आयुष्यात अनेकदा असे प्रसंग घडतात ज्यामध्ये आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणारा क्षण येतो. आयुष्य हे आपल्याला संधी देत असते. फक्त त्यासाठी आपल्यामध्ये संयम आणि जिद्द असायला हवी. कारण आज अशा एका PSI ला भेटणार आहोत ज्याने आयुष्यात १-२ वेळा नव्हे तर MPSC मध्ये तब्बल १० वेळा अपयश मिळवलं. तरीही त्याने हार न मानता आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि PSI पदाला गवसणी घातली. हा तरुण एकेकाळी बारावी नापास झाला. त्याने शेतीमध्ये गुरं राखण्यापासून सर्व काम केली. पण आपल्या प्रयत्नाच्या बळावर त्याने PSI पद कसं मिळवलं, जाणून घेऊया त्याच्या जीवनप्रवासात..
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुद गावचा सुशांत खराटे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात सुशांतच्या जन्म झाला. शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब. सुशांतचं बालपण त्याच वातावरणात गेलं. त्याचाही शेतीशी जवळून संबंध आला. त्याने शेतीत गुरं राखण्यापासून कोळपणी नांगरणी देखील केली. सुशांतने पहिली ते चौथी पर्यंत जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेतलं. नंतरही त्याने दहावीपर्यंत गावातच शिक्षण घेतलं. दहावीला सुशांतला चांगले मार्क मिळाले. त्यामुळे त्याला पुण्यात मॉडर्न कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश मिळाला.
मराठी मधून सायन्सला गेल्याने त्याला थोडं कठीण झालं. बारावीमध्ये सुशांत नापास झाला. लोक म्हणाले शहरातील पाणी लागलं असेल. पण वडिलांनी विश्वास दाखवला आणि त्याला पुन्हा प्रयत्न कर म्हणून सांगितलं. पुढच्या प्रयत्नात बारावी पास झाला. पुढे इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याने केला. सोबतच त्याने मुक्त विद्यापीठामधून डिग्री देखील मिळवली. घरच्या परिस्थितीमुळे त्याला जॉब देखील करावा लागला. २-३ वर्ष जॉब केल्यावर त्याला राजकारणाचं वेड लागलं. वडिलांच्या विरोधी पार्टीत ती सामील झाला.
पण याच राजकारणामुळे त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. एक किस्सा घडला. एका मंत्र्याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्याचं ठरलं. सुशांत आणि इतरांनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले तेव्हा पोलिसांनी त्यांना खूप फटके दिले. तेव्हा त्यानं संकल्प केला कि आता हे सर्व सोडून काही तरी चांगलं वेगळं करायचं. त्याला नंतर काकांची खूप मदत मिळाली. काका मंगेश खराटे यांच्या मुळे त्याने ठाणे गाठले आणि तिथं युनिक अकॅडमी मध्ये क्लास लावले.
कुठलीही माहिती नसताना त्याने अभ्यासाला सुरुवात केली. त्याने चांगली तयारी केली खरी पण त्याला विविध स्पर्धा परीक्षेत तब्बल १० वेळा अपयश आले. तेव्हा विश्वास दाखवणारं कोण नव्हतं पण काकांनी आधार दिला. सुशांत जेव्हा मी आता प्रयत्न करत नाही म्हणाला तेव्हा वडिलांनी हार मनू नकोस सांगितलं. सुशांतने पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्याला पूर्व परीक्षेत यश आलं. नंतर मुख्य परीक्षा देखील तो पास झाला. मुलाखत दिली ग्राउंड झालं पण त्याचं सिलेक्शन काही झालं नाही. त्याला पुन्हा वाटलं अभ्यास बंद करावा.
त्याने पुन्हा आपल्या चुका सुधारून सुरुवात केली. आत्मविश्वास कमी झाला होता. सोबतच्या मित्रांना चांगल्या नोकऱ्या लागल्या होत्या. लोक माझ्या मुलांना नोकरी लागली तुझा मुलगा काय करतो म्हणून वडिलांना टोमणे मारायला लागली. ते प्रसंग सुशांतच्या मनाला खूप लागले. दुष्काळी भागातून असल्याने त्यांची परिस्थिती देखील साधारण होती.
त्याने सर्व गोष्टींचा विचार करून स्वतःला प्रेरित ठेवले. अखेर पुन्हा एकदा सर्व परीक्षांत यश मिळवलं आणि ग्राउंड मुलाखत दिली. मार्च २०१९मध्ये निकाल आला आणि मित्रांचे फोन चालू झाले सुशांत तू PSI झाला म्हणून. आईच्या डोळ्यात हे ऐकून पाणी होतं. सर्वत्र कौतुक होत होते. गावातील प्रत्येक चौकात त्या दिवशी बॅनर लागले. अख्या गावाने त्याच्या यशाचे अभिनंदन केले. जे लोक नाव ठेवायचे त्यांना सर्वाना सुशांतने आपल्या निकालातून चपराक दिली होती. तुमच्या यशामुळे आई वडिलांच्या डोळ्यात येणारे अश्रू आणि गावाचा वाढणारा गौरव यापेक्षा कोणतीही श्रीमंती मोठी नसल्याचे सुशांत सांगतो.