दारु म्हणलं की समाजातील लोक त्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघतात. दारु पिणाऱ्या व्यक्तीला घर संसार उध्वस्त दारुडा, बेवडा म्हणतात. त्यांच्याशी बोलायचे टाळतात किंवा त्यांची टिंगलटवाळी करतात. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या इथे दारु निषिद्ध मानली जाते. कधीकाळी भारतीय रुढी परंपरेचा भाग असणारी आणि आताच्या सामाजिक जीवनात निषिद्ध मानली जाणारी दारु नक्की असते तरी काय हेच आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते. आज आपण या दारुवरच आजचा लेख खर्ची घालणार आहोत..
दारु म्हणजे नक्की काय असते ?
साधारणपणे कोणत्याही धान्यात, फळात किंवा फुलामध्ये जी शर्करा असते तिचे रुपांतर इथाईल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करुन त्यापासून जे झिंग आणणारे मादक पेय तयार केले जाते त्यालाच आपण दारु म्हणतो अशी सरसकट दारुची व्याख्या करता येते. अगदी साध्या “आंबवणी” या नैसर्गिक प्रक्रियेच्या साहाय्याने शर्करेचे रुपांतर अल्कोहोलमध्ये केले जाते. त्यापासून तयार होणाऱ्या द्रवामध्ये मूळच्या कच्च्या मालाचा वास आणि चव उतरलेली असते. त्यानुसार दारुचे वेगवेगळे प्रकार होतात. सर्वसाधारणपणे दारु कोणत्या घटकापासून बनलेली आहे आणि त्यात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे यावरुन दारुचे दोन प्रकार पडतात.
१) लिकर : लिकर ही धान्यापासून बनलेली असते आणि ती साधारणपणे जेवणाआधी घेतात. सामान्यतः लिकर ही पुरुषांमध्ये जास्त लोकप्रिय असते. लिकर कशापासून बनलेली आहे यावरुन तिचे अनेक प्रकार पडतात. व्हिस्की बनवण्यासाठी जगातील वेगवेगळ्या भागात वापरले जाणारे धान्य वेगवेगळे असते. सर्वाधिक प्रसिद्ध असणारी व्हिस्की किंवा स्कॉच व्हिस्की ही स्कॉटलंडमध्ये बार्ली (सातू) या धान्यापासून बनवली जाते.
अमेरिकन व्हिस्की बर्बन मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवरील रम ही उसापासून बनवली जाते. जपानची साके ही शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकीला ही अगावे या कंदापासून बनते. व्होडका हा बार्ली आणि बटाटा यापासून बनतो.
२) लिक्युअर : लिक्युअर ही फळाफुलांपासून बनलेली असते आणि ती साधारणपणे जेवणानंतर घेतात. लिक्युअर्स या संत्री, ब्लु बेरी, स्ट्रॉबेरी, सफरचंद, केली, इत्यादि विचिध फळांपासून बनवली जाते. जीन ही शेतीजन्य पदार्थापासून मिळवलेल्या अल्कोहोलमध्ये ज्युनिअर व्हेरी फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते .सामान्यतः लिकर ही स्त्रियांमध्ये जास्त लोकप्रिय असते.
भारतात तयार होणारी दारु अस्सल नसते.आयत केलेल्या बॉटल्ड दारुमध्ये साखरेच्या मळीपासून मिळणाऱ्या अल्कोहोलपासून तयार केलेल्या दारुत ब्लेंड करुन तिची चव वाढवली जाते. किंबहुना विदेशी चवीशी मिळतीजुळती करण्याचा प्रयत्न केला जातो.
ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातभट्टीची एकच शास्त्रीय प्रक्रिया असते, परंतु वेगवेगळ्या ठिकाणची पद्धत मात्र अशास्त्रीय असते. अस्वच्छ पाणी, नवसागर, त्यात घातलेली रासायनिक द्रव्ये यामुळे टी दारु मादक पेय न राहता वि षारी द्रव्य बनते. ही दारु स्वस्त असते. असल्या प्रकारच्या दारुमुळेच समाजात “दारु वाईट” हा समज रुढ झाला आहे. परंतु हीच हातभट्टी जर एकदम शास्त्रीय पद्धतीने बनवली असेल तर तिला सरकारमान्य देशी दारु असे लेबल मिळते.
दारु पिल्यानंतर शरीरात नेमके काय होते ?
आपण जेवढी दारु पितो त्यातली २०% दारु पोटात जाते आणि बाकीची ८०% दारु लहान आतड्यात शोषली जाते. त्यातील अल्कोहोल रक्तात मिसळते आणि ब्लड सर्क्युलेशन होऊन संपूर्ण शरीरात पसरते. जेवणाआधी दारु पिल्यास त्याची गती जास्त असते. दारु संपूर्ण शरीरात पसरल्यानंतर आपली सेंट्रल नर्व्हस सिस्टीम अल्कोहोलच्या ताब्यात जाते आणि आपल्या मेंदूचे कार्य करण्याची क्षमता मंदावते.
त्यामुळे शरीराच्या हालचाली मंदावतात. त्यामुळे माणूस एका वेगळ्याच धुंदीत जातो. शरीरात पसरलेले अल्कोहोल आपले फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत याद्वारे बाहेर पडत असते. त्यामुळेच पोलीस अनेकदा तपासणी करण्यासाठी ब्रेथ ऍनालायजर वापरतात. जर प्रमाणापेक्षा दारु जास्त झाली तर उलटीचा मार्गाने आपले शरीर ही दारु बाहेर फेकते.