भारताची स्वातंत्र्य चळवळ ऐन जोमात असतानाच्या काळात १९२६ साली स्वातंत्र्यसैनिक उद्योजक जमनालाल बजाज यांनी “बजाज ग्रुप”ची स्थापना केली. महात्मा गांधी त्यांना आपले मानसपुत्र मानायचे. एका बाजूला कंपनी काढली असली तरी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीच त्यांनी जास्त वेळ घालवला.
१९४२ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र कमलनयन बजाज यांनी कंपनीची सूत्रे ताब्यात घेतली. त्यांनीही गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यलढ्यावरच आपले लक्ष केंद्रित केले होते, मात्र स्वातंत्र्यानंतर ते आपल्या व्यवसायाकडे वळले. १९६८ मध्ये त्यांचे पुत्र राहुल बजाज यांनी बजाज ग्रुपची सूत्र हाती घेतली. आजमितीला भारताच्या लोह-पोलाद उद्योग, ऑटोमोबाईल, घरघुती आणि विद्युत उपकरणे, विमा, प्रवास आणि वित्त क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणून बजाज ग्रुपला ओळख मिळवून देण्याचे श्रेय जाते राहुल बजाज यांना..
राहुल बजाज यांनी जेव्हा बजाज ग्रुपची सूत्रे हातात घेतली तेव्हा भारतात लायसन्सराज चालायचे, थोडक्यात सरकारच्या मर्जीशिवाय उद्योगपतींना काहीही करता येत नसायचे. परंतु राहुल बजाज यांनी बदलत्या भारताची नास ओळखली आणि १९७२ मध्ये बजाजची चेतक स्कुटर भारतात लाँच केली. महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्यावरुन त्यांनी हे नाव घेतले. ही स्कुटर बाजारात आली तेव्हा चांगलीच गाजली. युवा वर्गात तर तिला कमालीचा प्रतिसाद मिळाला. बघता बघता चेतक स्कुटरची मागणी वाढायला लागली.
स्कुटरची वाढती मागणी पाहून कंपनीने एक जाहिरात काढली. त्या जाहिरातीतील टॅगलाईन होती “हमारा कल हमारा आज, बुलंद भारत की बुलंद तस्वीर….हमारा बजाज !” बजाजची ही टॅगलाईन जाहिरात इतकी लोकप्रिय झाली की त्याकाळी घरी बजाज स्कुटर असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले. ८० आणि ९० च्या दशकात बजाज चेतक स्कुटरने अक्षरशः देशातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
स्कुटर बुक केल्यानंतर ती हातात मिळण्यासाठी लोकांना अक्षरशः दोन-दोन वर्षे वेटिंग करायला लागायचे. ९० च्या दशकात महिन्याला एक लाख स्कुटर खपायच्या यावरुन तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. त्यांनी कंपनीची वार्षिक उलाढाल १९६५ मधील ३ कोटी वरुन २००८ मधील १० हजार कोटींवर नेली. एप्रिल २०२१ मध्ये राहुल बजाज कंपनीच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार झाले.