आज अशा एका तरुणाचा जीवनप्रवास बघूया जो खूपच संघर्षमय आहे. कारण त्याचे वडील हे शेतमजूरी करून बांगड्या विकण्याचे देखील काम करायचे तर आई देखील वडिलांप्रमाणे बांगड्या भरायचं काम करायची. अत्यंत हलाखीचं जीवन, समोर अनेक समस्या होत्या. पण आपल्या कष्ट करणाऱ्या आईवडिलांना समाजात मानसन्मान मिळवून देण्याचे त्याने स्वप्न बघितले. त्यानेही मजुरी करून वडिलांना बांगड्या विकायला सोबत जाऊन मदत केली. अन आपल्या स्वप्नाकडे हळूहळू तो वाटचाल करत राहिला. आज हाच मजुराचा बांगड्या भरणाऱ्या कासाराचा मुलगा उपजिल्हाधिकारी आहे. बघूया त्याच्या संघर्षमय जीवनप्रवास..
जनार्धन अंबादास कासार. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द या गावचा एका सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा. जनार्धनने गावातच जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतलं. दहावीला ७२ टक्के घेऊन २००५ मध्ये जनार्धन पास झाला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्याने हे ओळखून सायन्सला न जाता आर्टला जाण्याचं ठरवलं. तो बारावीला आर्टमध्ये ८१.१७ टक्के मार्क घेऊन पहिला आला. जनार्धनने १२ वि नंतर डीएड करायचं ठरवलं होतं. त्याने डीएडला प्रवेश घेतला. २०१० मध्ये डीएड झाल्यानंतर सरकारी नोकरी भेटेल या आशेने त्याने शिक्षक भरतीची सीईटी दिली. पण त्याला अतिआत्मविश्वास होता ज्यामुळे त्याला सीईटीमध्ये ३ मार्क कमी पडले आणि शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही.
तो आयुष्यात पहिल्यांदाच नापास झाला होता. शिक्षक होऊन घरची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न बघणाऱ्या जनार्धनला खूप मोठा धक्का बसला. ३ दिवस त्याला जेवण गेलं नाही. वडिलांनी त्याला समजावून सांगितलं. जनार्धनचे वडील हे गावोगावी फिरून बांगड्या भरायचे काम करायचे. जनार्धन देखील वडिलांना बांगड्या भरण्यास मदत करायचा. याशिवाय वडील हे विहिरीचे काम देखील घ्यायचे. जनार्धन देखील वडिलांना विहिरीवर मजुरी करण्यास मदत करायचा. अंबादास कासार याना शेती देखील नव्हती. त्यामुळे वडिलांप्रमाणे जनार्धन देखील सुट्टीच्या दिवशी मजुरी करण्यासाठी जायचा.
वडिलांना जनार्धनची क्षमता त्यामुळे माहिती होती. खचलेल्या जनार्धनला वडिलांनी सांगितलं कि तू सरकारी नोकरी साठी जन्माला आलेला नाहीये. तू काहीही काम करून पोट भरू शकतो. खचलेला जनार्धन पुन्हा सावरला. पहिली शिकलेल्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं होतं. त्याने देखील आता पुन्हा स्पर्धा परीक्षेची पेटून तयारी करण्याचं ठरवलं. स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करून सर्व परीक्षा द्यायचं त्याने ठरवलं. जो पर्यंत एखादी पोस्ट मिळत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही असं त्याने ठरवलं.
तो नाशिकला राहायला गेला. तिथं पार्ट टाइम जॉब करून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. ४-५ महिन्यातच त्याला पोस्टल असिस्टंटच्या परीक्षेत यश मिळालं आणि नोकरी मिळाली. तो घरी त्यानंतरच आला. २०११ मध्ये त्याला हि नोकरी मिळाल्यानंतर तो निवांत आयुष्य जगू लागला. पुढे स्पर्धा परीक्षांतून मोठे पद मिळवायचं त्याच्या डोक्यात नव्हतं. पण मित्रांकडे बघून त्याने MPSC देण्याचं ठरवलं. पण तेव्हा ग्रॅज्युएशनदेखील त्याने केलेलं नव्हतं. जनार्धनने सडे पाच वर्ष पोस्टल असिस्टंट म्हणून जॉब केलेला आहे.
त्याने नंतर बीएला प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षाला असताना अभ्यासाला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन चालू असतानाच जनार्धनने STI पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेत यश मिळवलं. मुख्य परीक्षेसाठी ग्रॅज्युएशन देखील तो पास झाला. नंतर मुख्य परीक्षा दिली आणि तो त्यातही पास होऊन STI झाला. २०१६ मध्ये तो मुंबईत STI म्हणून जॉईन झाला. पण त्याच्या मनात असलेलं नायब तहसीलदार तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या पदांचं आकर्षण त्याला पुढे घेऊन गेलं. त्याने विचार केला पहिल्याच प्रयत्नात STI झालोय तर पुढे तयारी का करू नये.
२०१६ ची पूर्व परीक्षा तो नापास झाला. पण अभ्यास सुरु होता. तो पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करायचा. पूर्ण वेळ अभ्यासाला मिळायचा नाही. २०१७ मध्ये तो पूर्व परीक्षा पास झाला. ४२७ मार्क घेऊन मुख्य परीक्षा देखील पास झाला. पण मुलाखतीत कमी मार्क मिळाले आणि १० मार्कांनी क्लास १ ची पोस्ट हुकली. त्याला नायब तहसीलदार हे पद मिळालं. पुन्हा पुढे आत्मविश्वास वाढला होता. झालेल्या चुका दुरुस्त केल्या. चांगली तयारी करून २०१८ मध्ये महाराष्ट्रात सहावा येत उपजिल्हाधीकारी पदाला जनार्धनने गवसणी घातली.
जनार्धनच्या या यशात एक महत्वाची गोष्ट आपण सर्वाना सांगणार आहोत. ती म्हणजे जनार्धनचं २०१२ सालीच लग्न झालं होतं. त्यानंतर त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून मोठे पद मिळवले आहे. शिवाय त्याने जॉब करत परीक्षांची तयारी केली आहे. यातून हेच शिकायला मिळतं कि आपण कारणं शोधली नाहीत तर कोणत्याही परिस्थितीत अभ्यास करून यश मिळतं. जनार्धनला पत्नीने अभ्यासात खूप साथ दिली. तो जॉबला असल्याने ती देखील त्याला पॉईंट काढून द्यायची.
एवढंच नाही तर जनार्धनने २०११ पासून परिस्थिती सुधारून देखील आजपर्यंत टीव्ही घेतला नव्हता. याला कारण होतं वेळ वाया नको जायला. जनार्धनला टीव्ही बघण्याची खूप आवड होती. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण राहणार नाही आणि टीव्ही पाहण्यात जास्त वेळ जाईल म्हणून त्याने टीव्हीच घेतला नाही. बांगड्या भरणारा, विहिरीवर मजुरी केलेला, किराणा दुकानावर काम केलेला, ऑफिस बॉय म्हणून जॉब केलेला जनार्धन आज उपजिल्हाधिकारी बनलाय त्याच्या जिद्दीमुळेच. त्याच्या या संघर्षाला सलाम.