Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / फडणवीसांच्या काळात निलंबित झाले होते हेमंत नगराळे! कोण आहेत हेमंत नगराळे?

फडणवीसांच्या काळात निलंबित झाले होते हेमंत नगराळे! कोण आहेत हेमंत नगराळे?

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलात नाट्यमय घडामोडी घडल्या. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे हे मराठमोळे अधिकारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त बनले. पोलीस आयुक्त बनलेले हेमंत नगराळे हे नाव पोलीस दलात खूप मोठं आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल केसच्या तपासात मोलाचा वाटा उचलला आहे.

१९९८ ते २००२ या काळात सीबीआयसाठी मुंबई व दिल्लीत काम केलेल्या हेमंत नगराळे यांचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला राहिला आहे. जाणून घेऊया कोण आहेत हेमंत नगराळे..

हेमंत नगराळे हे नाव पोलीस सेवेत खूप मोठं आहे. मूळचे चंद्रपूरचे असलेले हेमंत नगराळे १९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी. हेमंत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे ते नागपूरला गेले. तिथे पटवर्धन हायस्कुलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. हेमंत यांनी मेकॅनीकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे. शिवाय त्यांनी फायनान्स मॅनेजमेंट या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

हेमंत नगराळे हे सध्या पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. हेमंत नगराळे हे शिक्षण झाल्यानंतर कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी करत होते. तिथे त्यांची ओळख तत्कालीन पोलीस अधिकारी पुरुषोत्तम चौधरी यांच्याशी झाली. त्यांनी नगराळे यांना पोलीस दलात अधिकारी पदासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला.

हेमंत यांनीही तो सल्ला मनावर घेतला आणि यूपीएससीची तयारी सुरु केली. १९८७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात हेमंत यांना यश मिळाले आणि ते IPS बनले. पहिली पोस्टिंग देखील त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राजुरा या भागात मिळाली. हेमंत यांनी १९९२-१९९४ काळात सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून देखील काम केले आहे.

पुढे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली. राज्यव्यापी MPSC पेपरफुटी प्रकरणाची चौकशी त्यांनी केली होती. हेमंत यांनी बँक ऑफ इंडियामधील गाजलेल्या दरोड्याचा २ दिवसात शोध लावला होता. तसेच कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनीच केली होती. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत त्यांनी बारकाईनं केलेल्या तपासाचं कौतुक झालं होतं.

हेमंत नगराळे यांनी ज्युडोमधे ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे. ‘सीबीआय’च्या सेवेत असताना हेमंत नगराळे यांनी बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा आणि नुकताच SCAM 1992 या वेब सिरीजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला हर्षद मेहता घोटाळा अशा बड्या प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हेमंत नगराळे यांचं निलंबन झालं होतं. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना २०१८ मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता.

एफआयआर मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. विधान परिषदेच्या सभापतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याचा नियम आहे. हा नियम मोडल्याबद्दल नगराळे यांच्यासह पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानं गौरवण्यात आलं आहे.

About Mamun

Check Also

दहावीला ४४ टक्के मार्क पडले म्हणून रडत न बसता तो आज कलेक्टर बनलाय!

आपल्या देशात शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या मार्कांना जरा जास्तच महत्व दिले जाते. दहावी आणि बारवीमध्ये चांगले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *