महाराष्ट्रात गृहमंत्री आणि वाद हे समीकरण मागील अनेक वर्षांपासून आपण बघत आलो आहोत. राज्याच्या गृहमंत्री कोणत्या ना कोणत्या वादात अडकतोच हे अनेक गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात अनुभवलं आहे. नुकतंच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला. सचिन वाझे प्रकरणात मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. सध्या अनिल देशमुख यांची सिबीआय चौकशी सुरु असून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
दिवंगत आर आर पाटील आबा यांची गृहमंत्री म्हणून कारकीर्द देखील खूप चांगली राहिली होती. पण त्यांना देखील आपल्या एका वक्तव्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज आपण एका गृहराज्यमंत्र्याचा असा किस्सा बघणार आहोत जो खूप गाजला. या गृहराज्यमंत्र्यांच्या घरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एक व्यक्ती नोटांनी भरलेली बॅग घेऊन आला होता. या व्यक्तीला स्वतःची अटक टाळायची होती. पण हा गृहराज्यमंत्री खूप स्वच्छ प्रतिमेचा होता. ज्याने त्या लाच घेऊन आलेल्या व्यक्तीला सापळ्यात अडकवले आणि अटक केली.
हा किस्सा आहे राज्यात १९७८-८० दरम्यान आलेल्या पुलोद सरकारच्या काळातला. शरद पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन राज्यात पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन केले होते. या सरकारमध्ये शेतकरी कामगार पक्ष, जनता पार्टी, काही डावे पक्ष सामील झाले होते. शरद पवार हे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री बनले होते. पवार तेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. अनेक दिग्गज शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते. पवारांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे, अभ्यासू, विद्वान नेते म्हणून परिचित असलेले भाई वैद्य.
भाई वैद्य हे पुण्याचे महापौर देखील राहिलेले होते. पुण्याचे महापौर ते राज्याचे गृहराज्यमंत्री बनलेल्या भाई वैद्य यांना राज्यात खूप मानलं जायचं. भाई वैद्य यांना एकेदिवशी एका व्यक्तीचा फोन आला. गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या या व्यक्तीने भाईंना थेट फोन केला आणि त्याच्यावर असलेल्या एका केसमध्ये अटक टाळण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवली. त्या व्यक्तीने भाईंना २ लाख देण्याची ऑफर दिली. त्याकाळचे २ लाख म्हणजे आता ती रक्कम कोटींमध्ये आहे.
एका गुन्हेगारांकडून गृहराज्यमंत्री असलेल्या भाईंना थेट फोन करून ऑफर आल्यामुळे भाई थोडे अस्वस्थ झाले. एखाद्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने एवढी हिम्मत केल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होतं. भाई वैद्य यांचे राजकीय गुरु एम एस जोशी होते. एस एम जोशींना त्यांनी झालेला प्रकार सांगितला. भाई वैद्य यांनी एस एम जोशींना पुढे काय करावे यासाठी सल्ला मागितला. जोशींनी या व्यक्तीला रंगेहाथ पकडून देण्याचा सल्ला भाईंना दिला.
भाईंनी देखील हा सल्ला मानून तातडीने सूत्र हलवली. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख होते कर्तव्यदक्ष अधिकारी ज्युलिओ रिबेरो. तर मधुसूदन कसबेकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. भाईंनी रिबेरो यांना आपल्या घरी बोलवून घेऊन झालेला प्रकार सांगितला. त्या व्यक्तीला रंगेहाथ पकडून द्यायचं असल्याचं भाई म्हणाले. हे ऑपरेशन अत्यंत गुप्तपणे करण्याचे त्यांनी रिबेरो यांना सांगितले. पोलीस आयुक्तांना देखील याबद्दल कळू दिले गेले नाही.
ठरल्याप्रमाणे तो दिवस उजाडला. भाईंच्या बंगल्यामध्ये आणि बाहेर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला. काही पोलीस अधिकारी देखील तिथे उपस्थित होते. तो व्यक्ती भाईंच्या बंगल्यावर ठरलेल्या वेळेप्रमाणे आला. भाईंनी त्याच्याकडून आधी सर्व माहिती ऐकून घेतली. कोणत्या प्रकरणात मदत हवी याची माहिती घेतली. सोबत मोठी पैशानी भरलेली बॅग होती. सर्व बोलणं झाल्यावर जेव्हा त्या गुन्हेगाराने ती नोटांनी भरलेली बॅग भाईंना देऊ केली त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा नंतर झाली.
राज्याच्या गृहमंत्र्याने गैरप्रकार रोखण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलणे हे लोकांना खूप आवडले. त्यांनी आपल्या कृतीतून एक गृहमंत्री कसा असावा याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला होता. भाई यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना लोक खूप मानायचे. एक लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवाय त्यांच्या काळात पोलिसांची छोटी पॅंट मोठी झाली होती. त्यांनीच हा निर्णय घेतला होता.