तिला मिळालं.

शेती कमी असल्याने शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय वैशालीने घेतला. तिच्याकडे असलेल्या एका म्हशीपासून तिने दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्या प्रशिक्षणात तीने गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. घरी आल्यावर घरच्या घरी तिने गांडूळखताचा बेड तयार केला. १३-१४ मध्ये त्यावेळी प्रचंड दुष्काळ होता. त्या दुष्काळात केसरीची आंब्याची झाडं वैशालीने लावली. दुष्काळात तिची झाड खतामुळे जगली. ती तिच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना हे दाखवायची.

पण जेव्हा तिने पहिल्यांदा बेड तयार करून शेण खत कंपोस्ट खत चाळून पोत्यात भरलं होतं तेव्हा तिच्यावर शेजारचे शेतकरी येणारे जाणारे हसत होते. खत कुठे किलोवर विकतं असं तिला लोक म्हणायची आणि नाव ठेवायची. पण वैशाली कामाकडे लक्ष देत राहिली. स्वतःच्या शेतात गांडूळखत वापरून १० जनावरांचं संगोपन केलं. दुष्काळात चांगली शेती केली. याची यशोगाथा तेव्हा ऍग्रोवन मध्ये आली. वैशालीचे नाव त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात झळकले. तिच्या मार्गदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल तिला यायला लागले.

एक वेळ अशी होती जेव्हा वैशाली ५ रुपयांचा बिस्कीट पूडा स्वतःच्या मुलांना घेऊन देऊ शकत नव्हती. आज तिच्या शेतात एकावेळी १० टन गांडूळ खत तयार होते. वर्षभरात याच्या विक्रीतून वैशाली ५ लाख रुपये निव्वळ नफा कमावते. विविध छोटे कुक्कुटपालन देखील आज त्या करतात. सोबत महिलांना काम देण्याचा मनात निर्धार करून पापड लाटण्याचे आणि डाळ बनवण्याचे काम त्यांनी अनेक महिलांना दिलं. आज वैशाली चांगल्या घरात राहते. ५ पत्रांच्या घरात राहणाऱ्या वैशालीने आज तिच्या नव्या घरी ५० शेतकऱ्यांना पुरेल एवढा ट्रेनिंग हॉल बनवला आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *