पोलिसाची पत्नी म्हणून तिने संसार थाटला. अनेक स्वप्न होती. संसार सुखात सुरु होता. पण आयुष्यात संकट आलं. पोलीस असलेला पती शहीद झाला. त्याच्याशिवाय जीवनच जगू शकत नाही या भावनेने तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ती वाचली. जीवनाचं मूल्य ओळखून तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. एकेकाळी जग सोडण्याच्या विचारात असलेली ती आज दुसयांसाठी प्रेरणादायी बनली आहे. अनपेक्षितने पोहचलेल्या क्षेत्रात तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. जाणून घेऊया तिचा प्रेरणादायी जीवनप्रवास..
अनिता विष्णू राठोड तिचं नाव. सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथील एक गृहिणी. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. मोठी झाल्यावर तिनेही स्वप्न पाहिलं कि आपला एक छानसा संसार असावा. अनिताला पोलीस पती मिळावा अशी इच्छा होती. तिचं हे स्वप्न पूर्णही झालं. मनासारखा जोडीदार तर होताच पण तो अनिताला प्रत्येक गोष्ट द्यायचा. तिच्या प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत असे. नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा. पोलीस खात्यातही तो जबाबदार अधिकारी म्हणून ओळखला जायचा. पती इतरांना सांगायचं संकटांशी लढा त्यावर मात करा. पण हि वेळ पत्नी अनितावरच आली.
सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि त्यात वादळ आलं. अनिताचे पती एपीआय विष्णू राठोड हे ड्युटीवर असताना शहीद झाले. हा खूप मोठा धक्का होता. अनिताच्या पोटात तेव्हा ९ महिन्याचं बाळ होतं तर २ छोटी मुलं होती. ती खूप तुटली होती. तिला हा धक्का सहनच होत नव्हता. तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. पण ती त्यातून वाचली. ५ दिवस बेशुद्ध होती. नंतर शुद्धीवर आल्यावर आईवडिलांनी तिला समजावलं. ती सावरली. गाव छोटासा तांडा असल्यामुळे तिने पुण्यात जायचा निर्णय घेतला.
अनिताचे ग्रॅज्युएशन झालेलं होतं. सोबतच तिची काम्पुटर टायपिंग देखील झालेली होती. सासू सासरे मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. तिने अनेक इंटरव्हिव्ह दिले. एका शिक्षण विभागातून १२ हजाराची नोकरी मिळाली. तिच्या समोर अनेक प्रश्न होते. पतीने गिफ्ट दिलेल्या कॅमेऱ्याकडे तिची नजर गेली. तिने फोटोग्राफी चालू करण्याचं ठरवलं. काहीही माहिती नव्हतं. एका प्रोफेशनल कडून सर्व शिकून घेतलं. ती काम करायला लागली. एका ब्रँड शूटला गेल्यावर आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या शूटची मॉडेल आली नाही. सर्व मुलं होती. अनिता एकटीच मुलगी होती. तिला फोटोशूट ला बसायला सांगितलं गेलं.
अनिताचे फोटो अप्रतिम आले. तिचं खूप कौतुक झालं. सर्वानी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. तिने एका संस्थेकडे ऑडिशन दिले. हजारो मुलींमधून तिची सिंगापूर इंटरनॅशनल साठी निवड झाली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण तिने आनंदाच्या भरात पुढे न जात डोक्याने पुढील पाऊल उचलले. मॉडेलिंग मध्ये फसवणूक होते हे तिला माहिती होतं. त्यामुळे तिने पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या मॉडेलिंग स्पर्धेविषयी माहिती काढून घेतली. तिला सर्व सुरक्षित असल्याची खात्री पोलिसांनी दिली.
नंतर तिच्यापुढे प्रश्न होता आईवडील सासू सासर्यांना कसं तयार करायचं. सर्वाना मॉडेलिंग विषयी सांगितलं तेव्हा सर्वानीच नकार दिला. पण तिने त्यांना नंतर विश्वासात घेऊन समजावलं. आई वडिलांना अमृता फडणवीस यांची मॉडेलिंगची क्लिप दाखवली. मुख्यमंत्र्यांची बायको करते तर मी का नाही असं सांगितलं. त्यांना सपोर्ट करायला विश्वासात घेतलं. अनिता सिंगापूरला गेली. तिथं तिला बंजारा समाजाचा पारंपरिक घागरा घालून सर्वांसमोर जाण्याची संधी मिळाली. टाळ्यांचा कडकडाट होता.
अनिता तिथंच जिंकली होती. आज अनिता मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहे. तिची जागतिक स्पर्धेसाठी देखील निवड झाली होती. तिथं भारताचं प्रतिनिधित्व तिने केलं. तिथं तिने पोलिसांना रिप्रेझेन्ट केलं. तिने साऊथ आफ्रिकेत भारतीय पोलिसांचा अभिमान गाजवला. पती वारल्यानंतर तिने केलेला हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारा आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वतःमधील क्षमता ओळखून आयुष्यात वाटचाल करणे हेच यशस्वी आयुष्याचे रहस्य आहे हे अनिताने दाखवून दिले आहे.