जगात कधी ना कधी, कुठे ना कुठे, कुणा ना कुणावर अपमानाचा प्रसंग हा येतच असतो. अशा प्रसंगी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच लागते आणि परत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्या अपमानाचा बदला घेण्याची संधीही मिळत असते. असाच प्रकार रतन टाटा यांच्याबाबत झाला होता. फोर्ड कंपनीकडून त्यांना अपमानजनक वागणूक मिळाली होती. त्याचा बदला रतन टाटांनी असा घेतला की फोर्ड कंपनीच्या मालकानेही लक्षात ठेवला असेल.
आपल्या नखांनी मित्रांची घड्याळं दुरुस्त करणाऱ्या पोराने फोर्ड कंपनी स्थापन केली होती
हेन्री फोर्ड नावाच्या पोराला त्याचा बाप शेतकरी बनवायला निघाला होता, पण या पोराला यंत्रांशी खेळण्याचा फार नाद होता. इतका की आपल्या नखांनीच मित्रांची बंद पडलेली घड्याळं रिपेयर करुन ते चालू करायचं. पुढे विजेच्या दिव्याचा शोध लावणाऱ्या थॉमस एडिसनच्या कंपनीत १८९१ साली त्याला इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. तिथेही हे गप्प बसलं नाही. १८९६ मध्ये त्याने आपली चारचाकी गाडी तयार केली. एडिसनलाही त्याचं कौतुक वाटलं. पुढे १९०३ साली त्या पोराने आपल्याच नावाने “फोर्ड” मोटार कंपनीची स्थापना केली. आज त्याची कंपनी जगातील चौथी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे.
टाटा म्हणजे गुणवत्ताच ही ओळख निर्माण करणारे रतन टाटा
रतन टाटांच्या आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष वाट्याला आला. ते लहान असतानाच त्यांचे आईवडील विभक्त झाले. त्यांना आजीने सांभाळले. पुढे अमेरिकेत शिक्षण घेत असताना दहा वर्षे त्यांनी हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून कारकुनी पर्यंतची कामं केली. १९६२ मध्ये टाटा समूहात दाखल झाल्यानंतर जमशेदपूरला स्टील कंपनीत कोळसा उचलण्यापासून भट्टीपाशी असणारी कामं त्यांनी केली.
त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली नेल्को कंपनी आणीबाणीत बंद पडली. १९७७ मध्ये त्यांच्याकडे असणारी इम्प्रेस मिलही बंद पडली. पण खचून न जाता त्यांनी गुणवत्तेला महत्व देऊन आपले काम चालू ठेवले. १९८१ पासून त्यांनी टाटा कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. गुणवत्ता म्हणजे टाटा या निष्टेने काम केले. त्या बळावर जगातील अनेक कंपन्या टाटांनी विकत घेतल्या.
फोर्डने केलेल्या अपमानाचा रतन टाटांनी असा बदला घेतला
१९९८ साली टाटा मोटर्सची इंडिका कार लाँच झाली. पण या प्रोजेक्टमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचे नुकसान झाले. या प्रोजेक्टमधील शेअर भागीदारांनी इंडिका प्रोजेक्ट विकण्यासाठी तगादा लावला. रतन टाटांनी होकार दिला आणि आपल्या भागीदारांसोबत ते फोर्ड कंपनीसोबत व्यवहार करण्यासाठी अमेरिकेला गेले. तीन तास मिटिंग चालली. त्या बैठकीत फोर्डचा चेअरमन रतन टाटांशी उद्धटपणे वागला. तुम्हाला व्यवसाय करायची अक्कल नाही तर इतके पैसे का लावले म्हणून हेटाळणी केली.
आमचे उपकार माना आम्ही हा प्रोजेक्ट खरेदी करतोय म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. रतन टाटा यामुळे दुखावले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा इंडिका प्रोजेक्टवर लक्ष देऊन काम केले. दिवसरात्र मेहनत केली. २००८ साली अशी वेळ आली की टाटांच्या इंडिकाने कित्येक पट नफा मिळवून दिला, तर दुसऱ्या बाजूला फोर्ड कंपनीच्या जग्वार आणि लँडरोव्हरचे दिवाळे निघाले. आता टाटांची वेळ होती. फोर्डच्या जग्वार आणि लँडरोव्हर टाटांनी विकत घेतल्या. त्यावेळी फोर्डच्या चेअरमनचे वाक्य होते, हे प्रोजेक्ट विकत घेऊन तुम्ही आमच्या फोर्ड कंपनीवर उपकार करत आहात…