शेतीमध्ये पैसाच नाही हा समज खूप जणांचा आहे. तस बघायला गेली तर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला शेतीतून म्हणावं तसं काही हाती लागत नाही. पण आजकाल आधुनिक शेतीच्या माध्यमांतून असे अनेक शेतकरी आहेत जे महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्तम नियोजन, इच्छाशक्ती असल्यास सर्व काही शक्य होते.
पारंपरिक शेतीला बगल देत नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून विकास साधता येतो याचे अनेक उदाहरणं आज आहेत. असंच एक उदाहरण आहे ऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि. सांगली) येथील रघुनाथ व कस्तुरी या खांबे दांपत्याचे. खांबे दांपत्याने ३५ गुंठे पॉलिहाउसमध्ये गुलाबशेती फुलवली आहे.
खांबे दांपत्याने बाजारपेठेतील फुलांची मागणी लक्षात घेतली आणि पॉलिहाऊस मधील गुलाबशेती करत आज तालुक्यासह जिल्हाभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसं बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेतकरी ऊस आणि द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण याच उसाला बगल देत आज खांबे कुटुंबाने फुलशेतीमध्ये यश मिळवलं आहे.
आजोबांकडून मिळाले शेतीचे धडे-
रघुनाथ ज्ञानू खांबे यांचे आजोबा कै. बापूसाहेब कृष्णा खांबे स्वातंत्र्य सेनानी होते. ते ऊसशेती मध्ये पारंगत होते. त्यांना १९६७ मध्ये राष्ट्रीय ऊस स्पर्धेत शेतीनिष्ठ पुरस्कार देखील मिळाला होता. शेतीतील ज्ञान आजोबानी आपल्या नातवांना पण दिले. आजोबांच्या धड्यांची साथ घेत आणि स्वतः प्रचंड कष्ट घेत नातू रघुनाथ यांनी आज शेतीतील यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे.
रघुनाथ यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत उसाला पर्यायी पिकाची गरज ओळखली आणि गुलाबशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुणे, सांगली यांसह अन्य ठिकाणची फुलशेती बघून अभ्यास सुरु केला. कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, तळेगाव दाभाडे इथं पॉलिहाउसमधील गुलाब पाहिला. यातूनच त्यांनी गुलाबशेतीचा निर्धार केला.
२०१६ मध्ये त्यांनी ३५ गुंठ्यांत पॉलिहाउस उभारण्याचे ठरवलं आणि ते पूर्ण केलं. यासाठी बंगळूरहून रोपं आणली. त्यांनी लागवड केल्याबरोबर मार्केटचा देखील अभ्यास सुरु केला. यासाठी मुंबई, हैद्राबाद बंगळुरू येथे मार्केटला भेटी दिल्या. व्यापाऱ्यांशी संवाद सुरु झाला. त्यांना अनेक महत्वाच्या गोष्टी व्यापाऱ्यांकडून समजल्या. गुलाबाच्या काडीची उंची जेवढी जास्त, तेवढा दर चांगला मिळतो. अशा अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी जाणून त्याच्यावर काम सुरु ठेवलं.
त्यांनी मुंबई फूल मार्केटमधील अनेक व्यापाऱ्यांकडे शीतगृहे पाहिली. नंतर त्यांनीही २०१८ मध्ये शीतगृहाची उभारणी केली. याचा फायदा त्यांना मार्केटमधील दरांची स्थिती पाहून फुलांची साठवणूक करण्यासाठी झाला.
सकाळी सहा मजुरांसह रघुनाथ आणि पत्नी सौ. कस्तुरी यांचा सहा वाजल्यापासून दिवस सुरू होतो. काढणी, प्रतवारी, पॅकिंग अशी कामे लीलया पार पाडली जातात. सकाळी अकरा वाजेपर्यंत कामे आटोपल्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आष्टा येथील संघाच्या वाहनातून फुले पाठविली जातात.
आज रघुनाथ यांच्याकडे लाल, पांढरा व पिवळा गुलाब आहे. दररोज त्यांना १५ ते २० हजार लिटर पाणी दिले जाते. दररोज तिन्ही प्रकारच्या १५०० ते २००० गुलाबांची काढणी होते. महिन्याला ४० ते ४५ हजार फुले काढली जातात. ज्याची विक्री मुंबई, कोल्हापूर, सांगली, कराड येथे होते. लग्नसराई आणि वॅलेंटाईन डे ला गुलाबाला मागणी जास्त असते. लाल व पिवळा गुलाब २ ते १२ रुपयांपर्यंत जातो तर पांढरा गुलाब ३ ते ७ रुपयांपर्यंत जातो. अधिक माहितीसाठी- रघुनाथ खांबे,९३७७०५७७७७.