Monday , June 5 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / पंचायत समिती सदस्य ते महाराष्ट्राचे गृहमंत्री, अनिल देशमुख यांचा संपूर्ण जीवनप्रवास

पंचायत समिती सदस्य ते महाराष्ट्राचे गृहमंत्री, अनिल देशमुख यांचा संपूर्ण जीवनप्रवास

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात वकिल जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने आज यामध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यामुळे सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हंटलं आहे. सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून या प्रकरणात आरोप केले होते.

दरम्यान एका अधिकाऱ्याने आरोप केल्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेणे योग्य नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने अनिल देशमुख यांची सुरुवातीला पाठराखण केली होती. पण थेट न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यामुळे आज मात्र अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे विदर्भातील मोठे नेते आहेत. त्यांचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सुरु झालेला प्रवास पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ते विविध खात्याचे मंत्रिपद भूषवत ग्रहमंत्रिपदापर्यंत पोहचला होता. बघूया त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास.

आज शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे अनिल देशमुख हे एकेकाळी एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ते होते. अनिल देशमुख यांचा जन्म विदर्भात झाला. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील वडविहिरा हे त्यांचं गाव. त्यांचं शिक्षण हे काटोलमध्ये झालं तर नागपुरातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. १९७० साली अनिल देशमुख हे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात सक्रिय झाले. त्यांचे चुलत बंधू रणजित देशमुख हे काँग्रेसचे मोठे नेते.

ते राजकारणात खूप सक्रिय झाले. पुढे त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि निवडणूनही आले. त्यांनी आपल्या संबंधाच्या बळावर नरखेड पंचायत समितीचे सभापतिपद मिळवलं. पुढे १९९२ साली ते नागपूर जिल्हा परिषदेत जलालखेडा गटातून सदस्य म्हणून निवडून आले जिल्हा परिषदेत पण अनिल देशमुखांचे भाग्य उजळलं आणि ते जुलै १९९२ मध्ये नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष बनले. नुकतंच तेव्हा राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता.

या पदाच्या बळावर त्यांनी नागपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख बनवली. आपल्या अवतीभोवती मोठं वलय निर्माण केलं. तेव्हा ते काँग्रेसचेच नेते होते. १९९५ च्या निवडणुका आल्या. त्यांनी आता थेट आमदारकीची तयारी सुरु केली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. पण काँग्रेसने ती नाकारली. पण त्यांनी मात्र चंगच बांधला होता. ते अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात तेव्हा काँग्रेसचे शरद पवार मुख्यमंत्री होते.

त्यावेळी काँग्रेसचे आमदार सुनील शिंदे याना पुन्हा उमेदवारी पक्षाने दिली होती. तर शेकापचे वीरेंद्र देशमुख आणि भाजपच्या प्रेरणा बारोकर या मैदानात होत्या. अपक्ष अनिल देशमुख देखील मैदानात उतरले. त्यांनी ५ वर्ष जोरदार तयारी केली होती. पण काँग्रेसने तिकीट नाकारलं होतं. सुनील शिंदे हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे होते. पवारांनी काटोलमध्ये सभा घ्यायचं ठरवलं. पण ती सभा अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती. या निवडणुकीत अनिल बाबू देशमुख हे प्रचंड मतांनी अपक्ष निवडून आले.

पहिल्याच टर्ममध्ये त्यांना युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. देशमुखांकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली. युती सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनीच ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार सुरू केला होता. अपक्ष असलेले अनिल देशमुख १९९९ साली पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

१९९९ आणि २००४ मध्ये आमदार बनत त्यांनी काटोलमधून हॅट्ट्रिक केली. १९९९ च्या आघाडी सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्रिपद होतं. पुढे २००१ ला कॅबिनेट आणि २००४ ला सार्वजनिक बांधकामच कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालं. २००९ च्या आघाडी सरकारमध्ये ते नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण चे कॅबिनेट मंत्री होते. २०१४ ते २०१९ याच ५ वर्षात देशमुखांकडे मंत्रिपद नव्हतं. राष्ट्रवादीचे ते आज एक वजनदार नेते मानले जातात.

शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री असताना सिनेमागृहात राष्ट्रगीताची सक्ती त्यांनी केली होती. शिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात मुंबईतील सात किलोमीटरचा वांद्रे-वरळी सी लिंक बांधून पूर्ण झाला होता. अपक्ष आमदार म्हणून सुरुवात, पहिल्याच टर्ममध्ये युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री, मग शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश, नंतर आघाडीच्या प्रत्येक सरकारमध्ये महत्त्वाचं मंत्रिपद… अशी अनिल देशमुखांची आजवरची कारकीर्द राहिलीय.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *