राजकारण म्हंटलं कि त्यासाठी लागतो पैसा आणि राजकीय वारसा. हे एक देशातील कटू सत्य आहे. कारण भारतात राजकारणात यशस्वी फक्त राजकारण्यांची मुलं आणि पैशावालेच होतात. असे काही मोजकेच उदाहरण बघायला मिळतात जे शून्यातून राजकारणात आले आणि मोठं पद नाव कमावलं. सध्या देशात काही राज्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांनी सध्या जोरदार प्रचार सुरु केला आहे. उमेदवारांच्या घोषणा देखील झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्री अमित शहांपर्यंत सर्व मोठे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत एक नाव सध्या देशभर चर्चेत आलं आहे. ते नाव म्हणजे भाजपच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील आउसग्राम च्या उमेदवार कलिता माझी यांचे. कलिता माझी यांचे नाव देशभर चर्चेत येण्यामागे कारणही तसेच मोठे आहे. कलिता माझी हि महिला आता 2 दिवसांपूर्वी पर्यंत लोकांच्या घरी भांडे घासून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती.
हि भांडे घासून जगणारी महिला आज भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी तिने दीड महिना सुट्टी देखील घेतली आहे. कलिता हि चार घरचे भांडे घासते यातून तिला महिन्याला २५०० रुपये पगार मिळतो. कलिताला राजकारणाची पहिल्यापासून आवड होती. भाजपसोबत ती मागील ५ वर्षांपासून जोडलेली असून राजकारणाशी जवळीक साधून होती.
सध्या दीड महिन्यासाठी आपले काम बंद करून कलिता पूर्ण क्षमतेने प्रचारात उतरली आहे. जर ती या निवडणुकीत विजयी झाली तर बंगालच्या विधानसभेत आमदार म्हणून जाणार आहे. कलिताला आमदार बनून गावात गरिबांसाठी हॉस्पिटल बांधायचं आहे. जेणेकरून रुग्णांना जिल्ह्याला जावं लागणार नाही. अनेक विकासकामं साध्य तिच्या डोक्यात आहेत.
कलिताचा पती हा प्लम्बर आहे. तिला एक मुलगा असून तो आठवीमध्ये शिक्षण घेतो. सासू देखील तिला या निवडणुकीत चांगली साथ देतेय. भाजपने पहिल्यांदा येथे उमेदवार दिला आहे. यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा येथे विजय होत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलिताला देशाच्या राजकारणासाठी एक प्रेरणा असल्याचे म्हंटले आहे.
३२ वर्षीय कलिताची संपत्ती म्हणजे तिची एक छोटीशी झोपडी. पंतप्रधानांपासून प्रेरित होऊन ती राजकारणात आली आहे. कलिताला चांगले शिक्षण देण्यासाठी काम करायचे आहे. शिक्षण चांगलं भेटलं तर तिच्यासारखी कोणावर भांडे घासायची वेळ येणार नाही असे ती म्हणते. कलिताचे वडील हे एक मजूर असून तिला ७ बहिणी आहेत.
कलिता माझीच्या गरिबीचा अंदाज तिच्या संपत्तीवरून येतो. कलिताकडे ६ साड्या, ५००० रुपये आणि एक झोपडी एवढीच संपत्ती आहे. भाजपने कलिता प्रमाणे बांकुरा जिल्ह्यातील सल्तोरा विधानसभा मध्ये ४०० रुपये रोजने मजुरी करणाऱ्या महिलेला तिकीट दिलं आहे. चंदना बाउरी कडे फक्त ६३३५ रुपये बँक बॅलेन्स आहे. तर पतीच्या खात्यात १५६१ रुपये आहेत.