राज्यात असे अनेक नेते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला अगदी शून्यातून सुरुवात केली. सध्या देखील राज्याच्या राजकारणात असे काही नेते कार्यरत आहेत ज्यांचा प्रवास शून्यातून निर्माण झाला. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राज्याच्या राजकारणात मोठं नाव कमावलं आणि मोठ्या पदांवर गेले. असेच राज्याच्या राजकारणातील एक मोठे नाव दिवंगत विलासराव देशमुख. लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव हे खेडेगावातून सरपंचपसापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री पदापर्यंत पोहचला. विलासरावांचा व्यक्तिमत्व उमदं होतं. त्यांचा स्वभाव जेवढा शांत अन संयमी होता तेवढेच ते धूर्त आणि मुरब्बी होते. आक्रमक वृत्तीसोबत राजकीय परिपक्वता होती. त्यांना राज्याच्या प्रश्नाची जाण देखील खूप होती.
नेहमीच लोकप्रियतेचे वलय ज्यांच्या बाजूला राहिले असे राजकारणातील राजहंस म्हणून परिचित राहिलेले विलासराव देशमुख यांचा जीवनप्रवास देखील तेवढाच चढउताराचा आहे. जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास..
मराठवाडा हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी भाग. याच मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव या छोटाशा खेडेगावात दगडोजीराव देशमुख यांच्यापोटी २६ मे १९४५ रोजी विलासरावांचा जन्म झाला. विलासरावांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच आणि पुढे लातूर आणि पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी बीएस्सीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याची देखील पदवी घेतली. कॉलेजला असताना त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकनेता होऊन गेलेला एक तरुण भेटला. तो तरुण म्हणजे गोपीनाथ मुंडे. दोघे कॉलेज जीवनापासून खूप जिवलग मित्र होते.
विलासरावांनी शिक्षण घेतलं पण सामाजिक कार्याची आवड होती. कमी वयातच ते राजकारणाकडे वळले. ३ विषयात पदवी घेतली. १९७४ मध्ये २९ व्या वर्षीच ते गावच्या राजकारणात उतरले आणि बाभुळगावचे सरपंच झाले. तिथून सुरु झालेली राजकीय कारकीर्द एवढी बहरेल हे कोणाला वाटले नसेल. कारण त्यांनी ३५ वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला. विलासराव सरपंच झाल्यानंतर ते युवक काँग्रेसशी जोडले गेले. पुढे ते युवक काँग्रेसचे नेते झाले. त्याकाळी एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक ते झाले.
कार्यकर्त्यांचं जाळं तयार होत होतं. त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली अन निवडणूही आले. त्यावेळी त्यांना पंचायत समितीचे उपसभापतिपद देखील मिळाले. पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवली अन त्यातही विजयी होत जिल्हा परिषद सदस्य झाले. आता नंबर होता आमदारकीचा. त्यांचा जनसंपर्क चांगला वाढला होता. १९८० साली पहिल्यांदा ते विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले. अन विजयी होत विलासराव पहिल्यांदा आमदार झाले. त्यांचा करिष्मा एवढा कि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. १९८२ मध्ये बाळासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात विलासराव राज्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलंच नाही.
१९९५ पर्यंत राज्यात काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव मात्र सलग मंत्रिमंडळात राहिले. कधी त्यांना शिक्षण खातं मिळालं तर कधी कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल सारखे महत्वाचे खाते मिळाले. ९५ ला राज्यात युतीचे सरकार आले. तर विलासरावांचा देखील आमदारकीला पराभव झाला. शिवाजीराव कव्हेकर यांनी त्यांना पराभवच धक्का दिला. त्यांना हा खूप मोठा हादरा बसला होता. १९९७-९८ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या बाहेर पडत शिवसेनेच्या मदतीने विधानसभेवर येण्याचा प्रयत्न देखील केला. पण तो प्रयत्नही फसला. तेव्हा त्यांना राजकीय वनवास देखील भोगावा लागला होता.
विलासराव पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९९९ मध्ये पुन्हा ते आमदार म्हणून विजयी झाले. यावेळी ते ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून आले. त्यावेळी राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आले. मुख्यमंत्रीपदाची माळ विलासरावांच्या गळ्यात पडली. १३ ऑक्टोबर १९९९ ला विलासराव देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुढे २००४ मध्ये देखील त्यांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद आलं.
विलासरावांची महाराष्ट्रात लोकप्रियता प्रचंड होती. अगदी सामान्य माणसाने कॉल केला तरी स्वतः फोन उचलणारे ते मुख्यमंत्री होते. २६/११ घडल्यानंतर ताज हॉटेलची पाहणी करायला गेले तेव्हा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना सोबत नेल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांच्यावर खूप टीका झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी ते राज्यसभेवर गेले आणि केंद्रात मंत्री बनले. २ वर्ष ते केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. पुढे ते पुन्हा राज्यात परतले. २०१२ मध्ये १४ ऑगस्ट रोजी त्यांचे यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले.