जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले जाते. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम करणारा हिटलर आपल्या बुद्धिचातुर्याच्या व प्रभावशाली वक्तृत्वाच्या जोरावर जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाला कारणीभूत असणारी व्यक्ती बनला.
हिटलरच्या काळात जर्मनीत एक असा कायदा केला होता, ज्यामध्ये जन्मजात मानसिक विकार, स्किझोफ्रेनिया, अपस्मार, अनुवांशिक बहिरेपणा किंवा अंधत्व आणि अल्कोहोलचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींची जबरदस्ती नसबंदी करण्याची तरतूद होती. परंतु या कायद्याच्या आधारे हिटलरने जितक्या नसबंदी केल्या, त्याच्या १५ पट जास्त नसबंदी आपल्या भारतात संजय गांधींनी केल्या. पाहूया संजय गांधी यांच्याविषयीची ही खास माहिती..
संजय गांधी यांची ओळख जवाहरलाल नेहरुंचे नातू, इंदिरा गांधींचे पुत्र, राजीव गांधींचे बंधू, मनेका गांधींचे पती, वरुण गांधींचे वडील, सोनिया गांधींचे दीर, राहुल-प्रियांका गांधींचे चुलते अशी वेगवेगळ्या नात्यांतून करुन देता आली असतीच, परंतु संजय गांधी यांची ओळख “संजय गांधी” म्हणूनच करुन देणे जास्त समर्पक होईल. अनेक वादविवादांनंतरही लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून खरं तर त्यांनाच स्थान होते, परंतु २३ जून १९८० च्या विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने देशाच्या राजकारणाचे चित्र पार पालटून गेले.
तसं पाहायला गेलं तर संजय गांधींच्या नावावर राजकारणापासून ते राजकारणाच्या पलीकडे असे अनेक किस्से आहेत. त्यापैकी त्यांचे नसबंदी बाबतचे प्रकरण फार गाजले. चक्क हिटलरलाही त्यांनी याबाबतीत १५ पटीने मागे टाकले होते.
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. त्याचकाळात संजय गांधी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या सल्लागाराची भूमिका बजावता बजावता त्यांनी सत्तेची सूत्रेचआपल्या ताब्यात घेतली. संपूर्ण आणीबाणीच्या काळात त्यांनी शिक्षण, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, जातीवादाचे उच्चाटन आणि हुंडापद्धती बंद करणे या पंचसूत्रीवर काम केले. त्यांची पंचसूत्री चांगली होती, मात्र कुटुंब नियोजनासाठी जबरदस्तीने लोकांची नसबंदी करण्याची जिद्द त्यांना आणि काँग्रेसला महागात पडली आणि १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
संजय गांधींचे नसबंदी अभियान पाहून हिटलरही त्यांचे पाय धुवून पाणी पिला असता
आणीबाणीच्या काळात संजय गांधींनी नसबंदीवर इतका जोर दिला होता की अधिकाऱ्यांना अक्षरशः नसबंदीचे टार्गेट दिले होते. नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलीस अक्षरशः गावाला वेढा मारायचे आणि नंतर पुरुषांना बाहेर काढून जबरदस्ती त्यांची नसबंदी करत असल्याच्याही बातम्या आल्या. या अभियानाच्या माध्यमातून संजय गांधींनी देशात जवळपास ६२ लाख लोकांची नसबंदी केली होती. हाच आकडा हिटलरच्या बाबतीत केवळ ४ लाख इतकाच होता. म्हणजेच संजय गांधींनी हिटलरच्या १५ पटीने अधिक लोकांची नसबंदी केली होती.