शरद पवार यांचे पवार कुटुंब नेहमीच चर्चेत असते. मग ती राष्ट्रवादीची सत्ता असो वा नसो पवार कुटुंब मात्र चर्चेत राहतं. पवार कुटुंबीय तसं बघायला गेलं तर खूप मोठं आहे. प्रत्येक मोठ्या सणाला आपल्याला पवार कुटुंब बारामती मध्ये एकत्र दिसते. पवार कुटुंबात असलेली एकी देखील चर्चेचा विषय असतो. मागील काही काळात मात्र कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या आल्या होत्या पण ते पवार कुटुंबाने नाकारलं.
पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वच सदस्य उपस्थित असतात. खूप मोठा परिवार असलेल्या या कुटुंबाच्या कार्यक्रमात एक आजी मात्र नेहमीच लक्ष वेधून घेत असते. अनेकदा सुखदुःखाच्या क्षणांमध्ये या आजीचे फोटो देखील पवार कुटुंबातील सदस्यांसोबत दिसतात. या आजींचे पवार कुटुंबाशी कुठलेही रक्ताचे नाते नाहीये. मग या आजीबाई नेमक्या कोण आहेत असा प्रश्न पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया.
या आजींचे नाव आहे इंदुबाई झारगड. इंदुबाई पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. त्यांचं रक्ताचं नातं नसलं तरी त्यापलीकडील नातं त्यांचं पवार कुटुंबाशी आहे. इंदूबाईचं मूळ गाव इंदापूर तालुक्यातील काझड. इंदूबाईनी पवार कुटुंबियांसोबत ५० वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. सध्या त्या गावातच मुलांसोबत राहतात.
पवार कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांना हक्कानं विशेष निमंत्रण असतं. एवढंच नाही तर प्रत्येक सणाला त्यांना आहेर घेतला जातो. अनेक वर्ष पवार कुटुंबाची सेवा केलेल्या इंदूबाईंची उतारवयात पवार कुटुंब कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेत आहे.
अजित पवारांचं इंदूबाईंशी विशेष प्रेम आहे. जेव्हा अजित दादा २ वर्षाचे होते तेव्हा इंदुबाई पवार कुटुंबात आल्या. त्यांनी अजितदादांचा सांभाळ तेव्हापासूनच केला. पवार कुटुंबाच्या ३ पिढ्या बघितलेल्या इंदुबाई या शरद पवारांची आई शारदाबाई आणि अजित दादांचे वडील अनंतराव पवार यांच्या काळात पवार कुटुंबाशी जोडल्या गेल्या होत्या.
इंदूबाईनी फक्त अजित पवारच नाही तर त्यांचे दोन्ही मुलं पार्थ आणि जयचा देखील सांभाळ केला आहे. याशिवाय इतरही अनेक सदस्यांचा त्यांनी सांभाळ केला आहे. त्यांची आता एकच इच्छा आहे ती म्हणजे पार्थने त्यांच्या हयातीत लग्न करून सून घरी आणावी.
या कुटुंबाशी इंदूबाईंची घट्ट नाळ जोडलेली पाहायला मिळते. इतकंच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांबद्दल त्या भरभरून बोलतात. इंदुबाई झारगड यांना आजही या कुटुंबात मानाचं स्थान आहे. पवार कुटुंबासोबत त्यांनी राहावं असा सर्वांचा आग्रह असतो पण मुलांनी गावी नेल्यामुळे इथं राहता येत नसल्याचंही इंदुबाई सांगतात.