आपल्या देशात असा एक व्यक्ती होऊन गेलाय जो पाकिस्तानमध्ये जन्मला. तिथे त्यांचं कुटुंब एवढं गरीब होतं कि त्यांचे खाण्याचे हाल असायचे. ते कुटुंब दिल्लीत आलं. दिल्लीतून येऊन त्याने टांगा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. पण त्याच्याकडे असलेली जिद्द आणि मेहनत त्याला देशाचा मसाला किंग बनवून गेली. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून एमडीएच मसालेचे सर्वेसर्वा दिवंगत महाशय धर्मपाल गुलाटी आहेत.
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे २७ मार्च १९२३ रोजी झाला. धर्मपाल यांचे वडील महाशय चुन्नीलाल यांचे सियालकोट येथे ‘महाशियान दी हट्टी’ नावाचे छोटेसे मसाल्याचे दुकान होते. पण पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या धर्मपाल यांचा प्रवास पाकिस्तानमधून भारताकडे आला. भारत स्वातंत्र्य झाल्यावर फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानच्या सियालकोट मधील गुलाटी यांचं कुटुंब बेघर झालं आणि भारतात आलं. लाखो लोकांप्रमाणे गुलाटी यांचा देखील पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. धर्मपाल दिल्लीत भावासोबत काही कामधंदा शोधात होते.
त्यांनी टांगा चालवण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी त्यांनी ६५० रुपयात टांगा आणि घोडा घेतला. त्याकाळी हि मोठी रक्कम होती. काही दिवस त्यांनी टांगा चालवला पण त्यात मन न रमल्यानं लवकरच त्यांनी टांगा चालवणे सोडून दिलं. त्यांच्या भावाला त्यांनी हा टांगा चालवायला दिला. त्यांच्यासमोर पुन्हा प्रश्न निर्माण झाला कि काय काम करावं. त्यांनीही वडिलांप्रमाणे मसाले व्यवसाय करायचं ठरवलं. त्यांनी करोलबाग मध्ये अजमल खान रोडवर एक छोटंसं दुकान उघडून त्यातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. ते स्वतः मसाले बनवायचे आणि घरोघरी जाऊन त्यांनी ते विकले देखील.
हळू हळू त्यांचा व्यवसाय वाढायला लागला. १९५९ मध्ये त्यांनी दिल्लीच्या कीर्ती नगर मध्ये मसाल्यांची पहिली फॅक्टरी चालू केली. मोठं काम करण्यास यातून सुरुवात झाली होती. चांगल्या चवीमुळे आणि क्वालिटीमुळे त्यांचं दुकान लवकरच खूप फेमस झालं. धर्मपाल गुलाटी यांनी या दुकानाचं नाव ‘महाशिया दी हट्टी'(MDH) ठेवलं. त्यांच्या मसाल्याना हळू हळू बाहेरून मागणी व्हायला सुरुवात झाली. लवकरच त्यांनी पूर्ण देशात मसाले पाठवायला सुरुवात केली. धर्मपाल गुलाटी यांचं अवघं पाचवीपर्यंतचं शिक्षण झालेलं होतं.
त्यांचा हा व्यवसाय हळू हळू खूप मोठा झाला. लवकरच देशभरात त्यांच्या मसाल्यांना मागणी वाढली. देशभरात मसाले विकले जाऊ लागले. बघता बघता हा मसाल्यांचा व्यवसाय ३० देशात पसरला. आज MDH चे देशात १५ पेक्षा अधिक कारखाने आहेत. तर मसाले हे १०० पेक्षा अधिक देशात एक्स्पोर्ट केले जातात. धर्मपाल गुलाटी यांचा उद्योग हा २००० कोटींच्या घरात आहे. एवढा मोठा उद्योग झाल्यावर अनेक उद्योग हे बॉलिवूड सेलेब्रिटी किंवा खेळाडूंचा जाहिरातीसाठी वापर करतात. पण गुलाटी हे स्वतःच MDH मसालेचे ब्रँड अँबेसेडर होते.
मागील वर्षी वयाच्या ९८ व्या वर्षी धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. एका छोट्याशा दुकानातून सुरुवात केलेल्या गुलाटी यांची MDH मध्ये शेवटी शेवटी पगार होती वर्षाला २५ कोटी. पाचवी पास असलेल्या धर्मपाल यांनी पाकिस्तानमधून भारतात पोट भरायला येऊन २००० कोटींचा व्यवसाय उभा केला.