लग्न झाल्यानंतर मुलींना सासरला गेल्यावर संसारात स्वतःला वाहून घ्यावं लागतं. तिच्या इच्छा, स्वप्न सर्व बाजूला ठेवून तिला सासरच्या मंडळींच्या मनावर जगावं लागतं. पण याला काही अपवाद असतात. असाच एक अपवाद ठरले आहेत साताऱ्याचे जयदीप पिसाळ. जयदीप पिसाळ यांची गोष्ट वाचून तुम्हीही त्यांना सॅल्यूट ठोकाल.
जयदीप पिसाळ हे लहानपणीपासूनच कष्टाळू होते. त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं. जयदीपणे वाठार स्टेशनला उसाचा रस देखील विकला. वाठारला ३ मिनिटे रेल्वे थांबायची याच ३ मिनिटात ते १०-१२ ग्लास रस विकून काही रुपये जमा करायचे. त्यांनी खूप मेहनत घेऊन एमपीएससीची तयारी केली आणि एकदा नाही तर २ वेळा या परीक्षेत यश मिळवले. एकदा पीएसआय आणि एकदा दुसरी पोस्ट त्यांना मिळाली होती. पण त्यांच्या मनात वेगळंच होतं.
त्यांना गावाची सेवा करायची होती. नोकरी जॉईन केली नाही. गावाची सेवा सुरु केली. एमपीएससी पास करून पोस्ट नाकारलेल्या जयदीपणे गावात हिरो होंडाची फ्रॅन्चायजी घेतली. पुढे राजकारणात आले आणि पळशी गावचे सरपंच झाले. गावात अनेक काम केली. सिमेंटचे रस्ते केले, गावाशेजारी रस्ता बांधला. अनेक काम केली पुरस्कार मिळवले.
पण एवढ्या मोठ्या पोस्ट नाकारल्याने गावातील लोकं मात्र नाव ठेवायला लागली. गावात तरुण त्याच्याकडे तुच्छतेने बघायला लागले. पण जयदीपला काही फरक पडला नाही आणि आयुष्यात लढत राहिला. त्याच वेळी त्याचा कल्याणी सकुंडेवर जीव जडला. पण कल्याणीच्या घरच्यांनी मात्र मुलगी देण्यास नकार दिला. कल्याणीच्या वडिलांनी देखील पोस्ट न स्वीकारल्याने त्याच्यावर टीका केली.
पण जयदीपणे मात्र कल्याणीच्या वडिलांना सांगितले २ वर्षात तुमच्या मुलीला पीएसआय करून दाखवतो. त्यानंतर कल्याणी जयदीपला मिळाली. पुढे लग्न झालं. सर्व विधी पार पडले. सत्यनारायणाची पूजा झाली. पण या नवऱ्याने बायकोला हनिमूनला न नेता तिला पंजाबी ड्रेस दिला, पुस्तके दिली आणि एक वेगळी रूम देऊन अभ्यासाला लागण्यास सांगितले.
जयदीपणे कल्याणीला अभ्यासाचे धडे दिले. गप्पा न मारता जनरल नॉलेज शिकवत राहिला. जयदीपणे आपला शब्द खरा करून दाखवला. कल्याणी २ वर्षात एमपीएससी पास झाली. तिची ट्रेनिंग सुरु झाली. त्यावेळी जयदीपला सासऱ्याने विचारलं, ‘हीरो-होंडाचा व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यलंय?’
त्यावर जयदीपने उत्तर दिलं, ‘काका, सगळं मिळालं, तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचाय’. कल्याणी सध्या मुंबई पोलिसमध्ये पीएसआय म्हणून कार्यरत आहे. बायकोला हनिमूनला न नेता तिला पीएसआय करणाऱ्या या नवऱ्याला आमचा सॅल्यूट. संदर्भ- नवनाथ सकुंडे यांचा लेख.