दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. गावाकडे असताना गुरांच्या धारा काय सगळ्यांनाच काढता येत असतील अशातला काही भाग नाही, परंतु दुधाच्या किटल्या सायकलच्या कॅरेजला अडकवून डेअरीत जाऊन दूध घालण्यापर्यंतची कामं आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच केली असतील. शाळेत असताना दुधाचा महापूर किंवा श्वेतक्रांती बद्दल आपण वाचलं असेल. शेतीपूरक असणाऱ्या या दूध व्यवसायाने ग्रामीण भागात कशी आर्थिक भरभराट आणली याची कल्पना आपल्याला असेल.
दुधाच्या व्यवसायात दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून गुरांच्या गोठ्यात काम करणारे कामगार, दूध वाहतूकदार, डेअरी मालक, दुधावर प्रक्रिया करणारे उद्योजक अशा सगळ्यांनाच दुधाने कमवून दिले. कित्येक लोकांनी या दुध धंद्याच्या जीवावर छोटा हत्ती, पिकअप, टेम्पो, सुमो, स्कॉर्पियो, इत्यादि वाहने घेतल्याचेही आपण पाहिले असेल, पण दूध धंद्यासाठी कुणी हेलिकॉप्टर घेतल्याची बातमी आजपर्यंत तुम्हाला कुठे वाचायला मिळाली नसेल. आज आपण अशाच एका अवलिया दूध व्यवसायिकाबद्दल पाहणार आहोत.
कोण आहे हा हौशी दूध व्यावसायिक ?
असं म्हणतात की “हौसेला काही मोल नसते”, ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल असे एक उदाहरण आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडले आहे. भिवंडी येथील दूध व्यावसायिक जनार्दन भोईर यांनी चक्क दुध व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत घेतल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जनार्दन भोईर हे शेतीसोबतच रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. त्यांची अनेक गोडाउनही आहेत. भिवंडी येथे त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे.
दुधाच्या व्यवसायाच्या निमित्ताने भोईर यांना अनेकदा हरियाणा, राजस्थान, गुजरात या राज्यात किंवा कधीकधी बाहेरच्या देशातही जावे लागते. त्यामध्ये त्यांचा वेळ फार जायचा. त्यामुळे त्यांनी स्वतःचेच हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला.
हेलिकॉप्टर विकत घेतल्यानंतर त्यांनी आपल्या घराजवळच अडीच एकर जागेत स्वतःचे खाजगी हेलिपॅड तयार केले. त्याशेजारी एक पायलट आणि टेक्निशियन रुमही तयार केली. १५ मार्चला त्यांचे हेलिकॉप्टर आले. जवळच्या लोकांना त्यात बसवून त्यांनी एक चक्करही मारली. दुधाच्या धंद्यासाठी त्यांनी खरेदी केलेलं हेलिकॉप्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.