मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते. अनेक अजरामर चित्रपट कलाकृतींची निर्मिती इथे झाली आहे. याच नगरीत एक महान व्यक्तिमत्व होऊन गेले, ज्यांना कोल्हापूर कलानगरीचे कलामहर्षी म्हणून ओळखले जाते, ती व्यक्ती म्हणजे बाबुराव पेंटर ! चित्रपट कलेचे कोणतेही रीतसर शिक्षण घेतले नसतानाही त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी दिलेले योगदान अमूल्य असे आहे. ३ जून हा बाबुरावांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न…
दादासाहेब फाळकेंचा टोमणा आणि बाबुरावांची जिद्द
बाबुराव पेंटर हे सुरुवातीच्या काळात आपले आतेभाऊ आनंदराव यांच्यासोबत कोल्हापुरात गंधर्व नाटक कंपनीच्या पडदे रंगवण्याचा काम करायचे. १९१३ साली प्रदर्शित झालेला दादासाहेब फाळकेंचा राजा हरिश्चंद्र हा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला आणि बाबुरावांची चित्रपटनिर्मितीची महत्वाकांक्षा जागी झाली. लागलीच त्यांनी आनंदरावांना दादासाहेब फाळकेंची भेट घ्यायला पाठवले.
आनंदरावांनी मूकपटासाठी वापरलेला कॅमेरा दाखवण्याची विनंती केली. त्यावेळी दादासाहेबांनी “फक्त कॅमेरा दाखवून तुम्हाला काय कळणार ?” असा टोमणा मारला आणि कॅमेरा दाखवण्यास नकार दिला. ही गोष्ट बाबुरावांना समजताच त्यांनी महत्प्रयास करुन स्वतःच कॅमेरा तयार केला. याच स्वदेशी कॅमेराच्या साहाय्याने टिळकांनी आपल्या स्वदेशी चळवळीचे भरवलेल्या एका काँग्रेसच्या अधिवेशनाचे चित्रीकरण करण्यात आले होते.
बाबुरावांच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी भारतात सेन्सॉरशिप सुरु केली
बाबुरावांनी सैरंध्री या पहिला भारतीय बनावटीचा चित्रपट तयार केला. मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील किचकवधाचा प्रसंग खूप वादग्रस्त ठरला. चित्रपटात भीम किचकाचे शीर धडावेगळे करतानाचा प्रसंग इतका जिवंत वाटायचा की लोक तो प्रसंग पाहून घाबरून किंचाळत बाहेर पळायचे.
एवढेच काय तत्कालीन मुंबईच्या गव्हर्नरला या चित्रपटाबाबत समजले तेव्हा त्याने या चित्रपटात माणूस मारला म्हणून बाबुरावांना नोटीस पाठवली होती. गव्हर्नरची खात्री पटावी म्हणून बाबुरावांना अक्षरशः तो चित्रपट गव्हर्नरला दाखवावा लागला होता. पुढे चित्रपटातून तो प्रसंग वगळायला लागला. या प्रसंगानंतर इंग्रजांनी भारतात चित्रपटांवर सेन्सॉरशिप लागू केली.
बाबुराव पेंटर यांचे चित्रपट इतके गाजले की ब्रिटिशांनी त्यावर टॅक्स लावून पैसे कमवले
१९२३ साली बाबुरावांनी सिंहगड हा ऐतिहासिक विषयावरील देशातील पहिला चित्रपट बनवला. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लॅंप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय.
पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण ब्रिटिश सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले. या चित्रपटापासूनच ब्रिटिशांनी करमणूक कर बसवून पैसे कमवायला सुरुवात केली.