घरात अठरा विश्व दारिद्र्य, वडील दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेले, आई काबाड कष्ट करून मुलांचा सांभाळ करत होती. गरिबीसोबत त्याच्या बालपणी पोलिओ देखील झाला. अशा कठीण परिस्थितीत त्याने आपल्या हिंमतीवर आणि मेहनतीच्या बळावर कलेक्टर पदाला गवसणी घातली. त्या बांगड्या विकणाऱ्या आईच्या मुलाचं नाव आहे रमेश घोलप.
रमेश घोलप यांनी आपल्या परिस्थितीशी लढत प्रयत्नांची पराकाष्ठा करत, आपल्या अपंगत्वावर मात करत यशाची पायरी चढली आहे. बांगडी विक्रेता आईला आरोळी देऊन मदत करणारा मुलगा ते कलेक्टर असा प्रवास करणारे रमेश घोलप यांचा जीवनप्रवास..
रमेश घोलप यांचा जन्म बार्शी तालुक्यातील महागाव या छोट्याशा प्रकल्पग्रस्त गावात झाला. रमेश यांची आई हि शेतमजूर होती. नंतर तिने काही काळाने बांगड्या विकायला सुरुवात केली. रमेशही आईला बांगड्या विकण्यास मदत करत असे. वडिलांचं सायकलचं दुकान होतं. पण ते व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे दुकानही बंद करावं लागलं.
रमेश यांना बालपणापासूनच संघर्ष करावा लागला. ते दीड वर्षाचे असतील तेव्हाच त्यांना पोलिओ झाला. त्यामुळे डाव्या पायाला अपंगत्व आलं. आई अगदी ६०-७० रुपये रोजाने जाऊन दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करायची. रमेशचं शिक्षण हे सरकारी शाळेतच झालं. गावातल्या जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं.
चौथीपर्यंत गावात शिक्षण झाल्यावर ५-१० पर्यंत शिक्षण घेण्यासाठी शाळा ४ किमी लांब होती. पण त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांना जमणार नाही हे घरच्यांना वाटत होते. शाळेत जायला त्रास होईल यामुळे आईने त्यांना माढा तालुक्यातील अरण या गावात मामाकडे पाठवलं. रमेश दहावीला ८४ टक्के मार्क घेऊन पास झाले. हिंदीमध्ये तर बोर्डात पहिले आले.मामाकडे देखील पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती. ज्या नातेवाईकांकडे सोय होती त्यांनी नकार दिला.
मग तालुक्याला ठेवायचं ठरलं. त्यावेळी वडिलांचं आरोग्य दारूमुळे खूप खालावलं होतं. आई बांगड्या भरून, शेतात काम करून एकटीच कमवत होती. आईने त्याच पैशात वडिलांचा दवाखाना आणि रमेश यांचं शिक्षण सुरु ठेवलं. प्रचंड ओढाताण त्यावेळी सुरु होती. १२ वी मध्ये असताना फायनल परीक्षा २२ फेब्रुवारीला होती. परीक्षेआधी ११ जानेवारीला वडिलांचं निधन झालं. गाव तालुक्यापासून १२-१३ किमी होतं. त्यावेळी मोबाईल नव्हता.
त्यांनी भाडे जास्त असल्याने रूम बदलली होती. वडील पहाटे वारले. काकांचा मुलगा रूमवर सांगायला आला पण रूम बदललेली होती. रमेश सापडला नाही. अखेर मित्राकडून सकाळी ९ वाजता त्याला वडील गेल्याचा निरोप भेटला. बार्शीत राहणाऱ्या चुलत्याकडे सायकलवर गेले. त्यांना वन फोर तिकीट होतं. त्यामुळे गावी जायला २ रुपये लागायचे. पण चुलते आधीच निघून गेले होते. त्यांच्याकडे गावी जायला अक्षरशः २ रुपये देखील नव्हते. शेजारच्या एका मुलाकडून पैसे घेऊन ते गावी गेले.
याच परिस्थितीला रमेश यांनी त्यांची प्रेरणा बनवलं. आयुष्यात स्वप्न पूर्ण करायची असेल तर तुमच्याकडे प्रेरणा लागते. मग परिस्थिती काहीही असुद्या तुम्ही यश मिळवू शकता. १२ विला रमेश ८८.५० टक्के मार्क घेऊन पास झाले. पण परिस्थितीमुळे बारावीत फिजिक्स मध्ये ९९ मार्क घेणाऱ्या रमेशला डीएड करावं लागलं. लवकर सरकारी नोकरी मिळेल हा त्यामागचा उद्देश.
डीएडला असताना राजकीय संघटनांमध्ये काम केलं, वक्तृत्व स्पर्धा केल्या, लग्नामध्ये भिंतीवर चित्र काढण्यापासून पोस्टरची काम असो किंवा मग थर्माकोलने नाव बनवण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी आयुष्यात लोकांसाठी काही करण्याची मनात सारखं इच्छा होत होती. ५-६ महिने शिक्षकाची नोकरी केल्यानंतर रजा काढून ते तहसीलदार होण्यासाठी पुण्यात आले. पुण्यात येण्यासाठी शेजाऱ्याच्या गायी दाखवून कर्ज काढलं. पण मित्रांनी कलेक्टर होण्याचा सल्ला दिला.
त्यांनी खूप मेहनत घेऊन पहिली परीक्षा दिली. पण अपयश आलं. ज्या परीक्षेत सर्वात जास्त अभ्यास केला ती परीक्षा ते फेल झाले होते. हा टर्निंग पॉईंट ठरला. पैसे नसल्याने पुणे सोडावं लागलं. मामाच्या मुलाकडे सोलापूरला गेले. पुन्हा राजकारणात जायचं ठरवलं. गावात ग्रामपंचायला पॅनल टाकलं आईला उभा केलं. पण सातही उमेदवार पडले.
पुण्यापाठोपाठ गावात देखील अपयश आलं. त्यांनी गावात आता कलेक्टर होऊन गावात येईल असं सांगून गाव सोडलं आणि ते कलेक्टर झाल्यावरच गावात परतले. ज्या गावातील लोक कलेक्टर कसा दिसतो हे बघायला गर्दी करायचे त्या गावातील रमेश घोलप IAS झाला.