महाराष्ट्राची लोकसंस्कृती घडवण्यात आणि टिकवण्यात वासुदेव, गोंधळी, भुत्या, वाघ्या, मुरळी, भराडी, पोतराज इत्यादी समाज हे मोठी आणि महत्वाची भूमिका निभावतात. याच समाजांमुळे आपली लोकसंस्कृती टिकून आहे. उदरनिर्वाहासाठी अख्खे कुटुंब सोबत घेऊन ‘आज इथे, तर उद्या तिथे’ अशी भटकंती हे समाज करत असतात.
संबळ वाजवून इशारे करून बोटाच्या खुणांवरून कोड लँग्वेजमध्ये बोलणारे नाथगोंधळी हे देखील या लोकसंस्कृतीमधील महत्वाचे घटक आहेत. या समाजाने गावोगावी हिंडून पोटाची खळगी भरण्यासाठी का होईना आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. हा समाज देखील आता शिक्षणाचे महत्व ओळखून शिक्षणाकडे वळत आहे. त्यामुळे भविष्यात हा समाज देखील लुप्त होतो का प्रश्न आहे.
नाथगोंधळी किंवा नाथजोगी याना विदर्भात ‘गारपगारी’ म्हणूनही ओळखले जाते. हे समाजबांधव पाड्यात, पालात राहातात. कुठेही भटकंती करावी लागते. पण त्यांनी हि लोककला टिकवून ठेवली आहे. नाथगोंधळी हे हाताच्या बोटाच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून कोड लँग्वेज मध्ये कोणाचाही नामोल्लेख अचूक करतात. आजच्या डिजिटल युगातही हि लोककला जिवंत आहे.
कुटुंबातील वाड वडिलांच्या नावाचा संबळ, टाळ, तुणतुणे आणि वेगवेगळी गाणी, गौळण, यांच्या सुरेल संगमावर तालबद्ध अशा ठेक्यात उद्धार ते करतात. आपण देऊ ती आर्थिक तुटपुंजी, धान्य स्वरूपात मिळालेली मदत ते स्वीकारतात आणि पुढचा प्रवास करतात. हि लोककला जपणारे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील गोशिंग गावचे रहिवाशी असलेले आणि सध्या गजानन महाराज मंदिराजवळ उघड्यावर तात्पुरते राहणारे एकनाथ नाना शेगर.
एकनाथ नाना हे आपल्या कुटुंबातील सहकाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन संबळ वादक दरबार वकील शेगर यांना आपल्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून ‘कोड लँग्वेज’चा चांगला वापर करतात. न बोलता केवळ बोटांच्या इशाऱ्यावरने आपण सांगितलेल्या वाडवडिलाचे नाव ते अचूक ओळखतात. शेगर यांच्यासोबत त्यांचा पुतण्या असतो.
शेगर कुटुंब आपल्या पत्नी मुलांना गावाकडे घरी सोडून इतर जिल्ह्यामध्ये फिरत असतात. कोणत्याही गावालगत असलेल्या मंदिराशेजारी किंवा पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी आठ- पंधरा दिवस ते राहतात. यामधून मिळणाऱ्या मदतीच्या बळावरच त्यांचं कुटुंब चालतं. फिरणे हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेले असते. खरंतर आपले कर्तव्य आहे कि या लोककला जपणाऱ्या समाजाला जमेल तेवढी जास्त मदत करणे. जेणेकरून हा समाज लुप्त न होता आपली लोककलेची संस्कृती तशीच पुढे चालू ठेवेल.
बोटाच्या इशाऱ्यावर असलेली हि भाषा अभ्यासक्रमात यावी यासाठी देखील अनेकदा प्रयत्न झाले आहेत. भाषेच्या समृद्धीसाठी विद्यापीठ स्तरावर अनेक अभ्यासक्रम आहेत. पण हि बोटांच्या इशाऱ्यावरील भाषा न उमजलेले कोडे बनून आहे. या भाषेचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास नाथ गोंधळींना रोजगारही मिळू शकतो. मुळात हि भाषा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गुप्तचर विभागाची सांकेतिक भाषा करपावली नावाने प्रसिद्ध होती.
सध्या कोरोनाने आणि लॉकडाऊनने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. यावेळी आपलेही कर्तव्य आहे कि त्यांना जशी जमेल तशी मदत करावी. जेणेकरुन हा समाज आपले जीवन जगू शकेल. शिवाय शासनाने देखील भटक्या कलाकारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या कलाकारांना स्थिर मानधन मिळण्याबाबत शासनाने विचार करायला हवा.