मराठवाड्यात मुलींना शिक्षण देण्याप्रती मानसिकता थोडी वेगळी आहे. खासकरून ग्रामीण भागात मानसिकता वेगळी आहे. अनेकदा परिस्थितीमुळे देखील मुलींना शिक्षण दिलं जात नाही. लवकर लग्न उरकून मुलीला सासरी पाठवने हेच पित्याला हवं असतं. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शिक्षकाने आपल्या मुलीचं दहावीतच लग्न लावून दिलं. शिक्षक असूनही हा पिता मुलीला शिकवण्यास पुढे गेला नाही. या मुलीच्या आयुष्यात मात्र अनेक संकटं आली. पतीचं अकाली निधन झालं. कधीही घराबाहेर न पडलेली हि स्त्री स्वतःच्या पायावर कशी उभी राहिली हे जाणून घेणे खूप प्रेरणादायी आहे..
गीता विष्णू चव्हाण. उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहतरवाडीची एक सामान्य गृहिणी. गीताने वडिलांकडे आणि पतीकडेही बाहेरचं जगच कधी बघितलं नाही. तालुका असलेल्या उस्मानाबादला देखील तीच कधी जाण झालं नाही. व्यवहार देखील तिला कधी माहिती नव्हता. मुलांचा सांभाळ आणि घरकाम एवढाच तिचा नित्यक्रम. पतीचा त्रास असायचा. गीताजवळ पती १०० रुपये देखील ठेवू द्यायचा नाही. मुलांचे खाण्यापिण्याचे हाल होते. पती महिन्याला गुत्तेदारीतून लाखभर रुपये कमवायचा पण तो पैसा घरी येत नसे.
गीताच्या पतीला जमीन बेताचीच होती. २ एकरमध्ये ऊस होता. गीताच्या पतीची गुत्तेदारी सुटली. शेतात काम करावं लागु लागलं. शेतातील काम विष्णू चव्हाण यांना कठीण वाटू लागलं. कामाची सवय नव्हती. यामुळे ते सारखं टेन्शन घ्यायला लागले. याच ताणावर एकेदिवशी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. गीतावर दुःखाचा डोंगर कोसळला. दीड वर्ष गीता घरात एका कोपऱ्यात बसून रडत बसली. बाहेरचं काही ज्ञान देखील नव्हतं.
पतीच्या निधनानंतर जेव्हा प्रेत आणलं होतं तेव्हा गाव त्या प्रेताकडे न बघता गीताकडे बघत होता. कारण त्यांना वाटलं हि कधीही घराबाहेर न पडलेली हि बाई आता पुढे कसे जगेल. ३ लेकरं होती. १२ वर्ष गीता घरातच होती. गीता दहावीपर्यंत शिकलेली होती पण बाहेरचं थोडंही ज्ञान तिला नव्हतं. जगण्याचा प्रश्न होता. शिक्षक असलेल्या वडिलांनी गीताला दरमहिन्याला किराणा भरून दिला. तिचा सांभाळ ते करू लागले. पण त्यांनी पुढे थोडं थोडं करून तिला सामान देणं बंद केलं.
गीतासमोर कसं जगायचं हा प्रश्न होता. घरी परिस्थिती पूर्वी चांगली होती त्यामुळे आता बाहेर काही पण काम करायची देखील तिला लाज वाटत होती. घरी ती मिक्सरवर लोकांना मसाले, तिखट बनवून देऊ लागली. आकडा असल्याने बिल भरायचं टेन्शन नव्हतं. हप्त्याला २-३०० रुपये मिळायचे. त्यात त्यांचं जीवन चालायचं. गीताचा दीर सरपंच होता. ती त्यांच्याकडे कामाला जाऊ लागली. पण वडिलांनी कामाला जाऊ नको म्हणून सांगितलं. पुन्हा वडिलांनी आधार दिला.
पुढे गीता गटात गेली. गटात तिनं हजार रुपये सुरुवातीला घेतले. ते फेडण्याचा पण विश्वास नव्हता. पण एका हप्त्यातच तिने मसाले बनवून देऊन दीड हजार रुपये कमावले. ते कर्जही फेडलं अन ५०० रुपयेही उरले. काम करून करून तिने ३ हजार रुपये जमा केले. त्याची तिने शिलाई मशीन घेतली. गावात एकपण शिलाई मशीन नव्हती. त्यामुळे हा व्यवसाय देखील चालला. तिला ब्लाउज शिवता येत नव्हते. पण पोत्याचे पंथे ताडपत्रे शिवून ती महिन्याला ४-५ हजार रुपये कमवू लागली. जेव्हा गीताकडे ५ हजार रुपये साचले तेव्हा तिने १ हजाराची स्टेशनरी विकायला आणली. त्यातून तिला ५०० रुपये नफा भेटला.
तिने असंच थोडं थोडं भांडवल जमा करत ७००० रुपये जमा केले. त्यांनतर त्यांनी गटाच्या माध्यमातून उमेद मधून एक कृषी सेवाकेंद्र घेतलं. पण दुकानात माल भरायची परिस्थिती नव्हती. १० जणींनी मिळून ५० हजार जमा केले आणि बी बियाणे खत दुकानात विकायला आणली. त्यांनी दुसऱ्या दुकानदाराकडूनच माल आणल्यामुळे जास्त नफा झाला नाही. तरी ५० हजार त्यांना ७ हजार नफा झाला. पुन्हा एका संस्थेने मदत केली. त्यांनी एक लाख भांडवल दिलं. पुन्हा दीड लाखाचा माल आणला. त्यातून त्यांना ४० हजार नफा भेटला.
उमेदने पुन्हा २ लाखाचं भांडवल सहेली गटाला दिलं. यातून त्यांचा कृषी सेवा केंद्राचा उद्योग चांगला चालू आहे. विधवा महिलांना निघालेल्या एका स्कीममधून गीताने एक दालमिल मशीन घेतलं. घरी दालमिलचा व्यवसाय देखील चांगला चालू आहे. आज तिचा स्टेशनरीचा व्यवसाय देखील वाढला आहे. याशिवाय शिलाई काम देखील गीता करते.
कधीही घराबाहेर न पडलेली गीता आज शेती देखील करते. गीता आज मोठ्या आत्मविश्वासाने अनेक व्यवसाय करत आहे. तिला आणखी एका योजनेच्या माध्यमातून माशांच्या नेआण करण्यासाठी वाहन घेण्यासाठी कर्ज मिळालं आहे. लवकरच ती हे वाहन देखील घेणार आहे. गीता एवढे सर्व व्यवसाय करून आज मुलींना देखील चांगलं शिक्षण देत आहे. शिक्षकाची मुलगी असूनही कधी उस्मानाबादला न गेलेली गीता आज व्यवसायामुळे दिल्लीला जाऊन आली आहे. शिवाय तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज ती अनेक शेतकऱ्यांना देखील प्रशिक्षण देते. तिचा हा प्रवास खरोखरच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.