आंबा म्हणलं की कोकणच असं एक सूत्रच आपल्या डोक्यामध्ये फिट बसलं आहे. कोकण सोडून बाहेरच्या ठिकाणी चांगला आंबा येतच नाही या भीतीपोटी कोकणाबाहेरील अनेक शेतकरी आंबा लागवड करायला टाळतात. परंतु प्रामाणिक परिश्रम आणि अभ्यास करुन या शेतीमध्ये उतरला तर कोकणाबाहेरही हा आंबा शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळवून देत असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. आज आपण असेच एक उदाहरण पाहणार आहोत.
ही यशोगाथा आहे काकासाहेब सावंत नावाच्या एका शेतकऱ्याची. कधीकाळी हे सावंत एका ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी करायचे. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या दोन भावांसोबत मिळून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील अंतराळ नावाच्या गावात त्यांनी २० एकर जमीन खरेदी केली. सुरुवातीला आंब्याची लागवड केल्यानंतर लोक त्यांच्यावर हसले. कारण त्या परिसरातील लोक ज्वारी, बाजरी आणि गहू याशिवाय दुसरी पिकेच घेत नसायचे.
पण काकासाहेबांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी आपल्या शेतीचे दोन भाग केले. १० एकर शेतीत आंब्याची झाडे लावली आणि उर्वरित १० एकरमध्ये चिकू, डाळींब, पेरु, इत्यादि फळझाडे लावली. पाच वर्ष मनापासून मेहनत केली. पाच वर्षानंतर त्यांना मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात झाली. आता त्यांच्या आंब्याच्या बागेतून वर्षाला २ टन आंबा निघतो. त्यांच्या आंब्याच्या बागेत २५ लोकांना रोजगार दिला आहे.
आंब्याची शेती करत असतानाच सावंत यांनी आंब्याची नर्सरी देखील सुरु केली आहे. त्यांनी आपल्या नर्सरीमध्ये आंब्याच्या २२ प्रकारच्या जातींची रोपे विक्रीला ठेवली आहेत. नर्सरीच्या माध्यमातून सावंत दरवर्षी २ लाख आंब्याची रोपे विक्री करतात. आंबा शेती आणि नर्सरीच्या माध्यमातून सावंत वर्षाकाठी ५० लाख रुपये कमवतात.