सासर सोडून माहेरला जाताना मनाशी तिने ठरवलं कि जोपर्यंत स्वतःच्या नावाचं काही मोठं वलय तयार करत नाही तोपर्यंत सासरला यायचं नाही. हा संकल्प मनाशी केला होता घाटकोपरच्या पोलीस कॉर्टर मध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असलेल्या रेखा जगदाळेने. एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी ते स्वतः एक PSI इथपर्यंतचा रेखाचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
रेखाचे वडील हे मुंबई पोलीस खात्यात सेवेत आहेत. रेखा घाटकोपरच्या पोलीस कॉर्टर मध्ये वाढली. घाटकोपरमध्येच तिचं शालेय आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालं. २०१०-११ मध्ये रेखाचं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण झालं. एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने तिच्या मनात देखील पोलीस बनण्याचे आकर्षण होते. पण ग्रॅज्युएशन नंतर तिला आत्याच्या मुलाकडूनच मागणी आली आणि तिचं लग्न झालं. लग्न झाल्यावर तिने आपले मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले.
तिला लग्नानंतर जॉब करायचा होता. ती खासगी जॉब करत होती पण तिथं खूप राबवत होते. म्हणून नवऱ्याने सांगितले कि तुला जॉब करायचाच तर गव्हर्नमेंट जॉबला जा. तिला घरात बसायचं नव्हतं. स्पर्धा परीक्षेची तयारी तिने सुरु केली. पहिल्याच वर्षाच्या तयारीत तिने MPSC ची पूर्व परीक्षा पास केली. तिने PSI ची पूर्व परीक्षा पास केली होती. पण घरच्यांची इच्छा होती कि तिने पोलीस खात्यात न जाता दुसऱ्या एखाद्या सेवेत जावे.
तिच्या सासरच्या मंडळींचा पोलीस बनण्यास तिला खूप विरोध होता. सासू सासर्यांचं म्हणणं होतं कि सुनेला शिकवायचं नाही. तिला आमची सेवा करण्यासाठी घरीच राहूद्या. तिच्या जॉबशी आम्हाला काही घेणंदेणं नाही असं ते म्हणाले. तिथं आईवडिलांना थोडं वाईट वाटलं. लग्नानंतर एक वर्षातच सासरचे लोक बदलले होते. रेखासाठी देखील हा धक्का होता. तिला घरातच राहा असं सांगितलं जाऊ लागलं.
पण स्वतःसाठी लढायचं तिने ठरवलं आणि ठाण्याच्या सासरच्या घरून निघताना संकल्प केला कि जोपर्यंत नावाला वलय प्राप्त होत नाही तोपर्यंत आता सासरला यायचं नाही. ती माहेरला आली. ती प्रेग्नन्ट देखील होती. तिचा अभ्यास कमी झाला. बाळ झाल्यावर तिने पुन्हा जोरदार तयारी सुरु केली. बाळ २ महिन्याचं झालं तेव्हापासूनच ती लायब्ररीमध्ये जायला लागली. तिच्या भावाच्या लक्षात आलं कि बाळामुळे तिला पूर्णवेळ अभ्यास करता येत नाही. भावाने तिला पुण्याला जाऊन पूर्णवेळ अभ्यास करायला सांगितले.
८-९ महिन्याचं बाळ आईवडिलांकडे सोडून ती पुण्याला आली. ती खूप रडली पण बाळासाठी आणि स्वतःसाठी पुण्याला आली. पुण्यात पोहचेपर्यंत आणि पुण्यात आल्यावर देखील प्रत्येक रात्री ती रडली. ती खूप मेहनत घ्यायला लागली. राज्य सेवेच्या २ पूर्व परीक्षेत तिने यश मिळवलं. PSI च्या मुख्य परीक्षेस देखील ती पात्र झाली. दिवसरात्र अभ्यास करून मेन्स दिली आणि नंतर फिजिकलची तयारी चालू केली. सिझेरिअन झालेलं असूनही तिने फिजिकल मध्ये १०० पैकी ९६ मार्क मिळवले.
तिने नंतरही राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. पण PSI परीक्षेचा निकाल आला आणि त्यात रेखा PSI बनली. तिचे आई वडील भाऊ सर्व खूप खुश झाले. जो नवरा करू नको म्हणून विरोध करत होता नंतर तोच खूप खुश होऊन सर्वाना सांगू लागला बायको PSI झाली. नंतर तिने हक्काने सासरच्या घरी प्रवेश केला.