सध्या राज्यातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर गंभीर परिस्थिती बनलेली आहे. अशातच महाराष्ट्रात काल नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली. या गळतीमुळे तिथे उपचार घेत असलेल्या २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे म्हंटले होते. यासाठी त्यांनी एक ७ सदस्यांची एक समिती देखील नेमली होती. ज्यावेळी हि दुर्घटना घडली तेव्हा येथे २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. यामध्ये २२ जणांचा प्राण गेला आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरताना हि घटना घडली होती. त्यानंतर तात्काळ रेस्क्यू पथक घटनास्थानी आलं होतं आणि त्यांनी हि गळती थांबवली होती.
ऑक्सिजन गळती झाल्यामुळे रुग्णांना पुरवठा होत असलेल्या ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले. त्यामध्येच त्यांचा जीव गेला. “ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. काल दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला होता.
झाकीर हुसेन रुग्णालयात एकूण १५० रुग्ण उपचार घेत होते. ज्यामध्ये २३ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते तर काही रुग्ण हे ऑक्सिजन वर देखील होते. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जवळपास एक ते दीड तासानंतर गळती रोखण्यास यश मिळवले.
ऑक्सिजन पुरवठादार अमोल जाधव यांनी सांगितले घटनेचे खरे कारण-
झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या घटनेचं खरं कारण ऑक्सिजन पुरवठादार अमोल जाधव यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितले आहे. त्यांच्या मते रुग्णालयात जी ऑक्सिजनची टाकी लावण्यात आलेली होती तिला स्टेनलेस स्टीलचे पाईप लावलेले हवे होते. पण ते पाईप या टॅंकला लावलेले नव्हते. तर येथे टॅंकला तांब्याचे(कॉपर) पाईप लावण्यात आलेले होते. याशिवाय या टॅन्कमधून जो पाईप जातो तो देखील कमी साईजचा होता. जो कि मोठा असायला हवा होता. पाइपचा आकार मोठा असता तर हि दुर्घटना टळली असती असे ते म्हणाले. या रुग्णालयात या सर्व गोष्टींची खात्री करण्यात आली नसल्याने हि दुर्घटना घडली असे ते म्हणाले आहेत.
अमोल जाधव यांच्यामते जो गॅस लीक झाला त्यामध्ये जर कोणी तिथे बिडी पित असते अजून मोठा अनर्थ झाला असता. त्याचप्रमाणे या गॅसला डोक्याचं तेल आणि ग्रीस यापासून देखील धोका होतो हे लोकांना माहिती नसल्याचं ते म्हणाले. ग्रीसचा आणि गॅसचा छत्तीसचा आकडा असल्याचं ते म्हणाले. यांचा संपर्क आला तर मोठी दुर्घटना होऊ शकते असं देखील ते पुढे म्हणाले.