आई वडील हे आपल्या मुलींसाठी नेहमीच चांगलं स्थळ बघून देण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा या निर्णयात मुलीला चांगलं स्थळ मिळतच असं नाही. कारण ज्या अपेक्षेने मुलीला दिलेलं असतं त्या मुलांकडून पूर्ण होत नाहीत. यामागे अनेक कारण असू शकतात. अनेकदा काही संकटांनी देखील मुलीच्या आयुष्यात कठीण परिस्थिती उद्भवते. आई वडिलांकडे तुच्छतेची वागणूक मिळालेली एक मुलगी सासरी गेल्यावर पतीचं अकाली निधन झालं. आणि तिच्यावर कोसळलेल्या संकटावर तिने मात करत आज स्वतःचा लाखोंची उलाढाल असणारा व्यवसाय उभा केला आहे. जाणून घेऊया तिचा संपूर्ण जीवनप्रवास…
अलका लक्ष्मण सावंत. साताऱ्यातील एका खेडेगावात गरीब सामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी. आई वडील पोट भरण्यासाठी पुण्यात आले. अलकाच्या आयुष्यात माता पित्याकडे दुःख नशिबाला आलं. कारण ती ज्या कुटुंबात जन्माला आली त्या आई वडिलांना मुलगी नकोशी होती. पुढे वयाच्या १६ व्या वर्षी अलकाचं लग्न आई वडिलांनी करून दिलं. नवरा वयाने १६ वर्षांनी मोठा होता. सुखाचा संसार करायचा हे स्वप्न घेऊन अलका पतीकडे गेली.
मुलगा शिक्षक आहे म्हणून तिला देण्यात आलं होतं. पण नंतर कळलं कि पती हा हंगामी शिक्षक आहे. त्याला कायमस्वरूपी नोकरी नाहीये. पतीला रायगड जिल्ह्यात नोकरी मिळाली. अलका खूप खुश होती. पती प्राध्यापक झाला होता. मुलगी झाली. त्यानंतर पुन्हा नवीन संकट आलं. पतीच्या संस्थेने त्यांच्या जागेवर दुसरा माणूस नोकरीला घेतला. नेट सेट परीक्षा पास नाही म्हणून त्यांना कमावून काढण्यात आलं.
हे प्रकरण कोर्टात गेलं. अलकाच्या पतीची केस कोर्टात गेल्यामुळे ते शिक्षक म्हणून कुठल्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये काम करू शकत नव्हते. असा कोर्टाचा नियमच आहे. घरखर्च वाढला होता आणि इन्कम बंद झालं. अलकाच्या वडिलांनी तिला वडापावची गाडी टाकायचा सल्ला दिला. गावामध्ये प्रतिष्ठित असलेल्या हाताखाली एक कामाला व्यक्ती असलेल्या या प्राध्यापकाची बायको असलेल्या अलकाने कुठलीही लाज न बाळगता वडापावचा गाडा चालू केला. तिला अनेक जण येऊन म्हणत अरे सावंत मॅडम तुम्ही इथे. तिला सुरुवातीला लाज वाटू लागली. ती ओळखीचं कोणी आलं तर तोंड लपवत असे पण वडिलांनी सांगितलं कि कष्टाला कसलीही लाज नसते.
वडापावचा व्यवसाय खूप चांगला चालला. नंतर त्यांनी चायनीजची गाडी टाकली. सर्व सुरळीत चालू होतं. पण तिथल्या एका स्थानिक नेत्याच्या डोळ्यात त्यांची प्रगती खुपली. त्याने त्यांच्यावर दडपण आणून त्यांची हॉटेल बंद पाडली. कारण त्याला तिथं हॉटेल चालू करायचं होतं. सावंत कुटुंबाने ते सोडून पुण्याला यायचा निर्णय घेतला. पतीला शिकवण्याशिवाय काही काम येत नव्हतं. अलकानेच कामाला सुरुवात केली. आयडिया कस्टमर केअर मध्ये ती जॉईन झाली.
पुढे वेगवेगळे जॉब बदलले. एका घराजवळच्या कंपनीमध्ये ती कामाला होती. एकेदिवशी अचानक फोन आला कि सावंत मॅडम तुमच्या पतीच्या पोटात खूप दुखत आहे तुम्ही हॉस्पिटलला या. नोबेलमध्ये पतीवर सुरुवातीला उपचार केले. खर्च झेपत नव्हता म्हणून नंतर ससून मध्ये ऍडमिट केलं. नंतर लक्षात आलं कि पतीला स्वादुपिंडाचा कँसर झालाय. हे संकट खूप मोठं होतं. कँसर शेवटच्या स्टेजवर होता. वाचण्याची शक्यता नसल्यात जमा होती. अवयव निकामी होत होते. ५५ टाके पडलेले होते. जखमांवर पट्टी करायला अलकाकडे पैसे नसायचे.
दिवसभर काम करून रात्री ससूनमध्ये पतीबरोबर ती राहायची. पतीला माहिती होतं कि आपण आता वाचू शकत नाही. त्यांनी अलकाला सांगितलं कि आपल्या स्वप्नालीला डॉक्टर कर. ज्यामुळे असं पैसे नाहीत म्हणून एखादा माणूस मरत असेल तर ती त्याच्यावर उपचार करेल. २०११ मध्ये पतीचं निधन झालं. मुलगा ५ तर मुलगी तेव्हा १० वर्षाची होती. भाड्याच्या घरात राहत होती. संघर्ष सुरु झाला. एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये ती जॉबला लागली. तिथं पूर्ण काम ती शिकली. तिथं जॉब करताना तिच्या लक्षात आलं कि ती स्वतः देखील ट्रॅव्हल एजन्सी सुरु करू शकते. त्यासाठी लागणारी डिग्री पूर्ण केली.
घरामध्येच एक कॉम्पुटर आणि प्रिंटर घेऊन कामाला सुरुवात केली. जस्टडायलला रजिस्ट्रेशन केलं. रेडबस वर पण नोंदणी केली. ती स्वतः गाड्या अरेंज करून सोडायला लागली. त्याच्यातून चांगले पैसे मिळायला लागले. दिवसाला ५-५ हजार रुपये उरायचे. त्यानंतर आयडिया येत गेल्या. डोमेस्टिक टूर पॅकेज तयार केले. सर्व काही चांगलं सुरु होतं. एक न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाची मोठी ट्रिप तिच्याकडे आली. तिला अनुभव नव्हता. एका माणसाकडे यासाठी मदत मागितली. त्याच्याकडे पैसे दिले असता तो ते घेऊन पळून गेला. त्या माणसांचं ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडमध्ये गेल्यावर राहायचं बुकिंगचं केलं नव्हतं. ती ट्रिप फेल गेली.
पुन्हा सर्व संपलं. नाव खराब झालं. लोकांना माहिती होतं कि तिची काही चूक नाही. पुन्हा जॉब चालू केला. पण तिचं मन ट्रॅव्हल एजन्सी मधेच अडकलं होतं. नंतर हळू हळू पुन्हा व्यवसाय सुरु केला. पुन्हा डोमेस्टिक टूर चालू केल्या. पुन्हा व्यवसाय उभा राहिला. आज अलकाच्या नाशिक सांगली मुंबई आणि पुण्यात शाखा आहेत. एंजॉय हॉलिडे नावाची एजन्सी आज नावारूपाला आली आहे. अलकाची मुलगी आज डॉक्टरकीचे शिक्षणही घेत आहे. तिने मोठ्या संघर्षाने आज स्वतःला सिद्ध केलं आहे.