कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि अनेकांच्या नोकरीवर गदा आली. अनेकांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले. या लॉकडाऊनने अनेक प्रश्न निर्माण केले असले तरी अनेकांनी याला संधी मानून स्वताच्या महत्वकांक्षा पूर्ण केल्या. तर काहींनी या संकटात नोकरीवर गदा आल्याने स्वतःचं काही तरी करण्याच ठरवलं आणि त्यात मोठं यश मिळवलं. असंच काहीसं या नगर जिल्ह्यातील व्यक्तीच्या बाबतीत झालं. बँकेत १८ हजाराची नोकरी असणारा हा व्यक्ती लॉकडाऊन मुळे नोकरीला मुकला. कारखान्यात नोकरी केली. तिथूनही काढून टाकण्यात आल. पण त्याने हार न मानता स्वतःच काही तरी करण्याच ठरवलं आणि ते करून त्यात अवघ्या अडीच महिन्यात अडीच कोटींचा व्यवसाय देखील केला.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगांवचे अनंत विजयराव ढोले. लहानपनिपासुनचं शाळेत हुशार. अनंत शाळेत नेहमी टॉपर असायचे. दहावीपर्यंत पाथर्डीला शिक्षण झालं. पुढे पुण्याला प्रवेश घेतला खरा पण १-२ महिन्यातच घरची खूप आठवण होत असल्याने पुण्यात करमेना झालं. अनेकदा रडला. ११ वीतच प्रवेश रद्द करून नगरला प्रवेश घेतला. लहानपणीपासून डॉक्टर व्हायची इच्छा होती. MBBS करण्याची इच्छा होती. पण मित्रांच्या संगतीमुळे बारावीला कमी मार्क मिळाले.
मग BHMS करून डॉक्टर व्हायचं ठरवलं. बीडला प्रवेश देखील घेतला. २ वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर प्रश्न पडायला लागले. मन रमत नव्हत. होमिओपॅथी आपल्या कामाची नाही असं वाटायला लागलं. वडिलांना सांगून दुसर्याच वर्षी प्रवेश रद्द केला. घरी आल्यावर खूप पश्चाताप व्हायला लागला. लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागत होते. अनंत खूप डिप्रेशनमध्ये गेला. आई वडिलांनी आधार दिला.
त्या काळात नगरला मित्राच्या मोबाईलच्या दुकानात जाऊन बसायचं. गर्दी बघून आपणही हा धंदा सुरु करावा असं वाटलं. हा धंदा आपणही करायचा असं पक्क केलं. एक हजार रुपये भाड्याने गाळा घेऊन उधारीवर पैसे घेऊन फर्निचर घेऊन २००५ मध्ये दुकानं चालू केलं. ३ वर्ष दुकानं चांगल चाललं. पण लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. काही तरी नोकरी बघ असं सर्व म्हणायचे.
२००७ मध्ये जलसंपदा खात्यात निघालेल्या जागांची परीक्षा दिली. २ मार्काने नंबर हुकला. त्यानंतर बँकिंगची तयारी केली. परीक्षेत यश मिळालं आणि एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी देखील मिळाली. सर्व सेट झालं होतं. लग्नही झालं. नोकरीत सारखं बदल्या होत होत्या. एकवेळ तर अशी आली कि गडचिरोलीला बदली झाली. तिथे जायचं नव्हतं. त्यामुळे १५ दिवसाची रजा घेतली. बँकेला खूप विंनती केली बदली रद्द करण्यासाठी पण बँकेनं ऐकलं नाही. त्यामुळे रागारागात राजीनामा दिला. पण नंतर पश्चाताप व्हायला लागला.
नंतर लवकर नोकरी मिळत नव्हती. शेवटी एका साखर कारखान्यात नोकरी मिळाली. तिथ फक्त ६० रुपये रोजाने काम केलं. १८००० रुपये महिन्याची नोकरी सोडून १८०० रुपये महीन्याची नोकरी करण्याची वेळ आली. डिप्रेशन वाढलं. परिस्थितीला तोंड दिलं. पगार ७ हजारापर्यंत वाढला. त्यावेळी जवळ असलेल्या २ लाखात कार घेण्यासाठी अजून २ लाखाचं कर्ज काढून एक कार घेतली. त्यावर ड्रायवर ठेवून ती भाड्याने द्यायला सुरु केलं.
पण एके दिवशी अचानक कारखान्याने काढून टाकलं. नंतर एका संस्थेत ब्रँच मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. त्या संस्थेच्या अधिकार्यांना विनंती करून स्वताच्या पाथर्डी गावात शाखा सुरु करण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा त्या संस्थेची शाखा सुरु करण्यासाठी पहिल्याच वर्षात एक कोटीच्या ठेवी लागतील असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते ऐकून धक्का बसला. एवढा आकडा ऐकला नव्हता.
पण आत्मविश्वास होता. पाथर्डीच्या शाखेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या एकाच वर्षात तब्बल ५ कोटींच्या ठेवी मिळाल्या. एके दिवशी प्रवासात हार्ट अटॅक आला. तेव्हा आयुष्याच महत्व कळलं. नंतर पुन्हा काम वाढलं. २२ शाखांची जबाबदारी संस्थेने दिली. काम जोरात सुरु असताना कोरोना आला. लॉकडाऊन पडलं. ज्या संस्थेला मोठं करण्यासाठी अहोरात्र काम केलं त्याच संस्थेने पगार न देता लॉकडाऊन मध्ये घरी बसवलं. तेव्हा खूप वाईट वाटलं.
आता स्वतःच काही करायचं अनंतने ठरवलं. स्वताची एक संस्था सुरु करण्याच ठरवलं.चैतन्य अर्बन मल्टीपल निधीची स्थापना केली. लॉकडाऊन मध्ये संस्था सुरु करण्याचं धाडस केलं दिवसरात्र एक करत खूप मेहनत घेतली. याचं फळ म्हणजे अवघ्या अडीच वर्षात त्यांनी अडीच कोटींचा टप्पा ओलांडला. दुसरी एक संस्था देखील चालू केली. आज या दोन्ही संस्था करोडोंची उलाढाल करत आहेत. अनंतने लॉकडाऊन मध्ये स्वतावर विश्वास ठेवून केलेल्या व्यवसायाला आपल्या शुभेच्छा.