शिकण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतं हे आजपर्यंत अनेक उदाहरणांमधून आपण बघितलं आहे. गरिबीतून विश्व निर्माण केलेले आज असंख्य तरुण आहेत. असंच काहीसं केलं आहे पालघर जिल्ह्यातल्या एका तरुणाने. गरीब परिस्थितीला एक शिकवण म्हणून बघितलेल्या वरुणने UPSC परीक्षेत ३२ वि रँक मिळवत कलेक्टर पदाला गवसणी घातली. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा खूप थक्क करणारा आहे. कारण वरून एक पंक्चरचं दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत असे. जाणून घेऊया पंक्चरची दुकान चालवणाऱ्या वरुनचा कलेक्टरपदापर्यंतचा जीवनप्रवास..
वरुण बरनवाल हा पालघर जिल्ह्यातील भोईसर या छोट्याशा शहरातील गरीब कुटुंबातील एक मुलगा. वडील पंक्चरचं दुकान चालवायचे तर आई एक गृहिणी. वरुणच्या घरची परिस्थिती खूपच बेताची होती. पण त्याच्या कुटुंबाने त्याला शिक्षणापासून रोखलं नाही. त्याची आई त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित करायची. तो लहानपणीपासूनच हुशार तर होताच पण टॉपर पण यायचा.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर चौथ्या दिवशीच वरुणच्या वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. १६-१७ वर्षाचा वरुण त्या वयात काय काम करणार होता. त्याने शिक्षण सोडून वडिलांचं पंक्चरचं दुकान चालवण्याचा निर्णय घेतला. दहावीचा निकाल आला. वरुण त्याच्या शहरातून दुसरा आला होता. पण घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्यास तो मजबूर झाला.
वरुणच्या पंक्चरच्या दुकानातून येणाऱ्या कमाईत त्यांचा घरखर्च चालत असे. पण त्याला पुढच्या शिक्षणासाठी पैसे मात्र काही शिल्लक राहत नव्हते. अन त्याच्याकडे दुकानामुळे शिक्षणासाठी वेळ देखील राहत नव्हता. पण त्याच्या आयुष्यात एक ओळखीचा डॉक्टर देव बनून आला. वरुणची शिक्षणाची आवड त्या डॉक्टरला माहिती होती. त्याची प्रतिभा भी तो ओळखून होता. त्याने वरुणच्या पुढील शिक्षणाची फीस भरली. वरुणच्या आईने पंक्चरचं दुकान सांभाळायला सुरुवात केली. वरुणचं पुढील शिक्षण सुरु झालं.
पुण्याच्या MIT कॉलेजमध्ये वरुणने प्रवेश घेतला. तिथं प्रचंड मेहनत घेतली आणि पहिल्याच सेमिस्टरला तो टॉपर आला. त्यानंतर कॉलेजनेच त्याला स्कॉलरशिप दिली. ज्यामुळे तो त्याचे इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण करू शकला. वरुणने अभ्यासासाठी कधी पुस्तके खरेदी केले नाही. त्याला त्याचे मित्र पुस्तके आणून देत असत. मित्रांनी वाईट वेळेत साथ दिल्याने वरुण आज मोठ्या पदापर्यंत पोहचला आहे.
इंजिनिअरिंगच्या फायनल सेमिस्टरमधेच वरुणला मोठ्या MNC कंपनीमध्ये जॉब मिळाला. पण अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या वरूणने देशसेवा करण्यासाठी IAS बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे IAS च्या तयारीसाठी फक्त ६ महिने होते. कारण त्याला नंतर त्या कंपनीमध्ये जॉईन करायचं होतं. त्याला नोकरी जॉईन न करून चालणार नव्हते. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी ती नोकरी त्याला जॉईन करणे बंधनकारकच होते. त्यामुळे नोकरी जॉईन करण्यापूर्वी ६ महिन्यात IAS ची तयारी करण्याचा निर्धार त्याने केला.
वरुण एका मित्राच्या मदतीने एका कोचिंग क्लासला जॉईन झाला. तो तिथं विद्यार्थ्यांना धडे द्यायला लागला. त्याला अभ्यासासाठी देखील याचा फायदा झाला. पण पुन्हा पैशांची कमी असल्याने त्याला UPSC ची पुस्तके खरेदी करायला संघर्ष करावा लागला. पण एका व्यक्तीची रेल्वेमध्ये झालेली ओळख कामा आली. त्या व्यक्तीने होप NGO बद्दल माहिती दिली होती. त्या NGO कडूनच वरुणला पुढील तयारीची पुस्तके मिळाली.
प्रचंड मेहनत घेऊन वरुनने UPSC ची परीक्षा दिली. मेहनतीचे फळ मिळाले आणि वरुण देशात ३२ वा येत कलेक्टर झाला. कठीण परिस्थितीत तिच्यावर मात केल्यास एक दिवस यश नक्की मिळतं हे वरुणने दाखवून दिलं आहे. वरुणच्या आयुष्यात अनेक संकटं आली अनेक अडचणी होत्या पण त्याने कधी हार मानली नाही. त्याने त्याच्यावर मात करून आपलं स्वप्न पूर्ण केलं. वरुणच्या या जिद्दीला सलाम.