देशात सध्या पोलीस आणि राजकारणी यांचे संबंध चांगलेच चर्चेत आले आहेत. याला कारणीभूत ठरले आहेत मुंबईतील पोलीस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग. सचिन वाझे यांचे शिवसेनेशी असलेले संबंध आणि त्यांचा गुन्ह्यात असलेला सहभाग चर्चेत आला. तर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप.
सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. ते शिवसेनेत सक्रिय झाले होते. पण २०२० साली ते पुन्हा पोलीस दाखल झाले. पोलीस अधिकारी असलेल्या वाझेना राजकारणात म्हणावं तस यश मिळालं नाही. पण यापूर्वी अशा अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मोठं यश मिळवलं आहे. पोलिसांची नोकरी सोडून राजकारणात यश मिळवळलेले आज अनेक उदाहरण आपण बघू शकतो.
यामध्ये किरण बेदी, बिहारचे गुप्तेश्वर पांडे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग असे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. पण आज एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेऊया जो व्यक्ती पोलिसांची नोकरी सोडून राजकारणात आला आणि त्याने राजकारणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री या पदापर्यंत मजल मारली.
महाराष्ट्राच्या राजकारणात या व्यक्तीने मोठं यश मिळवलं. हि व्यक्ती आहेत देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. एक पोलीस अधिकारी ते देशाचा गृहमंत्री हा सुशीलकुमार शिंदेंचा प्रवास थक्क करणारा आहे.
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी महाराष्ट्राच्या सोलापूर मध्ये झाला. सुशीलकुमारांचे बालपण खडतर होते. वडिलांचे लवकर निधन झाले. त्यामुळे घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर शिंदेंना सोलापूरच्या न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी मिळाली. सोबतच ते शाळा देखील शिकत होते. १० वर्ष नोकरीनंतर क्लार्क म्हणून बढती मिळाली. १९६५ मध्ये बीए ची डिग्री मिळाल्यांनतर नोकरीचा राजीनामा दिला.
कायद्याच्या अभ्यासासाठी शिंदेनी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थी चळवळीशी जोडले गेले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून जाहिरात निघालेली पाहिली. तयारी केली आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून नोकरीही मिळाली. मुंबईच्या सीआयडी विभागात नोकरी मिळाली. नोकरी करतानाच त्यांनी वकिलीचे शिक्षण देखील पूर्ण केले.
शिंदेंचा राजकारणाचा अभ्यास खूप चांगला होता. त्यांना पोस्टिंग गुप्त वार्ताहर शाखेत मिळालं होतं. त्यांचा राजकारणाचा अभ्यास जाणून वरिष्ठानी गुप्त वार्ताहर शाखेत त्यांना पोलिटिकल बिट दिला होता. राजकीय सभा आणि राजकारणाशी निगडित ज्या मिटिंग होत त्यावर नजर ठेवणे हे त्यांचं काम होतं. त्यामुळे रोजच राजकारण्यांशी संबंध येत होता. अनेकांशी यातून चांगल्या ओळखी झाल्या आणि मैत्रीही झाली.
याच काळात त्यावेळी चर्चेत असलेले तरुण राजकारणी शरद पवार आणि बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. पवारांचा राजकीय प्रवास नुकताच सुरु झाला होता. या तिघांची चांगली मैत्री झाली होती. इंदिरा गांधी या त्यावेळी देशाच्या राजकारणात जम बसवू पाहत होत्या. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्यांना संधी दिली जावी असा त्यावेळी सूर निघाला.
शरद पवार आणि बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या डोक्यात त्यावेळी विचार आला कि सुशीलकुमार शिंदेंना आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विचारावं. त्यांना बोलवून घेऊन लोकसभेची ऑफर दिली. नोकरी सोडल्यास सोलापूर लोकसभेचे तिकीट देऊ असा तो प्रस्ताव होता. शिंदेंसाठी हे धक्कादायक होतं. संघर्षातून मिळवलेली नोकरी सोडण्याची त्यांची मानसिकता नव्हती. पवारांना त्यांनी नकार देखील दिला होता. सध्या इच्छा नाही पुढे विचार करू असे त्यांनी सांगितले.
पुढे लोकसभेच्या निवडणूका झाल्यावर विधानसभा आली. शिंदेंच्या डोक्यात राजकारणाचे विचार घुमत होते. एका मित्राशी त्यांनी याविषयी चर्चा केली. मित्राने देखील लढ़ण्याचा सल्ला दिला. शिंदेनी देखील नोकरीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचे सदस्य झाले. शरद पवारांनी त्यांना करमाळा मधून उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावला. महाराष्ट्र कमिटीने तिकीट द्यायचं ठरवलं पण दिल्लीत तिकीट कापलं गेलं. दुसरा उमेदवार देण्यात आला.
शिंदेनी नोकरी देखील सोडली आणि तिकीटही गेलं. पण त्यांनी हार मानली नाही. ते त्या उमेदवारांच्या प्रचारात ताकतीने उतरले आणि ते उमेदवार निवडूनही आले. शिंदेनी सोबत मुंबईत वकिली देखील केली. २ वर्षांनी करमाळाचे ते आमदार तायप्पा सोनवणे यांचं अचानक निधन झालं. जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा शिंदेंचे नाव आघाडीवर आले. तिकीट मिळालं आणि पहिल्यांदा १९७४ मध्ये ते आमदार बनले.
पुढे ते अनेक वर्ष आमदार म्हणून निवडून गेले. अनेक मंत्रिपद भूषवले. २००३ साली महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. आंध्रचे राज्यपाल देखील ते होते. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी देशाचे गृहमंत्रीपद भूषवले. पोलीस उपनिरीक्षक ते केंद्रीय गृहमंत्री हा त्यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.