बारामती मधील लता भगवान करे हे नाव काही वर्षांपूर्वी देशभर झळकले होते. त्यावेळी ६२-६३ वर्ष वय असलेल्या लता करे या आपल्या पतीच्या उपचारासाठी पैसे मिळावे म्हणून एका मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्या अन तिथं असं काही पळाल्या कि त्या जिंकेपर्यंत थांबायचं नाहीत. त्यांना पतीच्या उपचारासाठी लई लाख २ लाख रुपये देखील पाहिजे नव्हते. हवे होते फक्त ५ हजार रुपये. जे त्यांनी हि मॅरेथॉन जिंकून मिळवले.
लताबाईंचे मॅरेथॉन जिंकल्यानंतरचे फोटो अन त्यांची कहाणी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. हि बातमी एका तेलंगणाच्या तेलगू न्यूजपेपरने लता करे यांची बातमी छापली होती. ती बातमी नवीन कुमार देशबोई या दिग्दर्शकाच्या वाचण्यात आली. त्याला ती एवढी आवडली कि त्याने त्याच्यावर चित्रपट बनवण्याचं ठरवलं अन बारामती गाठली. लता करे यांची भेट घेतली. अन चित्रपटाचं ठरलं.
लता भगवान करे या नावानेच हा सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये लता यांनीच मुख्य भूमिका केली. हैदराबाद येथील पतनज्योती क्रिएशन्सने हा चित्रपट बनवला. लता करे यांचे पती भगवान व मुलगा सुनील हे दोघेही चित्रपटात झळकले होते. नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली ज्यात लता भगवान करे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र जीवनावर चित्रपट येऊन, राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील लताबाई यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.
कोण आहेत लता करे-
लता आणि भगवान करे हे कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. पण कामानिमित्त ते बारामतीला आले. तिथं भगवान हे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करू लागले. तर लता या शेतात काम करत. त्यांना ३ मुली आणि एक मुलगा. पैसे जोडून मुलींचं लग्न केलं. मुलाला कुठलीही नोकरी नव्हती. त्यामुळे हातावर मिळेल त्या कामावरच त्यांचं पोट भरत असे. २०१४ मध्ये भगवानरावांची तब्येत बिघडली. चक्कर येत होत्या आणि छातीत दुखत होतं. डॉक्टरांनी MRI करायला सांगितले. पण लताकडे ५००० रुपये नव्हते.
तिला शेजारच्या मुलांनी सहज विचारलं कि आजी तू एवढं चालते तर मग मॅरेथॉन मध्ये का नाही जात. बारामतीत शरद मॅरेथॉन बद्दल कळलं. भाग घेण्याचं ठरवलं. कुठलीही माहिती नव्हती. फक्त पतीसाठी पळायचं एवढंच डोक्यात होतं. साडी नेसूनच लताबाई मॅरेथॉनला पोहचल्या. चप्पल घालून पळायला सुरुवात केली. चप्पल तुटली पण त्या काही थांबल्या नाहीत. रेस जिंकूनच थांबल्या. त्यांना ५००० रुपये बक्षीस मिळालं. त्यानंतर ३ वर्ष लता मॅरेथॉन मध्ये धावल्या आणि विजयाची हॅट्रिक केली.
लता आणि भगवान करे सध्या काय करतात?
भगवान करे यांना आपली पत्नी उपचारासाठी एवढं धावली याचा आनंद आहे. पण त्यांना दुःख देखील आहे कि पतीला या वयात एवढं सर्व करावं लागलं. लता करे या सध्या बारामतीतच राहत असून त्यांची परिस्थिती नाजूकच आहे. त्यांच्या नशिबात संघर्ष कायम आहे. २०१४ मध्ये जशी त्यांची परिस्थिती होती आजही तशीच आहे. सुधारणा काही झाली नाहीये. त्यांना आजही शेतात राबल्यावरच एक टाईमचं जेवण मिळते. हलाखीचे जीवन त्या जगतात. त्यांचं स्वतःच घर देखील अजून नाहीये.