पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव हे एक छोटंसं खेडेगाव. या गावाचे नाव आज जगाच्या नकाशावर पोहचले आहे ते एका महिलेमुळे. खुटबावच्या कमल शंकर परदेशी या अत्यंत गरीब कुटुंबातील. घरची खूप हलाखीची परिस्थिती होती. अगदी पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करून पोट भराव लागायचं. कमल यांच्या वडिलाला गुंठाभरही जमीन नव्हती. पण आज तीच कमल करोडोंच्या व्यवसायाची मालकीण आहे.
कमलचे वडील हे अत्यंत गरीब. परिस्थितीमुळे अन गावाकडच्या शिकून काय होणार या वृत्तीमुळे कमल याना शिक्षण मिळालं नाही. आई वडिलांना कमल देखील शेतात काम करू लागायची. कमल यांना ३ भाऊ. त्या सर्वात लहान असल्याने आईवडिलांच्या लाडक्या. खूप उशिरा मुलगी झाल्याने खूप लाड होते. पण घरी आई वडिलांनी संस्कार मात्र चांगले दिले. कमलच्या नशिबात गरिबीच होती. अठराव्या वर्षी लग्न झालं. नवरा देखील शेतमजुरी करणाराच मिळाला.
माहेरला कमलला आई वडील भाऊ यांच्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात काम करायची वेळ काही आली नव्हती. पण लग्न झाल्यानंर मात्र पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करण्याची वेळ आली. कमल आणि त्यांच्या पतींनी मिळेल ती कामं करायला सुरुवात केली. विहिरींचे काम केले, रस्ता झाडायची कामं केली. पाईपलाईन खांदल्या. खडी फोडली. कमल यांचं कुटुंब देखील वाढत होतं. त्यांना ३ मुली झाल्या. ५ माणसांचं त्यांचं कुटुंब आता झालं होतं.
२००० मध्ये त्यांनी ८ रुपये रोजाने मजुरी केली. तेवढ्यात ५ जणांचा उदरनिर्वाह होत नसे. त्यांचं कुटुंब कामासाठी भटकंती करायचं. जिथे जागा मिळेल तिथं संसार थाटायचं. कधी कधी तर मशानात देखील दिवस काढले. खुटबावला ते मजुरी करायला आले. पती सालाने राहायचे तर कमल मजुरी करायच्या. २००० साली महिला बचतगटांची सर्वत्र चर्चा सुरू होती. नवीनच प्रकार आला होता. कमल यांनी देखील याबाबत माहिती काढायला सुरुवात केली.
कमल यांच्यासोबत मजुरी करणाऱ्या महिला देखील याविषयी चर्चा करायच्या. त्यांनी माहिती काढायचं ठरवलं आणि कमल घरी न कळू देता बँकेत जाऊन माहिती काढून आल्या. बचत गट काढायचं ठरलं. इतर मजुरी करणाऱ्या महिलांना सोबत घेऊन बचत गट काढला. त्यात एक एक रुपया जमा करायचं ठरलं. त्यासाठी रोज ३ तास जास्त काम करण्याचं ठरलं. अडाणी असल्याने काही माहिती नव्हती. पण बँकेचे कर्मचारी खूप सहकार्य करत. ३ महिने पैसे भरले. अन वाटायला लागलं कि बचत करून काही होणार नाही. काही तरी वेगळं केलं पाहिजे.
बँकेत १३ जणींचे मिळून पाऊणे चार हजार रुपये जमा झाले. काय करायचं यावर चर्चा झाली आणि मसाला बनवायचा हि कल्पना डोक्यात आली. मसाला करायचा खरा पण विकायचा कुठे हा प्रश्न पडला. एका महिलेने सुचवले नाही जरी विकला तरी आपल्या सर्वांची घरी खायला लागतोच तर घरी खाऊ. घरचे बाजाराचे मसाल्याचे पैसे त्यांनी पुन्हा बँकेत टाकायचं ठरवलं आणि सुरुवात केली. त्यांनी यासाठी आधी ३०० रुपये बँकेतून काढले. कामाला लागल्या. पहाटे ४ ला उठून आवरून कामाला लागायच्या. घरी नवऱ्याना मात्र काही पत्ता लागू दिला नाही.
दौंड ला जाऊन त्या मिरची आणि इतर साहित्य घेऊन यायच्या. कुठलेच साधन नव्हते. मसाले करताना त्यांना खूप अडचणी आल्या. पुढे नवऱ्यांचा विरोध असायचा. एका शेळ्यांच्या गोठ्यातून मसाले बनवायला सुरूवात केली. रात्री १२-१ पर्यन्त काम करायच्या. मसाले दुसऱ्या दिवशी विकायच्या. गावात, बाजारात मसाले विकू लागल्या. लोक सुरुवातीला काही चांगले म्हणायचे तर काही नाव ठेवायचे. पुढे विक्री करत राहिल्या. पुण्यात भीमथडी जत्रेत बचत गट निवडला गेला.
पुण्यात ५ किलो मसाला विकला. पुढे मुंबईला प्रदर्शनाला मसाला पाठवला. मुंबईला माल विकला. अनेक अडचणी आल्या. घरच्यांनी पुढे साथ द्यायला सुरुवात केली. अंबिका मसाले हळू हळू प्रसिद्ध व्हायला लागले. लोक विचारत घरी यायला लागली. भांडवल नसल्याने जास्त मसाले तयार करण्यास अडचणी होत्या. हळू हळू त्यांचा प्रवास सुरु होता. पण २००६ मध्ये त्यांना बिग बाजारसाठी निवडलं गेलं. १९ मॉलला अंबिका मसाले सीलेक्ट झाले. बिग बाजारकडून २ लाख ६० हजाराची मोठी ऑर्डर मिळाली. गोठ्यातूनच हि ऑर्डर पूर्ण केली.
बिग बाजारला माल पाठवण्यासाठी त्यांनी बॉक्स पॅकिंग करायला सुरुवात केली. ब्रँड छापून घेतला. अंबिका महिला बचत गट असं नाव झळकायला लागलं. पुढे सर्व परवाने काढून घेतले. नाबार्डचे अधिकारी भेट द्यायला आले. मदतीचा ओघ सुरु झाला. नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी जर्मनच्या चॅन्सलर यांची भेट घालून दिली. चॅन्सलर मार्कल यांनी काय मदत हवी विचारणा केली. कमलताई म्हणाल्या आर्थिक मदत नको आम्हाला जर्मनीत मार्केट द्या. जर्मनीत अंबिका मसाले पोहचले.
पुढे सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून मार्केटिंग वाढवलं. आज १३ च्या २०० महिला झाल्या असून आज त्यांची उलाढाल करोडोत गेली आहे. २०१२-१३ मध्ये त्यांनी नवीन मसाले निर्मितीसाठी भांडगाव येथे अर्धा एकर जागा घेतली. आज त्या जागेत अंबिका मसालेची फॅक्टरी उभी आहे. एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या कमल परदेशी यांची आज ५-६ कोटींची मालमत्ता आहे. ३२ प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन आज त्या करतात.